देविंदर सिंह: काश्मिरमधील पोलिस अधिकाऱ्याचे कट्टरतावाद्यांशी संबंध कसे झाले उघड?

देविंदर सिंह, काश्मीर, Image copyright PTI
प्रतिमा मथळा देविंदर सिंह

कट्टरतावाद्यांशी लागेबांधे असल्याच्या कारणामुळे निलंबित करण्यात आलेले काश्मीरचे 57 वर्षीय पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ही देशातली सर्वोच्च तपास यंत्रणा करणार आहे.

"देविंदर सिंह स्वेच्छेने कट्टरतावाद्यांशी मदत करायचे. यामागचा त्यांचा नेमका हेतू काय, हे शोधून काढणं NIA पुढचं मोठं आव्हान असणार आहे. देविंदर सिंह यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघता त्यांना पैशाचा हव्यास आहे आणि त्यामुळेच अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी वसुली यासारख्या गुन्ह्यामध्येही त्यांचं नाव आलं आहे," अशी माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

गेल्यावर्षी पुलवामामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सुरक्षा दलाचे 40 जवान ठार झाले होते. त्यावेळी देविंदर सिंह यांची पोस्टींग पुलवामा पोलीस मुख्यालयात होती. त्यामुळे त्या हल्ल्यातही देविंदर सिंह यांचा हात असावा, असा आरोप अनेकजण करत आहेत.

मात्र, तसे कुठलेही ठोस पुरावे अजूनतरी मिळालेले नाही. NIA याचाही तपास करणार आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार देविंदर सिंह कट्टरतावाद्यांना काश्मीरमध्ये आणि काश्मीरबाहेर ये-जा करण्यात मदत करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यामुळे काश्मीर पोलीस आधीपासूनच देविंदर सिंह यांच्यावर पाळत ठेवून होते.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा अफजल गुरुप्रकरणी देविंदर सिंह यांची चौकशी करण्यात येणार आहे.

जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या काझीगुंड गावात देविंदर सिंह यांना अटक करण्यात आली. देविंदर सिंह जम्मूला जात होते. त्यांच्यासोबत गाडीत हिजबुलचा कमांडर सईद नवीद आणि त्याचे दोन साथीदार आसीफ आणि इमरान हेदेखील होते.

यावेळी काझीगुंड चेकपॉइंटवर वरिष्ठ पोलीस अधिकारी अतुल गोयल आणि देविंदर सिंह यांच्यात हाणामारीही झाली होती. या हाणामारीचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कशी झाली देविंदर यांना अटक?

"देविंदरवर पाळत ठेवण्याचे काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने देविंदर कट्टरतावाद्यांसोबत श्रीनगरला पोचले आहेत आणि तिथून पुढे ते सर्व काझीगुंड महामार्गाने जम्मूला जाणार आहेत," अशी माहिती दक्षिण काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) अतुल गोयल यांना फोनवरून दिली.

या घटनेविषयी बीबीसीला अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले, "DIG स्वतः पुढे आले आणि एक तुकडी घेऊन चेक पॉइंटवर गेले. देविंदर सिंहची गाडी थांबवली तेव्हा सोबत असलेले दहशतवादी आपले सुरक्षा रक्षक असल्याचं देविंदरने सांगितलं. मात्र, गाडीची झडती घेतली तेव्हा त्यात 5 हँड ग्रेनेड सापडले. नंतर एक रायफलही सापडली."

पोलीस अधिकारी पुढे सांगतात, "यानंतर देविंदरने डीआयजींसोबत वाद घालायला सुरुवात केली. ते म्हणाले, 'सर ये गेम है, आप गेम खराब मत करो.'"

Image copyright ANI
प्रतिमा मथळा देविंदर सिंह यांची चौकशी करण्यात येणार आहे.

"हे ऐकून डीआयजी संतापले आणि त्यांनी देविंदर यांच्या कानशीलात लगावली. त्यांना अटक करण्याचे आदेश दिले."

देविंदर सिंह यांची पार्श्वभूमी

1990 च्या दशकात कट्टरतावाद्यांनी काश्मीरमध्ये धुमाकूळ घातला होता. त्यावेळी कट्टरतावादाच्या विरोधातल्या लढ्यात देविंदर सिंह यांनी अनेक महत्त्वाच्या कामगिरी बजावल्या होत्या.

देविंदर सिंह कट्टरतावाद्यांचा अड्डा मानल्या जाणाऱ्या त्रालमधून येतात. बुऱहान वाणीही त्रालचाच होता.

देविंदर सिंह यांच्याविरोधात अनेक चौकशा सुरू होत्या, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी बीबीसीला दिली. टिंबरचे ट्रक बळकावणे, निर्दोष लोकांना अटक करून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करून त्यांना सोडणे, खंडणी वसूल करणे असे अनेक गुन्हे त्यांच्याविरोधात आहेत. "मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे वरिष्ठ अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने त्यांची निर्दोष सुटका करायचे."

एका अधिकाऱ्याने सांगितलं की 1990 साली देविंदर सिंह यांनी एका अफू तस्कराला अटक केली होती. मात्र, नंतर त्या तस्कराला सोडून दिलं आणि सगळी अफू त्यांनी स्वतः विकली होती. या प्रकरणात त्यांच्याविरोधात चौकशीही बसवण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनंतर चौकशी उठवण्यात आली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा काश्मीरमधली परिस्थिती

नव्वदीच्या दशकाच्या सुरवातीला अफजल गुरु लॉकअपमध्ये असताना देविंदर सिंह यांची पहिल्यांदा त्यांच्याशी भेट झाली होती. देविंदरने त्याला आपल्या बाजूने वळवण्याचा, त्याला आपला सूत्र बनवण्याचा प्रयत्न केला होता.

13 डिसेंबर 2001 रोजी जैश-ए-मोहम्मदनं संसदेवर हल्ला केला होता. या प्रकरणी अफजल गुरुला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली होती. त्याचवर्षी अफजलला फासावर लटकवण्याआधी काही वृत्तपत्रांमध्ये अफजलचं एक कथित पत्र प्रसिद्ध झालं होतं. त्यात त्याने आपली सुटका झाल्यावरही देविंदर सिंह आपल्याला त्रास देईल, असं म्हटलं होतं.

पत्रात अफजल गुरुने लिहिले होते, "देविंदर सिंहनेच एका परदेशी कट्टरतावाद्याला दिल्लीपर्यंत नेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. त्यानेच त्या अतिरेक्यासाठी खोली बुक केली होती आणि कारचीही व्यवस्था केली होती."

एका अधिकाऱ्याने सांगितलं, "ते (देविंदर सिंह) विमानाने भारताबाहेर पळून जातील, अशीही आम्हाला भीती होती. त्यामुळे आम्ही विमानतळावरही सापळा लावला होता. "

या संपूर्ण प्रकरणाने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत-

  • देविंदर सिंह यांचा ट्रॅक रेकॉर्ड इतका वाईट असताना त्यांना बढती कशी मिळत गेली?
  • देविंदर यांच्याविरोधात अनेक चौकशा प्रलंबित असताना त्यांना महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टिंग का मिळायची?
  • देविंदर सिंह 'पैशाचे लोभी आहेत आणि पैशासाठी कशाचीही तडजोड करतो', हे माहिती असूनही त्यांना भारतीय शांती दलात (Indian Peacekeeping Forse) सहभागी करून घेत 2003 साली संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत वर्षभरासाठी पूर्व युरोपात का पाठवण्यात आलं?
  • वरिष्ठांना देविंदर यांच्या चुकीच्या कृत्यांची कल्पना असूनही त्यांची संरक्षण विमानतळाच्या अँटी-हायजॅकिंग विंगमध्ये पोस्टिंग का करण्यात आली?
  • "पोलीस दलातील सडकं सफरचंद" (एका अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे) अशी ओळख असतानाही राज्याचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार असणाऱ्या 'शेर-ए-काश्मीर' या किताबासाठी देविंदर सिंह यांच्या नावाची शिफारस का करण्यात आली?
  • मी गेम खेळतोय, असं त्यांनी खरंच म्हटलं असेल तर या गेममधले इतर खेळाडू कोण आणि खेळपट्टी कोणती होती, याचा खुलासा केला जाईल का?

NIA लवकरच या प्रश्नांची उत्तर शोधून काढेल आणि या प्रकरणातले बेपत्ता दुवेही शोधतील, अशी आशा आहे.

कोण आहेत देविंदर सिंह?

श्रीनगरमधील अमर सिंह महाविद्यालयातून पदवी घेतलेले देविंदर सिंह १९९०मध्ये काश्मीर पोलिसांत उप-निरीक्षक म्हणून भरती झाले. काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांनी भारत सरकारविरोधात अस्त्रं हाती घ्यायला सुरुवात केली, तो हा काळ.

अतिरेक्यांवरील कारवाईसाठी स्पेशल अॅक्शन ग्रुपची स्थापना करण्यात आली आणि देविंदर सिंह यांना बढती देऊन त्यामध्ये सहभागी करून घेण्यात आलं, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

आधी पोलीस निरीक्षक असलेल्या देविंदर सिंह यांनी अफझल गुरूचा वापर ढालीसारखा केला आणि संसदेवरील हल्ल्यासाठी कट्टरतावाद्यांची मदत करायला त्याला भाग पाडलं, असा दावा पत्रात करण्यात आला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)