CAA-NRC: नरेंद्र मोदी यांच्या नागरिकत्वाचे पुरावा द्या- RTI अर्ज #5मोठ्याबातम्या

मोदी Image copyright PTI
प्रतिमा मथळा

आजचे पेपर आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. नरेंद्र मोदींच्या नागरिकत्वाचा पुरावा द्या- माहिती अधिकारात अर्ज

देशभरात नागरिकत्व कायद्यातील सुधारणेविरोधात आंदोलनं सुरू असताना माहितीच्या अधिकाराखाली मात्र एक नवा अर्ज दाखल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे नागरिक आहेत का, असा प्रश्न विचारणारा अर्ज केरळच्या माहिती आयोगाकडे दाखल झाला आहे.

त्रिशूर जिल्ह्यातील जोश कालुवीतील यांनी 13 जानेवारी रोजी हा अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे नागरिक आहेत हे सिद्ध करणारी कागदपत्रं त्यात मागितली आहेत.

हा अर्ज त्रिशूर जिल्ह्यातल्या चलाक्कुडी पालिकेतील माहिती अधिकाऱ्यांकडे हा दाखल करण्यात आला आहे. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

2. केरळने राहुल गांधी यांना निवडून देऊन आरिष्ट आणलं- रामचंद्र गुहा

"राजकीय कुटुंबातल्या पाचव्या पिढीतल्या राहुल गांधींचा स्वतःच्या बळावर उभ्या असलेल्या नरेंद्र मोदींसमोर काहीच टिकाव लागण्याची संधी नाही. केरळने राहुल गांधींना निवडून देऊन आरिष्टच आणलंय," असं विधान इतिहासकार आणि ज्येष्ठ लेखक रामचंद्र गुहा यांनी केलं आहे.

न्यूज 18. कॉमने हे वृत्त दिले आहे.

Image copyright RAMCHANDRA GUHA

"मला राहुल गांधी यांना वैयक्तिकरीत्या काहीही म्हणायचं नाहीये. ते अत्यंत सुस्वभावी आहेत, मात्र तरुणांच्या भारताला राजकीय घराण्यातल्या पाचव्या पिढीतला नेता नकोय. जर तुम्ही (केरळच्या लोकांनी) 2024 साली त्यांना पुन्हा निवडून दिलं तर तुम्ही नरेंद्र मोदींना उघड मदत केल्यासारखं आहे," असं ते पुढे म्हणाले.

केरळच्या लोकांनी अत्यंत चांगल्या गोष्टी केल्या आहेत, मात्र राहुल गांधींना निवडून देऊन मात्र तुम्ही आरिष्ट आणलंय, असं ते म्हणाले.

3. केरळनंतर पंजाब सरकारही CAA विरोधात

केरळपाठोपाठ पंजाब सरकारनेही CAA विरोधात निर्णय घेतला आहे. या कायद्याला विरोध करणारं पंजाब हे पहिलं काँग्रेसशासित राज्य ठरलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या कायद्याला सुरुवातीपासून विरोध केला होता.

हा कायदा "मानवी आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांच्या विरोधात" असल्याचं स्पष्ट करत पंजाबचे विधिमंडळ कामकाज मंत्री ब्रह्म मोहिंद्रा यांनी हा ठराव मांडला. या कायद्यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का बसतो, असं या ठरावात म्हटलं आहे. द वीकने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. सरकार 5 वर्षं चालवायचंय- पवारांचा संजय राऊतांना सल्ला

उदयनराजे यांना ते शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणे, 'मी दाऊदला दम दिला होता', 'करीम लाला याला भेटायला इंदिरा गांधी पायधुणीला यायच्या', अशी काही विधानं केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वादात सापडले आहेत.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना विचारलं असता, "मी या विधानापासून दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होतं," असं ते म्हणाले. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

"यानंतर त्यांनी अस्वस्थता निर्माण करणारं वक्तव्य करू नये अशी सूचना मी करणार नाही, सगळे शहाणे आहेत. सरकार 5 वर्षं चालवायचं आहे. काँग्रेस याबाबतीत व्यवहारी आहे," असा सूचक इशाराही त्यांनी केला.

5. मेगाभरती ही चूकच- चंद्रकांतदादा पाटील

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी केलेल्या भरतीमुळे भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का बसलाय, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

"भाजपला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. तेव्हापासून पक्षात चलबिचल सुरू झाली होती. अन्य पक्षातील नेत्यांना प्रवेश दिल्यामुळे नुकसान झालं, असंही त्यांनी सांगितलं. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

Image copyright FACEBOOK

अन्य पक्षांमधील नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने नुकसान झाल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी दिली.

"उमेदवारी मागावी लागू नये, ही भाजपची संस्कृती आहे. मेगाभरतीमध्ये ही संस्कृती कुठेतरी ढासळली. ती संस्कृती नव्याने विकसित करण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या धारणा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, की हा पक्ष प्रेमावर चालतो, आपुलकीवर चालतो, गुणवत्तेवर चालतो," असं ही ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)