Mahatma Gandhi: भारतीय नोटांवर महात्मा गांधी कुठून आणि कसे आले?

नवीन भारतीय नोटांवरही गांधीजी कायम आहेत Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नवीन भारतीय नोटांवरही गांधीजी कायम आहेत

भाजप नेते आणि राज्यसभेतले खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भारतीय रुपयाची परिस्थिती सुधारण्यासाठी दिलेला सल्ला सध्या चांगलाच चर्चेत आहे.

चलनी नोटांवर लक्ष्मी देवीचा फोटो छापला जावा अशा मताचे आपण असल्याचं विधान स्वामी यांनी केलं. मध्य प्रदेशातल्या खांडव्यामध्ये बुधवारी (15 जानेवारी) स्वामींनी विवेकानंद व्याख्यानमालेनंतर पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्यं केल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिलंय.

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणाऱ्या मूल्याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं.

इंडोनेशियाच्या चलनी नोटेवर गणपतीचा फोटो असल्याचं सांगत स्वामींनी म्हटलं, "याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. पण मी या मताचा आहे. भगवान गणेश विघ्नं दूर करतात. आपल्या देशाच्या चलनाची स्थिती सुधारण्यासाठी नोटेवर लक्ष्मीचा फोटो लावला जाऊ शकतो, आणि कोणालाही यावर आक्षेप नसेल, असंच मला वाटतं."

स्वामींच्या या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

@MrRao_RB या हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, "जर भगवान गणेश इंडोनेशियाची अर्थव्यवस्था सुधारू शकतात तर मग भारतातही हा प्रयोग करून पहायला हरकत नाही. इंडोनेशियाकडे डॉक्टर स्वामींसारखा अर्थशास्त्रज्ञ नाही, पण आमच्याकडे आहे."

"मग अमेरिकन डॉलर इतका मजबूत का आहे? त्यावर तर लक्ष्मीचा फोटो नाही," असा प्रश्न @chintu678 ने विचारला आहे.

पण भारतीय चलनी नोटेवर कोणाचा फोटो असावा हे ठरवण्याचे अधिकार कोणाला आहेत?

चलनी नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो हटवला जाऊ शकतो का?

भारत स्वतंत्र झाल्यापासूनच चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापला जातोय का?

महात्मा गांधीजींच्या आधी नोटांवर कोणाचा फोटो होता आणि चलनी नोटेवर गांधीजींचा फोटो पहिल्यांदा कधी छापण्यात आला?

जगातल्या इतर केंद्रीय बँकांप्रमाणेच भारतातही नोटा प्रसिद्ध करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेला आहेत. (एक रुपयाची नोट मात्र भारत सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात येते.)

कसा झाला रुपयाचा प्रवास?

भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण देश 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या प्रचलित असणाऱ्या नोटा प्रसिद्ध करायला सुरुवात केली.

Image copyright RBI
प्रतिमा मथळा रुपयाच्या जुन्या नोटा

रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर असणाऱ्या माहितीनुसार 1949 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदा एक रुपयाच्या नोटेचं नवीन डिझाईन तयार केलं. यानंतर आता स्वतंत्र भारतासाठीचं नवं चिन्हं निवडायचं होतं.

ब्रिटनच्या राजाच्या जागी नोटेवर महात्मा गांधीचा फोटो लावण्यात येईल, असं सुरुवातीला मानलं जात होतं आणि त्यानुसार डिझाईनही तयार करण्यात आलं होतं. पण शेवटी महात्मा गांधींच्या फोटोच्या ऐवजी चलनी नोटेवर अशोक स्तंभ असावा, यावर एकमत झालं. याखेरीज चलनी नोटेच्या डिझाईनमध्ये फारसे बदल करण्यात आले नाहीत.

Image copyright RBI

1950 मध्ये भारतीय प्रजासत्ताकात पहिल्यांदाच 2, 5, 10 आणि शंभर रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या.

2, 5 आणि शंभर नोटेच्या डिझाईनमध्ये फारसा फरक नव्हता, पण रंग वेगवेगळे होते. 10 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूला शिडाच्या होडीचा फोटो तसाच ठेवण्यात आला होता.

1953 मध्ये नवीन चलनी नोटांवर हिंदी प्रामुख्याने छापण्यात आली. रुपयाचं बहुवचन काय असेल, याविषयी चर्चा झाली आणि रुपयाचं बहुवचन 'रुपये' असेल असं ठरलं.

Image copyright RBI

1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा छापण्यात आल्या. 1978 मध्ये या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.

म्हणजे 1978 मध्ये एक हजार, पाच हजार आणि 10 हजार रुपयांची नोटबंदी झाली होती.

दोन आणि पाच रुपयांच्या लहान चलनी नोटांवर सिंह, हरीण अशा प्राण्यांचे फोटो छापण्यात आले होते. पण 1975 मध्ये 100 च्या नोटेवर कृषी स्वावलंबन आणि चहाच्या मळ्यातून पानं खुडतानाचे फोटो दिसू लागले.

महात्मा गांधींच्या 100 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 1969 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता.

Image copyright RBI

20 रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा 1972 मध्ये चलनात आणली आणि याच्या तीन वर्षांनंतर 1975 मध्ये 50 ची नोट चलनात आणण्यात आली.

80च्या दशकात नवीन सीरीजच्या नोटा छापण्यात आल्या. जुने फोटो हटवून त्यांच्या जागी नवीन फोटो आले. 2 रुपयांच्या नोटेवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आर्यभट्ट उपग्रहाचा फोटो होता. 1 रुपयाच्या नोटेवर तेलाची विहीर, 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरने शेत नांगरणारा शेतकरी, 10 रुपयांच्या फोटोवर कोणार्क मंदिराचं चक्र, मोर आणि शालीमार बागेचं छायाचित्रं होतं.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत होता आणि लोकांची खरेदी क्षमता वाढत होती. म्हणून रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या आणि यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र होतं. अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता.

Image copyright RBI

सुरक्षिततेसाठीची नवीन फीचर्स असणाऱ्या महात्मा गांधी सीरीजच्या नोटा 1996 साली छापण्यात आल्या. वॉटरमार्कही बदलण्यात आले आणि अंध लोकांनाही नोटा ओळखता याव्यात यासाठीची नवीन फीचर्स यामध्ये सामील करण्यात आली.

9 ऑक्टोबर 2000 रोजी एक हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली.

भारतीय चलनामध्ये सगळ्यात मोठा बदल दुसऱ्यांदा नोव्हेंबर 2016 ला करण्यात आला. 8 नोव्हेंबर 2016 ला महात्मा गांधी सीरीजच्या 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा अवैध घोषित करण्यात आल्या.

यानंतर 2000 रुपयांची नवीन नोट चलनात आणली गेली. यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)