कप्तान मलिकः मजुरांना मारहाण करणाऱ्या नेत्याचं प्रकरण नेमकं काय?

कप्तान मलिक Image copyright kaptan malik@twitter

उद्धव ठाकरे सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय.

या व्हीडिओमध्ये कप्तान मलिक हे रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या काही कामगारांना दमदाटी करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ चर्चेत आल्यानंतर एखाद्या जबाबदार व्यक्तीने या प्रकारचं वर्तन करणं हे योग्य आहे का, हा प्रश्नही सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.

भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी कप्तान मलिक यांची वागणूक अशोभनीय असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांची आपण पोलिसांत तक्रार नोंदवल्याचं बीबीसी मराठीला सांगितलं.

या घटनेबाबत जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने नगरसेवक कप्तान मलिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "झालेल्या प्रकाराबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. पण ही घटना नोव्हेंबरमधील आहे याचं राजकीय भांडवल केलं जात आहे."

काय आहे व्हीडिओमध्ये?

कप्तान मलिक यांनी एका मजुरांना दमदाटी केल्याचं आणि शिविगाळ केल्याचं व्हीडिओत दिसतं. कप्तान मलिक हे मुंबईतील कुर्ल्याच्या वॉर्ड क्रमांक 170चे नगरसेवक आहे. संजय शहा नावाच्या एका व्यक्तीने हा व्हीडिओ ट्वीट केलाय.

हे कामगार एका खासगी कंपनीसाठी रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याचं काम करत होते. कप्तान मलिक यांनी त्यांना रोखलं, त्यांना धमकी देत शिवीगाळ केली. "वर्क ऑर्डर दाखवा आणि इथे उभे रहा. पुन्हा इथे दिसलात, तर हातपाय तोडून टाकीन" अशी धमकी कप्तान मलिक देताना या व्हीडिओत दिसतं.

'कामगारांना त्रास देण्याचा हेतू नव्हता'

बीबीसी मराठीला बोलताना कप्तान मलिक यांनी आपल्या वागणुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

"कामगारांना मारण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. त्यांच्याबरोबर नेहमी काही लोक असत आणि त्यांनी माझ्यासोबत अरेरावी केली. त्यांच्या उर्मटपणाला प्रतिक्रिया म्हणून माझ्याकडून हे वर्तन झालं. कामगारांना माझ्यामुळे त्रास झाला याचं मला दुःख आहे."

पुढे ते सांगतात, "महानगर पालिकेचा आणि जनतेचा पैसा लुटला जाऊ नये याच तळमळीतून मी हे कृत्य केलं. काही कंपन्या जनतेच्या पैशांची लूट करत आहेत. हजारो-करोडो रुपये लुटण्याचं काम या कंपन्या करत आहेत. त्यांच्याजवळ हे फायबर केबल टाकण्यासाठी महानगर पालिकेची परवानगी नव्हती. रस्ते खोदून काम करण्यासाठी महानगर पालिकेची परवानगी लागते. ती संबंधित विभागाकडून घेण्याची जबाबदारी त्यांची असते पण त्यांनी हे केलं नाही. मी वारंवार विनंती करून देखील त्यांनी परवानगी घेतली नाही."

"तुम्ही किती पैसे महानगर पालिकेला भरले याची पावती दाखवा. महानगर पालिकेची परवानगी घ्या. पण त्यांच्याकडे परवानगी नव्हती. त्यांनी एकही परवानगी घेतली नाही. आधी काम बंद केलं आणि नंतर पुन्हा त्यांनी काम सुरू केली. कुठे ना कुठे त्यांची दादागिरी सुरू होती. ही दादागिरी थांबवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं."

"संबंधित व्हीडिओ हा नोव्हेंबर 2019 मधील आहे. त्यावेळी त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केली नाही. पण काही जण या घटनेचं राजकीय भांडवल करू पाहत आहेत," असं मलिक म्हणाले.

"जर माझ्यावर काही केस दाखल होणार असेल तर माझी तयारी आहे कारण मी जनतेच्या भल्यासाठी काम करतोय. जर कुणी अवैध प्रकारे केबल टाकणार असेल तर मी ते थांबवणार. महानगर पालिका आयुक्तांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या कंपन्यांकडून दंड भरून घेण्यात यावा," असंही मलिक यांनी म्हटलं.

"मी जे काही केलं आहे ते महानगर पालिकेच्या भल्यासाठी आणि जनतेसाठीच केलं आहे. काही लोक दादागिरी करत होते. त्यांची दादागिरी रोखण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. माझे भाऊ नवाब मलिक यांना या प्रकरणात नाहक ओढलं जात आहे," असं देखील ते म्हणाले.

कायदेशीर कारवाईची सोमय्यांची मागणी

बीबीसी मराठीला फोनवरून दिलेल्या मुलाखतीमध्ये सोमय्या यांनी म्हटलं, की कप्तान मलिक यांचं वर्तन अशोभनीय आणि निंदनीय आहे. एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देणं, मारहाण करणं हे कायद्यात बसतच नाही. या घटनेची मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटलो.

मलिक म्हणत आहेत की, महानगर पालिकेचा पैसा वाचवण्याच्या उद्देशाने मी हे वर्तन केलं. पण त्यासाठी कायदा आहे. त्यांनी रीतसर तक्रार करायला हवी होती, असं सोमय्या म्हणाले.

या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी म्हटलं की, संबंधित लोकांना पोलिसांकडे जाण्याचा हक्क आहे. कुणी मंत्र्याचा भाऊ असो की आणखी काही कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)