आदित्य ठाकरे: 'मुंबई 24 तास' या संकल्पनेमुळे शहरात काय बदल होतील?

आदित्य ठाकरे, नाईटलाईफ, 24 तास, मुंबई Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आदित्य ठाकरे

झोपी न जाणारं शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईत आता रात्रभर हॉटेलं आणि मॉल्स सुरु ठेवता येणार आहेत. मुंबईतील काही हॉटेल्स, मॉल्स 26 जानेवारीपासून 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबईत अशा पद्धतीने रात्रजीवन सुरु असावं असं युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वप्न होते. पर्यटनमंत्री आदित्य यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत रात्रजीवन सुरु करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेने केलेल्या तयारीची माहिती दिली.

रात्रजीवनाच्या संकल्पनेशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निगडीत असल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वेही या बैठकीला उपस्थित होते. मुंबईत 26 जानेवारीपासून रात्रजीवन सुरू करण्यास बैठकीत हिरवा कंदील देण्यात आला.

''मद्यविक्रीवरील बंधने कायम राहणार आहेत. चौपाटीसारख्या ठिकाणी खाद्यपदार्थ विकता येतील. आस्थापना 24 तास सुरु ठेवण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही पण जिथे कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल तेथे आम्ही बंधने घालू शकतो,'' असं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितलं.

''हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे शहरातील पर्यटनवाढ आणि व्यवसायास चालना मिळेल,'' असं इंडियन हॉटेल अॅंड रेस्तराँ असोसिएशनचे (AHAR) अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी सांगितलं लोकसत्ताला सांगितलं.

नाईटलाईफ सुरू होणार म्हणजे काय?

नवीन कायद्यानुसार कोणतेही दुकान आणि आस्थापन 24 तास खुले राहू शकते. मात्र यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ज्या आस्थापनांना स्वत:चे प्रवेशद्वार, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत अशा मॉल आणि चित्रपटगृहांसारख्या आस्थापनांमधील दुकाने, हॉटेल्स सुरू ठेवता येतील.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुंबई नाईट लाईफ

निवासी परिसरात नसलेल्या, पण पार्किंगची सुविधा असलेल्या ठिकाणी सुविधा असेल.

27 जानेवारीपासून याची अंमलबजावणी होईल. पहिल्या टप्प्यात निवासी भागात नसणारी काही हॉटेल्स-मॉल्स-मल्टिप्लेक्स रात्रभर खुली राहतील.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबतचा प्रस्ताव पूर्वीच मंजूर केला होता. मात्र मुंबई महापालिकेच्या सज्जता-पोलिसांचे कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचे प्रश्न होते. यामुळे अंमलबजावणी प्रलंबित होती.

आदित्य ठाकरे काय म्हणतात?

विरोधक माहिती न घेता बोलत असतात. नाईटलाईफ आणि 'मुंबई 24' तास यात फरक आहे. त्यांच्या मनात ज्या नाईटलाईफ ृविषयी ज्या कल्पना आहेत त्या माझ्या मनात नाहीत. मी जे सुरु करतोय ते मुंबई 24 तास आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रसारमाध्यमं, राजकारणी तसंच अन्य अनेक क्षेत्रातील माणसं 24 तास काम करतात. काही विकत घ्यायचं असेल, काही खायचं असेल तर पंचतारांकित ठिकाणं सोडली तर अन्य ठिकाणी मिळत नाही.

मुंबई 24 तास चालणारं शहर आहे. या शहरामध्ये मॉल आणि मिल कंपाऊंड म्हणजे जिथे आत रहिवासी नाहीत, पार्किंग आहे, सीसीटीव्ही आहे, सगळे परवाने आहेत, सगळं कायदेशीर आहे तिथे खाण्याचे पदार्थ मिळू शकतील. पिक्चर पाहायचा असेल तर तो पाहता येईल. शॉपिंग करायची असेल तर तेही करता येईल.

ऑनलाईन शॉपिंग 24 तास उपलब्ध असतं. पण दुकानं रात्री बंद असतात. ज्यांना दुकानं, इटरी, कॅफेज, थिएटर्स 24 तास खुलं ठेवायची आहेत त्यांना नियमांच्या चौकटीत राहून सुरु ठेवता येईल.

एक्साईजचे मापदंड बदलले जात नाहीये. पब, बार त्यांच्या ठरलेल्या वेळी बंद होतील. खायला पदार्थ मिळतात, कॉफीशॉप्स असतील, थिएटर असतील ते सुरु राहू शकेल. यासंदर्भात विचार केलेला आहे. पोलीस आणि महापालिका दोन्ही यंत्रणांनी अभ्यास केला आहे. नियमांच्या अधीन राहून दुकान 24 तास सुरु राहाण्याची मुभा देण्यात येत आहे मात्र हे सक्तीचं असणार नाही. मुंबईकरांनी याचं स्वागत केलं आहे. जगभरात लंडनची नाईटलाईफ 5 बिलिअन पाऊंड्सची आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुंबईतलं दृश्य

दुकानं जशी उघडी असतील तसं बेस्टच्या बसेस, ओला, उबरच्या टॅक्सी चालू राहातील. यातून नवी अर्थव्यवस्था तयार होईल. मुंबई आताही 24 तास सुरू असते. अर्थव्यवस्थेला फॉर्मलाईज करणं आवश्यक आहे. करांच्या माध्यमातून राज्याला निधी उपलब्ध होईल. इंदूरमध्ये सराफा मार्केटमध्ये रात्री चॅट पदार्थ मिळतात. ही संकल्पना 2013 मध्ये केली होती. गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये ही संकल्पना राबवली जात आहे. कष्ट करणारे, काम करणारी माणसं मुंबईत राहतात.

'अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते'

24 तास हॉटेल्स उघडी राहिली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं मत फूड हिस्टोरिअन कुरुश दलाल यांनी व्यक्त केलं.

''24 तास हॉटेल्स, कॉफीशॉप, मॉल्स खुले असतील तर त्यांना अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल. नवीन भरती होऊ शकते, त्यांना उदरनिर्वाहाचं साधन मिळू शकतं. ही आस्थापनं जो कर भरतील त्यातून सरकारला निधी मिळू शकतो. लोकांना ही संकल्पना भावली तर रात्रीच्या वेळीही अर्थाजन होऊ शकतं. ही एक साखळी प्रक्रिया आहे ज्यातून अर्थव्यवस्थेला लहान प्रमाणावर को होईना चालना मिळू शकते," असं कुरुश दलाल सांगतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुंबईतील मॉलमधलं दृश्य

पण याचबरोबर वाहतुकीच्या सुविधांचं योग्य व्यवस्थापन व्हावं असं दलाल यांना वाटतं.

ते सांगतात, "मुंबई 24 तास ही संकल्पना छान आहे मात्र याकरता संलग्न यंत्रणा तितकीच कार्यक्षम असणं आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी प्रवासासाठी बस-ट्रेन्स उपलब्ध आहेत का? का लोकांना ओला-उबरवरच अवलंबून राहावं लागेल. रात्रीच्या वेळेस छोट्या बसेस उपलब्ध झाल्या तर ऑटोमोबाईल उपकरणांची गरज वाढू शकते. पोलिसांकडे आधीच अपुरं मनुष्यबळ आहे. रात्रीच्या वेळेस सुरक्षा पुरवण्याइतपत मनुष्यबळ आहे का? त्यांच्यावर विविध कामांचं दडपण आहे. या गोष्टींचाही विचार व्हायला हवा.

"रात्री काम करणाऱ्या माणसांबद्दल काही गैरसमज आहेत. ते दूर होणं आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालयांमधून या संकल्पनेसंदर्भात जागरुकता होणे आवश्यक आहे. नीट राबवण्यात आली तर मुंबई 24 तास हे अनेकांसाठी उपयुक्त ठरू शकतं. मात्र त्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय तसंच सुरक्षेला प्राधान्य असायला हवं," दलाल सांगतात.

'गाजराची पुंगी वाजली तर वाजली असं व्हायला नको'

मुंबई 24 तास किंवा नाईटलाईफ असं काही राबवायचं असेल तर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत 'लोकप्रभा'चे संपादक विनायक परब यांनी व्यक्त केलं.

"दुकानं, कॉफी शॉप, मल्टीप्लेक्स रात्री सुरू राहिली तर महिला, मुलीही जातील. रात्री फिरताना कोणतीही भीती मनात असायला नको. सध्याचं वातावरण सुरक्षित वाटण्याचं नाही. त्यामुळे या मुद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही," असं परब सांगतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गेटवे ऑफ इंडिया

"गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर नाही असा दृष्टिकोन ठेऊन हा उपक्रम राबवू नये. यासाठीचं रेव्हेन्यू मॉडेल कागदावर असायला हवं. टार्गेट ओरिएंटेड असायला हवं. हौशीगवशी कारभार नको. मुंबई हे शहर धावतं आणि ऊर्जामय शहर आहे.

"नाईटलाईफ म्हणजे दारू, पार्टी असं नाही. अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात. दक्षिण मुंबईत हेरिटेज वॉक आयोजित केले जाऊ शकतात. खेळ, कला क्षेत्रासंदर्भात कार्यक्रम होऊ शकतात. पण हे सगळं मुंबईतल्या विशिष्ट भागांपुरतं मर्यादित राहायला नको. यातून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. मुंबई हे यासाठी अनुकूल शहर आहे. कारण इथे विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात," असं परब सांगतात.

'मुंबई आणखी आंतरराष्ट्रीय होऊ शकते'

"नाईटलाईफ किंवा रात्री आस्थापनं सुरू राहिलं तर मुंबई आणखी आंतरराष्ट्रीय आणि कॉस्मोपॉलिटन होऊ शकते. सिंगापूर, लंडन अशा अनेक शहरांमध्ये ही संस्कृती प्रचलित आहे. मुंबई त्यादृष्टीने आणखी एक पाऊल टाकू शकतं", असं अर्थशास्त्रज्ञ शंकर अय्यर यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "मुंबई सदैव जागं असणारं शहर आहे. आताच्या निर्णयाने मुंबईचं जागेपण व्यापक होऊ शकतं. त्यासाठी आवश्यक सुरक्षायंत्रणा, वाहतूक व्यवस्था पुरवणं आवश्यक आहे.

रात्री दुकानं, हॉटेल्स, मल्टिप्लेक्स खुली असतील तर त्यांना अतिरिक्त कर्मचारी वर्ग नियुक्त करावा लागेल. त्यातून रोजगार निर्माण होऊ शकतो. मात्र याने अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते का? हे लोकांच्या वागण्यातून स्पष्ट होऊ शकेल. रात्री आस्थापन खुलं ठेवणं बंधनकारक नाही. त्यामुळे ज्यांनी निकष पूर्ण केले आहेत आणि ज्यांना यामध्ये काही फायदा दिसतो तेच सुरू ठेवतील".

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)