Karim Lala : इंदिरा गांधींना कसा भेटला होता हा अंडरवर्ल्ड डॉन?

इंदिरा गांधी Image copyright PHOTO DIVISION
प्रतिमा मथळा इंदिरा गांधी

इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायच्या, या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपलं विधान मागे घेतलं आहे.

"माझ्या वक्तव्यामुळे इंदिराजींच्या प्रतिमेला धक्का लागला आहे, असं कोणाला वाटत असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझं वक्तव्य मागे घेत आहे," असं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

"इंदिरा गांधींची मी आयर्न लेडी म्हणून वेळोवेळी स्तुती केली आहे, असंही राऊत यांनी ट्वीट करून म्हटलं. करीम लाला पठाण समाजाचं नेतृत्व करायचे, 'पख्तुन-ए-हिंद' ही त्यांची संघटना होती. पठाण समाजाचे नेते या नात्यानं इंदिरा गांधी त्यांना भेटायच्या. पण ज्यांना मुंबईचा इतिहास माहीत नाही, त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला," असंही ट्वीट संजय राऊत यांनी केलं.

बुधवारी (15 जानेवारी) पुण्यामध्ये दैनिक लोकमतनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी इंदिरा गांधींसंबंधीचं वक्तव्य केलं होतं. लोकप्रभा साप्ताहिकामध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत असतानाच्या दिवसांबद्दल बोलताना संजय राऊत यांनी आपण मुंबईतलं अंडरवर्ल्डचं विश्व खूप जवळून पाहिल्याचं वक्तव्यं केलं होतं.

"हाजी मस्तान जेव्हा मंत्रालयात यायचा तेव्हा अख्खं मंत्रालय खाली यायचं. करीम लालाला भेटायला इंदिरा गांधी जायच्या. आता किरकोळ लोक आहेत. मी दाऊद इब्राहिमपासून सगळ्यांचंच फोटोसेशन केलं आहे. दाऊदला पाहिलेले, त्याच्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मी त्याला पाहिलंय, त्याच्याशी बोललोय. त्याला दमसुद्धा दिलाय. तो काळ वेगळा होता," असं संजय राऊत यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं.

इंदिरा गांधी आणि करीम लालांची भेट झाली कशी?

संजय राऊत यांनी करीम लाला आणि इंदिरा गांधींच्या भेटीबद्दल वक्तव्यं केल्यानंतर सोशल मीडियावर इंदिरा गांधींचा करीम लालांसोबतचा फोटो व्हायरल होऊ लागला.

हा फोटो नेमका कधी आणि कसा घेतला गेला याबद्दल क्राइम रिपोर्टर असलेल्या बलजीत परमार यांनी ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधला.

बलजीत परमार यांनी सांगितलं, "1983 साली मी जेव्हा करीम लालाची मुलाखत घेतली होती, तेव्हा पहिला प्रश्न त्यांना हाच विचारला होता, की तुमचे इंदिरा गांधींशी ओळख होती का? कारण मला त्यांचा इंदिरा गांधींसोबतचा फोटो मिळाला होता. त्यावेळी करीम लालानी आपण या मॅडमशी दोन वेळा बोललो आहे आणि एकदाच भेटलो आहे, असं सांगितलं."

बलजीत परमार यांना करीम लालानी सांगितलं, की ती भेट म्हणजे योगायोग होता. मी काही इंदिरा गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो.

परमार यांनी म्हटलं, "हा फोटो 1973 सालचा होता. डॉ. हरिंद्रनाथ चटोपाध्याय हे प्रसिद्ध गीतकार, स्क्रीप्ट लेखक होते. त्यांना 1973 साली पद्मभूषण मिळालं होतं. ते करीम लालाचे मित्र होते. ज्यांना पुरस्कार मिळतो, तो सोबत दोन व्यक्तींना घेऊन जाऊ शकतो. चटोपाध्याय यांनी करीम लालांना बोलावलं. या निमित्तानं राष्ट्रपती भवन पाहायला मिळेल, असं करीम लालांना वाटलं. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते दरबार हॉलमधून बाहेर पडत होते आणि दुसऱ्या एका कक्षातून काही लोकांसोबत इंदिरा गांधी बाहेर आल्या."

"चटोपाध्यायांसोबत इंदिरा गांधीचे कौटुंबिक संबंध होते. चटोपाध्याय यांनी करीम लालाची ओळख 'पख्तुन-ए-हिंद' चे अध्यक्ष अशी करून दिली. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. करीम लालांनी इंदिरा गांधींना म्हटलं, की तुम्ही मुंबईत आलात तर नक्की भेटा. इंदिरा गांधींनीही त्यांना म्हटलं, की तुम्ही दिल्लीत कधी आलात तर भेटा. त्याचवेळी राष्ट्रपती भवनच्या फोटोग्राफरनं त्यांचा फोटो काढला. राष्ट्रपती भवनच्या फोटोग्राफरना सूचना असते, की ज्यांचा फोटो काढलाय, त्यांना तो द्यावा लागतो. त्यांनी इंदिरा गांधींसोबतचा फोटो आपल्या अल्बममध्ये लावून टाकला. मी माझ्या लेखात तो फोटो वापरला होता," असं परमार यांनी पुढे सांगितलं.

अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचा दत्तक पुत्र सुंदर शेखर यांनीही संजय राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत इंदिरा गांधी करीम लालांना भेटायच्या असं म्हटलं आहे.

त्यांना भेटायला अन्य नेतेही यायचे. हाजी मस्तान हे व्यापारीही होते. बाळासाहेब ठाकरे हेसुद्धा हाजी मस्तानचे चांगले मित्र होते, असं सुंदर शेखर यांनी म्हटलं.

कोण होता करीम लाला?

मुंबईच्या अंडरवर्ल्डचा जेव्हा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा करीम लालाचं नाव पुढे येतं. मूळचा अफगाणिस्तानचा असलेला करीम लाला स्वातंत्र्यपूर्व काळात पेशावरहून येऊन मुंबईत स्थायिक झाला. क्लब्सच्या नावाखाली जुगाराचे अड्डे सुरु करून त्यानं आपलं व्यवसाय हळूहळू वाढवत नेल्याचं म्हटलं जातं.

मुंबईत नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी यांच साम्राज्य गुन्हेगारी विश्वात सुरु होण्यापूर्वी करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार या तिघांचं साम्राज्य होतं, असं म्हटलं जातं. मुख्यत: तस्करी हा धंदा असणा-या या डॉन्सचा जुगारी अड्डे, दारूच्या हातभट्ट्या अशा बेकायदेशीर धंद्यांचंही नेटवर्क होतं. या डॉनची मुंबईच्या राजकीय, व्यावसायिक आणि सिनेविश्वात उठबस, कनेक्शन असायची.

Image copyright Google

जेव्हा लाला, मस्तान आणि मुदलियार या टोळ्यांचे मुंबईवरच्या वर्चस्वावरून वाद सुरु झाले तेव्हा त्यांनी मुंबईतल्या त्यांच्या क्षेत्राचं आणि व्यवसायांचं वाटप समझोता करून केलं. त्यातून करीम लालाच्या पठाणी गॅंगचं दक्षिण मुंबईवर वर्चस्व राहिलं.

हाजी मस्तानच्या गॅंगमधून गुन्हेगारी विश्वात पदार्पण केलेल्या दाऊद इब्राहिमचे सुरुवातीच्या काळात करीम लालासोबत खटके उडाले. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातली ही भांडणं पुढे या टोकाला गेली की त्यातून मुंबईतली कुप्रसिद्ध गॅंगवॉर्स सुरु झाली. 2002 मध्ये करीम लालाचा मृत्यू झाला.

संजय राऊतांच्या वक्तव्यावरून उद्भवलेला वाद

संजय राऊतांच्या वक्तव्याबद्दलची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवली होती. त्यांनी आपलं वक्तव्यं आता मागे घेतलं आहे आणि हा वाद इथेच संपला आहे, असं वक्तव्यं महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं होतं.

दरम्यान, संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना आपलं वक्तव्यं मागे घ्यावं असं म्हटलं होतं.

मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी देशाच्या सुरक्षेसोबत कधीच तडजोड केली नव्हती. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष या नात्याने मी संजय राऊत यांनी आपलं विधान मागे घेण्याची मागणी करतो." "आपल्या दिवंगत माजी पंतप्रधानांबद्दल बोलताना राजकीय नेत्यांनी संयम बाळगावा," असंही देवरा यांनी म्हटलं होतं.

तर संजय निरुपम यांनी ट्वीट करून म्हटलं, की मिस्टर शायर यांनी इतरांच्या हलक्या-फुलक्या शायरी ऐकवून महाराष्ट्राचं मनोरंजन करावं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विरोधात अपप्रचार केला तर त्यांना पश्चाताप करावा लागेल. त्यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेलं वक्तव्यं मागे घ्यावं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)