MS Dhoni: BCCI कडून महेंद्रसिंग धोनीला निवृत्तीचे संकेत?

महेंद्रसिंग धोनी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महेंद्रसिंग धोनी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIने खेळाडूंसाठीची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश नसल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी चार श्रेणी मिळून 27 खेळाडूंची निवड झाली आहे.

या यादीत विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांनी आपलं नाव ए प्लस श्रेणीत कायम राखलं आहे. लोकेश राहुलने ब श्रेणीतून ए श्रेणीत बढती मिळवली आहे आणि वृद्धिमान साहाने सी श्रेणीतून बी श्रेणीत स्थान पटकावलं आहे.

मात्र मागच्या वर्षी ए श्रेणीत असलेल्या धोनीचं नाव यात नाही. धोनीने आजवर 350 वनडे, 90 टेस्ट आणि 98 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

अंबाती रायुडू, खलील अहमद आणि दिनेश कार्तिक यांचीही यादीतून वगळण्यात आलं आहे.

यांच्याशिवाय, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, नवदीन सैनी आणि मयांक अगरवाल यांना पहिल्यांदाच करारबद्ध खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.

ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपयांचं मानधन मिळतं, ए श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी तर बी श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येकी 3 कोटी रुपये मिळतात. सी श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतात.

ए प्लस श्रेणी

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

ए श्रेणी

रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत.

बी श्रेणी

वृद्धिमान साहा, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि मयांक अगरवाल

क श्रेणी

केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर.


धोनीची 'ती' शेवटची मॅच ठरणार?

गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलची मॅच झाली होती. न्यूझीलंडने अवघड अशा खेळपट्टीवर 239 धावांची मजल मारली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था 4 बाद 24 अशी झाली होती.

थोड्या वेळात ही स्थिती 6 बाद 92 अशी झाली. मात्र वनडे क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनिशरपैकी एक मानला जाणारा महेंद्रसिंग धोनी अजूनही पिचवर होता. त्याच्या साथीला रवींद्र जडेजा होता. जडेजा वेगाने धावा करत होता तर धोनीने सूत्रधाराची भूमिका स्वीकारली होती.

रन आणि बॉलमधलं समीकरण व्यस्त होऊ लागलं होतं. मात्र धोनी पिचवर असल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. 12 बॉल 31 रन्स असं समीकरण झालं.

धोनीने लोकी फर्ग्युसनच्या पहिल्याच बॉलवर सिक्स खेचला. पुढच्या बॉलवर धोनीला एकही रन घेता आली नाही. तिसऱ्या बॉलवर धोनीने एक रन पूर्ण केली. दुसऱ्या रनसाठी धावण्याचा निर्णय त्याने घेतला. 'रनिंग-बिटवीन-द-विकेट्स'मध्ये अतिशय चपळ अशा धोनीने सर्वस्व पणाला लावत क्रीझमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला.

मात्र मार्टिन गप्तीलच्या डायरेक्ट थ्रोने थेट स्टंप्सचा वेध घेतला. बॉल स्टंप्सवर आदळला आणि कोट्यावधी भारतीय चाहत्यांच्या वर्ल्ड कपच्या आशा मावळल्या. रवींद्र जडेजाने एकट्याने संघाला जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपुराच ठरला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा धोनी रनआऊट झाला आणि चाहत्यांच्या जिंकण्याच्या आशा मावळल्या

तो दिवस होता 10 जून 2019.

2011 वर्ल्ड कप, 2007 ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप, IPL जेतेपदं, टेस्ट रेटिंगमध्ये अव्वल स्थान मिळवून देणारा कॅप्टन, असं दमदार प्रदर्शन नावावर असणाऱ्या धोनीने या दिवसानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

टेस्टमध्ये त्याने याआधीच निवृत्ती स्वीकारली आहे. वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये तो खेळतो आहे. यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. धोनी त्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार, अशी शक्यता होती.

मात्र त्यापूर्वीच वार्षिक करार यादीतून वगळण्यात आल्याने धोनीच्या क्रिकेट भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सात महिन्यांपासून ग्लोव्ह्स नाही घातले

ती वर्ल्ड कप सेमी फायनल होऊन आता सात महिने उलटले आहेत. त्यानंतर धोनीने, जो मानद लेफ्टनंट कर्नल आहे, त्याने काही काळ भारतीय सैन्याबरोबर घालवण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्याने काश्मीरमध्ये जुलैच्या अखेरीस दोन आठवड्यांसाठी ट्रेनिंग घेतलं.

त्यामुळे वर्ल्ड कपनंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा धोनी भाग नव्हता. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत तो खेळला नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठीही तो उपलब्ध नव्हता.

वेस्ट इंडिजने भारताचा दौरा केला तेव्हाही धोनी संघाचा भाग नव्हता. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार झालेला नाही.

Image copyright AFP

भारतीय संघ आता न्यूझीलंडच्या प्रदीर्घ दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत 5 ट्वेन्टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट होणार आहेत. निवडसमितीने ट्वेन्टी-20 संघ जाहीर केला आहे. त्यात धोनीचं नाव नाही.

यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात वनडे मालिकेसाठी येणार आहे. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या IPL स्पर्धेत धोनी खेळेल अशी शक्यता आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे.

सोशल मीडियावर मर्यादित अपीअरन्स

धोनी सोशल मीडियावर फारसा बोलका नाहीच. या सात महिन्यांमध्ये त्याने पाच वेळा ट्वीट केलंय तर इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी 8 जानेवारीला धोनीने आप्तेष्टांच्या बरोबरीने हिमवृष्टीचा आनंद घेताना दिसतो आहे.

5 जानेवारीला धोनीने शेअर केलेल्या व्हीडिओत त्याची लेक झिव्हा खेळताना दिसत आहे. 16 डिसेंबरला धोनीने पत्नी साक्षी दिग्दर्शक झाल्याचा व्हीडिओ शेअर केला आहे.

24 ऑक्टोबरला धोनीने आपल्या ताफ्यातली भलीथोरली गाडी साफसूफ करतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे. 7 ऑक्टोबरला रणवीर आणि झिव्हा यांचे गॉगल कसे सारखे आहेत याचे फोटो शेअर केले होते.

24 सप्टेंबरला रात्रीच्या प्रकाशात चाललेल्या एका क्रिकेट मॅचचा व्हीडिओ धोनीने शेअर केला होता.

प्रश्न आणि अस्पष्ट उत्तरं

सेमी फायनलनंतर धोनी ज्या ज्या वेळी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाला तेव्हा त्याला निवृत्तीविषयी, क्रिकेट भविष्याविषयी विचारण्यात आलं. काही वेळेला त्याने मौन बाळगलं. मात्र काही महिन्यांपूर्वी जानेवारीपर्यंत वाट पाहा असं उत्तर दिलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा धोनी खेळणार?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांनी धोनीच्या योगदानाविषयी, त्याच्या अनुभवाविषयी गौरवोद्गार व्यक्त केले. धोनीच्या कर्तृत्वाविषयी, योगदानाविषयी त्यांनी सातत्याने सांगितलं.

निवडसमितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद आणि बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही धोनीबद्दल विचारण्यात आलं. मात्र धोनी यापुढे खेळणार आहे का? धोनीने निवृत्ती घेतली आहे का? याबाबत स्पष्ट उत्तर कोणीच दिलं नाही.

वर्ल्ड कप सेमी फायनल मॅचनंतर धोनी दुखापतीमुळे खेळत नसल्याची चर्चा होती. या काळात धोनी लष्करी सेवेत दिसला होता. मुंबईत फुटबॉलच्या मैत्रीपूर्ण सामन्यात सहभागी झाला होता. 31 डिसेंबरला धोनी दुबईत होता, अशीही चर्चा होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)