महावितरण बिल महागणारः दरवाढीचा फटका गरिबांनाच बसण्याची शक्यता #5मोठ्या बातम्या

Image copyright Getty Images

1. महावितरणची वीज महागणार

महावितरणची वीजही आता महागण्याची शक्यता आहे. मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने 5927 कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. याचा फटका राज्यातील 2 कोटी 55 लाख वीजग्राहकांना बसणार आहे.

दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच्या विजेचा दर 8 टक्क्यांनी वाढ होणार आहे. 300 युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र दरवाढीतून वगळण्याची मागणी महावितरणने केली आहे. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

वीजदरातून महावितरणला 76 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. नवीन वीजदर लागू झाल्यानंतर 82 हजार 925 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असून ही दरवाढ 5927 कोटी रुपयांची म्हणजेच सरासरी 5.80 टक्के असेल.

घरगुती वीजग्राहकांचा स्थिर आकार दरमहा 90 रुपयांवरून110 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनंतर हा दर लागू होईल.

2. 36 केंद्रीय मंत्री करणार जम्मू-काश्मीरचा दौरा

जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटवून 5 महिने झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या स्थितीचा ढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील 36 मंत्री वेगवेगळ्या दिवशी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत.

18 ते 25 जानेवारी दरम्यान हे मंत्री दौरा करणार आहेत आणि लोकांमध्ये सरकारने उचललेली पावले, सरकारचे धोरण लोकांना समजावून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एबीपी माझानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

3. पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेतील घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या खातेदारांना दिलासा मिळाला आहे. खातेदारांचे पैसे मिळावेत यादृष्टीने घोटाळ्यासाठी कारणीभूत असलेल्या एचडीआयएल कंपनीच्या मालमत्तांचा जलद लिलाव करण्यासाठी समिती स्थापन झाली आहे.

Image copyright Getty Images

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली या तीन सदस्यांची समिती स्थापन झाली आहे. एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान यांना वांद्रे येथील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात यावे, लिलावात तांत्रिक अडथळा येणार नाही याची खबरदारी वाधवान यांनी घ्यावी असेही उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे.

लिलाव जलद गतीने होण्यासाठी वकील सरोश दमानिया यांनी अँड. जे. एन. जैन यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4. 'रुपया मजबूत करण्यासाठी नोटेवर देवी लक्ष्मीचा फोटो छापा'

देशातील चलनी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल असा दावा भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

इंडोनेशियामध्ये नोटांवर गणपती देवाचा फोटो आहे याबाबत विचारले असता स्वामी म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी देऊ शकतात. नोटेवर गणपती असल्यामुळे अनेक संकटे दूर होतात. त्यामुळे भारतीय नोटांवरही देवी लक्ष्मीचा फोटो हवा असे ते म्हणाले. मध्यप्रदेशात खांडवा येथे स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत त्यांनी हे विधान केले आहे. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5. 'छत्रपतींच्या घराण्याविषयी एकही अपशब्द खपवून घेणार नाही'

छत्रपती उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत असे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानंतर यावर राजकारण तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक परिपत्रक काढून छत्रपतींच्या घराण्यासंदर्भात एकही अपशब्द कदापी खपवून घेणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.

त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची साताऱ्याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे.

त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे. सत्तेसाठी लाचारी करताना उठसूठ महाराजांच्या घराण्याचा अपमान केलात, तर महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्याबाबत या पत्रकात म्हटले आहे. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)