Jeff Bezos: जगातल्या सर्वांत श्रीमंत माणसाला भारताने अशी वागणूक का दिली?

जेफ बेझोस Image copyright ANI

जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस गेल्या आठवड्यात भारतात येऊन गेले.

त्यांची कंपनी भारतात एक अब्ज डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक करून छोटे आणि मध्यम आकाराच्या प्रतिष्ठानांना डिजिटाईझ करणार, ज्याद्वारे हे विक्रेते त्यांचं सामान ऑनलाईन विकू शकणार, अशी त्यांनी घोषणा केली. याद्वारे 2025 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सपर्यंतची स्वदेशी उत्पादनं निर्यात करण्याचं लक्ष्य अमेझॉनने ठेवलं आहे.

त्यांनी या दौऱ्यात दिल्लीत अनेक ठिकाणी भेट दिली आणि काही मुलांबरोबर पतंग उडवली. मात्र त्यांच्या येण्याने सगळेच उत्सुक नव्हते.

भारतातल्या लाखो लहान दुकानदारांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं सांगणाऱ्या एका संघटनेने बेझोस यांच्या विरोधात देशभरात अनेक शहरांमध्ये निदर्शनं आयोजित केली होती.

अॅमझॉन गेली 6 वर्षं भारतात आहे आणि या कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीचा लहान व्यापारी आणि दुकानदारांवर परिणाम होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अॅमझॉनच्या विरुद्ध ही आंदोलनं करणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे प्रवीण खंडेलवाल सांगतात, "अॅमेझॉनच्या क्रूर आणि कपटी धोरणांमुळे भारतातल्या हजारो लहान व्यापाऱ्यांच्या धंद्याचं नुकसान झालेलं आहे."

इतकंच नाही तर बेझोस भारतात दाखल होण्यापूर्वीच अॅमेझॉनच्या आणि त्यांचे भारतीय प्रतिस्पर्धी फ्लिपकार्ट (आता याची बहुतांश मालकी वॉलमार्टकडे आहे) यांच्या कारभाराविषयी अधिकृत चौकशीही सुरू करण्यात आली.

भारतात वादात राहिलेला ई-कॉमर्स

वस्तूंच्या किंमती ठरवण्याविषयीचं धोरण, मोबाईल फोन्सचे एक्सक्लुझिव्ह लाँच आणि विक्री हक्क, उत्पादनांवर देण्यात येणारे मोठे डिस्काऊंट्स आणि काही ठराविक विक्रेत्यांना देण्यात येणारी विशेष वागणूक, याविषयीची तपासणी करण्यात येते आहे. या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करणार असून, आपले व्यवहार हे नियमांनुसारच असल्याचं अॅमेझॉनने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

भारत ही आपली सर्वांत वेगाने विस्तारणारी बाजारपेठ असून इथल्या विक्रेत्यांच्या सशक्तीकरणासाठी आजवर खूप काही केल्याचा दावा कंपनीने केलाय.

अॅमेझॉनने आतापर्यंत देशात 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून कंपनीचे देशात 60,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. यासोबतच आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण 5 लाखांपेक्षा जास्त विक्रेत्यांसोबत काम करत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

भारतीय कायद्यानुसार एखादी वेबसाईट ही त्रयस्थ कंपनीने तयार केलेल्या वस्तू स्वतंत्र विक्रेत्यांच्या मार्फत विकू शकते. आपल्या मार्फत व्यवसाय करणाऱ्या एकूण विक्रेत्यांपैकी अर्ध्याहून अधिक व्यापारी हे लहान शहरांमधले असून वेबसाईटच्या सेलदरम्यान त्यांचा मोठा फायदा आजवर झाल्याचा कंपनीचा दावा आहे.

Image copyright Twitter / @JeffBezos
प्रतिमा मथळा किराणा मालाच्या दुकानात बेझोस

याशिवाय अॅमझॉन कंपनी लहान दुकानांसोबतही भागीदारी करते. त्यांच्याही वस्तू लोकांना या वेबसाईटवरून विकत घेता येतात. कंपनीच्या एका योजनेच्या माध्यमातून आजवर 50,000 भारतीय विक्रेत्यांनी भारताबाहेर जगभरामध्ये 1 अब्ज डॉलर्स मूल्याच्या वस्तू आजवर पाठवल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

त्यातच, या दौऱ्यात बेझोस यांनी अॅमझॉनबरोबर व्यवसाय करत असलेल्या लघु आणि मध्यम उद्योजकांसोबतच्या दिल्लीतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथे त्यांनी भारतात एक अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली.

मात्र यानेही निदर्शकांचं समाधान झालं नाही. "बेझोस हे आपण लहान व्यापाऱ्यांचं भलं करत असल्याचं खोटं चित्रं उभं करत आहेत," असं खंडेलवाल म्हणाले.

उद्योगांसाठी गुड न्यूज की चिंतेचं कारण?

भारतातल्या ऑनलाईन रिटेल मार्केटमध्ये अॅमझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांचं मूल्य 39 अब्ज डॉलर्स एवढं आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या अब्जात आहे. स्वस्त होत चाललेल्या मोबाईल डेटा किमतींमुळे भारतात इ-कॉमर्स मार्केट वेगाने वाढतंय.

यंदाच्या वर्षी या मार्केटची व्याप्ती 120 अब्ज डॉलर्स एवढी आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या पैशांवर उभे झालेले 4,700 हून अधिक स्टार्ट-अप्स सध्या भारतात आहेत.

Image copyright Twitter / @JeffBezos
प्रतिमा मथळा जेफ बेझोस अॅमेझॉनच्या कार्यक्रमानंतर उद्योजकांसोबत सेल्फी घेताना

मात्र भारतात नेहमीच कपडे, किराणा माल, इलेक्ट्रॉनिक्स सारख्या वस्तूंसाठी छोट्या, खऱ्याखुऱ्या दुकानांची संस्कृती राहिली आहे. छोटी शहरं, गावांमध्ये किराणा मालाचं दुकान हेच असंख्य कुटुंबांसाठी खरेदीचं प्रमुख केंद्र आहे.

प्राईसवॉटरहाऊस कूपर्स संस्थेच्या अभ्यासानुसार भारतात 1.2 लाखहून अधिक किराणा मालाची दुकानं आहेत. यापैकी अनेक दुकान चालकांनी तंत्रज्ञान स्वीकारायला सुरुवात केली आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वॉलेट पेमेंट्स याद्वारे पैसे स्वीकारायला सुरुवात केली आहे.

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधील संशोधकांनी यासंदर्भात लाखो किराणा मालाची दुकानं आणि व्यवहारांचा अभ्यास केला. आधुनिक व्यापारी आस्थापनांपेक्षा छोट्या आणि मध्यम दुकानांची नफा कमावण्याची क्षमता अधिक आहे, असं त्यांचा अभ्यास सांगतो.

भारत ही निश्चितच आश्वासक बाजारपेठ आहे, मात्र ती फसवी आहे. भारतातले छोटे व्यापारी इ-कॉमर्समुळे आलेल्या बदलाच्या लाटेला तोंड देण्यास उस्तुक नाहीत. आणि त्यांचा दृष्टिकोन पारंपरिक असतो. त्यांना राजकीय पक्षांचा पाठिंबा असतो.

दुसरीकडे ऑनलाईन बलाढ्य उद्योगसमूहांमुळे छोट्या विक्रेत्यांना कायमचा फटका बसेल अशी स्थिती आहे. अतिवेगवान पुरवठा, परवडण्यासारखी किंमत हे बलाढ्य उद्योगसमूहांचे वैशिष्ट्य आहे.

सरकारची थंड प्रतिक्रिया

ढासळणारी अर्थव्यवस्था सुधारण्याकरता सरकारला विदेशी गुंतवणुकीची आवश्यकता असते. मात्र सरकारने बेझोस यांच्या घोषणेवर कुठलीही सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली दिसत नाही.

बेझोय या दौऱ्यात ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटताना दिसले ना भारत सरकारच्या कुठल्याही मंत्री अथवा प्रतिनिधीला.

उलट, त्यांच्या वक्तव्याला 24 तास उलटून जात नाहीत तोवर वाणिज्य मंत्री पीयुष गोयल म्हणाले, "ते एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करू शकतात, मात्र ते त्यानंतर दर वर्षी एक अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचं दाखवतील. ते आपल्या आर्थिक नुकसानीचा अंदाज घेत असावेत.

"गुंतवणुकीचं स्वागत आहे, मात्र हे पाऊल नुकसानीची भरपाई करण्यासाठी उचललं गेलं आहे. पण ते भारतावर उपकार करत नाहीयेत. ऑनलाईन खरेदीविक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारी कंपनी दुसऱ्यांचं बाजार धोरण बिघडवण्याचं काम करत नसेल तर या कंपनीला एवढा तोटा होईल का?"

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टविरोधात आंदोलन करणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेनं गोयल यांच्या वक्तव्याची प्रशंसा केली आहे. "सरकारचा देशातील सात कोटी स्थानिक व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनाबाबत संवेदनशील आहे, हे यातून दिसून येतं. ई-कॉमर्स कंपनीच्या चुकीच्या ध्येयधोरणांचा फटका या व्यापाऱ्यांना बसतोय," असं संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल म्हणाले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गोयलांच्या प्रतिक्रियावर नाराजी व्यक्त केली. "बेझोय यांच्यावर वाणिज्य मंत्र्यांचं वक्तव्य आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये चांगल्याच दिसतील, नाही?"

"त्यांची ही तिखट प्रतिक्रिया नक्कीच गेल्या पाच महिन्यांमध्ये घटलेली आयात आणि सलग आठ महिन्यात कमी होत चाललेली निर्यात एका झटक्यात वर जाईल. मंत्र्यांनी अशा आणखी मोठ्या लोकांशी असंच वागायला हवं," अशी टीका त्यांनी केली.

सरकारची नाराजी आहे का?

भारतीय प्रतिस्पर्धी आयोग अॅमेझॉनच्या व्यवहारांची चौकशी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पीयुष गोयल यांनी हे वक्तव्य केलं आहे. ई-कॉमर्स कंपन्या ठराविक व्यापाऱ्यांना फायदा होईल, असं साटंलोटं करत आहेत तसंच खासगी लेबल्ससह प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप छोट्या व्यापाऱ्यांनी केला आहे.

यासंदर्भात भारतीय प्रतिस्पर्धी आयोग वॉलमार्ट या अमेरिकन रिटेल कंपनीच्या कार्यपद्धतीची चौकशी करत आहे. वॉलमार्टने गेल्या वर्षी फ्लिपकार्ट या भारतीय ई-कॉमर्स कंपनीला विकत घेतलं होतं.

बेझोस भारतावर उपकार करत नसल्याच्या गोयल यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने बेझोस यांची मालकी असलेल्या वॉशिंग्टन पोस्टच्या माध्यमातून नाराजी प्रकट केली आहे.

भाजपच्या विदेशातील घडामोडींसंदर्भातील IT सेलशी संलग्न विजय चौथाईवाले यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, "माननीय बेझोस, वॉशिंग्टन DCतील आपल्या कर्मचाऱ्यांना हे सांगा. नाहीतर तुमचा वेळ आणि पैशाची उधळपट्टी वाया जाईल. चौथाईवाले यांनी बेझोस यांचा व्हीडिओही शेअर केला आहे. या व्हीडिओत बेझोस भारतात गुंतवणूक, भारतीय लोकशाही आणि भारतीयांच्या उत्साहाबद्दल बोलत आहेत."

विदेशी प्रसारमाध्यमांमध्ये मोदींविरोधात लिखाण छापून आल्याबद्दल चौथाईवाले यांनी बेझोस यांना लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. जम्मू काश्मीर राज्याला लागू असलेलं कलम 370 रद्द करणं, नागरिकता दुरुस्ती कायदा यासंदर्भात अनेक विदेशी वर्तमानपत्रांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

श्रीमंतांची लढाई

खरंतर ही लढाई जगातील सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती ठरलेले जेफ बेझोस आणि भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यातील आहे.

जाणकारांच्या मते मोदी सरकारने इ-कॉमर्स कंपन्यांसाठी नवे नियम तयार केले आहेत. त्यानुसार ते उत्पादनांचा साठा करू शकतात आणि मार्केट प्लस प्रमाणे काम करू शकतात. नव्या नियमामुळे अंबानी यांच्या जियो मार्टला फायदा होईल.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओने एकत्र येत या जिओमार्ट (JioMart) सेवेची सुरुवात केली आहे.

जियो मार्ट ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ एकत्र मिळून चालवणार आहेत. जियोमार्ट दिलेल्या माहितीनुसार कंपनी ग्राहकांना 50,000 वस्तू विनाशुल्क घरी पोहोचवेल.

देशात ऑनलाईन किराणा बाजारपेठ विकसित झालेली नाही. ऑनलाईन किराणा खरेदीच्या माध्यमातून 87 कोटींची उलाढाल होते आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत एक टक्क्याहूनही कमी म्हणजेच 0.15 टक्के माणसं किराणा माल ऑनलाईन खरेदी करतात.

विश्लेषकांच्या मते, 2023 पर्यंत ऑनलाईन किराणा बाजारपेठेची वाढ होऊन उलाढाल 14.5 अब्ज डॉलरपर्यंत जाईल असा अंदाज आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)