शिर्डी की पाथरी, साई बाबा यांचा जन्म नेमका कुठे झाला?

शिर्डीचं साई मंदिर Image copyright Sai.org.in
प्रतिमा मथळा शिर्डीचं साई मंदिर

"सबका मालिक एक" अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

साईबाबांचं जन्मस्थळ म्हणून महाराष्ट्र शासनाने पाथरीला 100 कोटींचा निधी जाहीर केला आहे. पाथरीला जन्मस्थळ घोषित केल्यावरून शिर्डीकर नाराज झाले आणि त्यांनी रविवारी बंद पुकारला होता. त्यांच्या बंदाला प्रत्युत्तर म्हणून पाथरीकरांनीही बंद पुकारल्याचं सांगितलं जातंय.

साईबाबा आमच्याच गावात जन्मले होते, याचे आमच्याकडे 29 पुरावे असल्याचं पाथरीचे लोक सांगत आहेत, तर त्या 29 पुराव्यांपैकी निदान एक तरी सबळ पुरावा द्या, केवळ तर्क नको, असं शिर्डीकर म्हणत आहेत.

या वादावर तोडगा काढण्यासाठी 20 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतरच या वादावर तोडगा काय निघेल याची दिशा स्पष्ट होईल. पण हा नेमका वाद काय आहे आणि याची पाळंमुळं कुठे आहेत हे आपण बघू या.

पाहा हा व्हीडिओ -

पाथरी जन्मस्थळ असल्याचा दावा कुठून आला?

औरंगाबादकडून नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वेत तुम्ही बसलात तर एक स्टेशन येतं मानवत रोड. तिथं कित्येक वर्षांपासून एक बोर्ड लावलेला आहे. 'साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीसाठी इथे उतरावे.' अर्थात हा काही पुरावा नाही, पण पाथरी साईबाबांचे जन्मस्थळ आहे, अशी पाथरीकरांची आणि त्या भागातील लोकांची श्रद्धा आहे.

Image copyright Saibaba Janmasthal Mandir Trust Pathri
प्रतिमा मथळा या काचेआडची भिंत म्हणजे साईबाबांचं जन्मस्थळ आहे, असं सांगितलं जातं.

साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचा पुरावा काय, असं विचारलं असता 'साईबाबा जन्मस्थळ मंदिर ट्रस्ट, पाथरीचे अध्यक्ष अतुल चौधरी सांगतात की "साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये 1838 मध्ये झाला होता. माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे चिरंजीव विश्वास खेर यांनी तीस वर्षं संशोधन करून सांगितलं होतं की साईबाबांचं जन्मगाव पाथरी आहे.

"पाथरीपासून जवळच असलेल्या सेलू या गावी केशवराज महाराज म्हणजेच बाबासाहेब महाराजांचं मंदिर आहे. बाबासाहेब हे साईबाबांचे गुरू होते हीच आमची श्रद्धा आहे.

"याबरोबरच गोविंद दाभोलकर यांनी लिहिलेल्या आणि 1974ला शिर्डी साई संस्थानने छापलेल्या साईसच्चरित्राच्या आठव्या आवृत्तीमध्ये लिहिल्यानुसार साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाला आहे. माझ्या आई-वडिलांनी मला एका फकिराच्या झोळीत टाकल्याचं साईबाबांनी आपले एक शिष्य म्हाळसापती यांना सांगितलं होतं," असं चौधरी यांनी सांगितलं.

"साईबाबा यांचं मूळ नाव हरिभाऊ भुसारी होतं. त्यांचे मोठे बंधू देखील एक फकीरच होते त्यामुळे साईबाबांवर त्यांच्या भावाचा प्रभाव पडलेला असू शकतो. पाथरी हे गावच मुळात मुस्लीमबहुल आहे. या ठिकाणी अनेक फकीर आणि वली होऊन गेले आहेत. जर त्यांच्या कहाण्या जगासमोर आल्या असत्या तर पाथरीला पूर्ण जगात महत्त्वाचं स्थान मिळालं असतं. अशा लोकांचा प्रभाव साईबाबांवर झाल्यामुळेच त्यांची वेशभूषा मुस्लीम फकिराची आहे," असं चौधरी सांगतात.

याच बरोबर संत दासगणू यांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये साईबाबांचा जन्म पाथरीला झाला होता असा उल्लेख आढळतो असं चौधरी सांगतात.

'आठवी आवृत्ती कुठे आहे?'

"ज्या आठव्या आवृत्तीच्या आधारे पाथरीचे लोक साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी आहे असा दावा केला जात आहे त्या पुस्तकाची आठवी आवृत्ती शिर्डी संस्थानाच्या लेखागारात नाही," अशी माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली.

Image copyright ANI

"ज्या पुस्तकाच्या आधारे पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करत आहेत ती आठवी आवृत्ती विश्वास खेर यांच्या काळातीलच आहे. त्या आधीच्या आवृत्तींमध्ये तो उल्लेख नाही आणि आता 36 वी आवृत्ती सुरू आहे त्यातही तो उल्लेख नाही. आमच्याकडे दाभोलकरांनी लिहिलेलं हस्तलिखित आहे. त्यातही तो उल्लेख नाही मग आठव्या आवृत्तीत हा उल्लेख कुठून आला असा प्रश्न हावरेंनी विचारला.

साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत केवळ पाथरीतूनच दावे आले नाहीत तर तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातूनही दावे आलेले आहेत. लोकांची साईबाबांवरील श्रद्धा आम्ही समजू शकतो पण त्याला ठोस पुरावा काही नाही इतकंच आमचं म्हणणं आहे, असं हावरे सांगतात.

'साईबाबांची चरित्रं ही भक्तानींच लिहिली आहेत'

साईबाबा यांचा जन्म कुठे झाला याबाबत निश्चितपणे सांगता येण्यासाठी चरित्र हा आधार असू शकतो का असं विचारलं असता साईबाबांच्या चरित्राचे अभ्यासक आणि लोकमुद्रा मासिकाचे संपादक राजा कांदळकर सांगतात, साईबाबांवर लिहिली गेलेली बहुतांश चरित्रं ही त्यांच्या भक्तांनेच लिहिली आहेत.

"इतिहासकार ज्या प्रमाणे ठोस पुराव्यांच्या आधारे, कागदपत्रं किंवा वस्तूंच्या आधारे इतिहासाची मांडणी करतो, घटनाक्रम तपासतो तशी ही चरित्रं नाहीत. लिहिणाऱ्यांचा उद्देश चुकीचा नाही पण त्यावेळी छापल्या गेलेल्या दस्तावेजांमध्ये आपण जे लिहित आहोत त्याला काही प्रमाण आहे का हे त्या लेखकांनी तपासून पाहिल्याचं दिसत नाही."

Image copyright BBC / Gulshankumar Wankar
प्रतिमा मथळा साईबाबांवर लिहिली गेलेली बहुतांश चरित्रं ही त्यांच्या भक्तांनेच लिहिली आहेत, असं साईबाबांच्या चरित्रांचे अभ्यासक राजा कांदळकर सांगतात.

"अहमदनगर जिल्ह्यात त्यावेळी 'दीनबंधू' छापलं जायचं. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते मुकुंदराव पाटील त्यावेळी दीनबंधूचे संपादक होते. पण साईबाबांबद्दल केवळ एकच उल्लेख त्यांनी केला आहे. त्यावेळी केसरी हे वर्तमानपत्र येत असे. त्यातही साईबाबांबद्दल लिखाण झाल्याचं दिसून येत नाही. लोकमान्य टिळक आणि इतर मोठे पुढारी साईबाबांना भेटण्यासाठी येत असत असं गावातले लोक सांगतात पण याचा लिखित पुरावा नाही. साईबाबांनी एकदा मॅजिस्ट्रेट समोर साक्ष दिली होती. तेव्हा देखील त्यांनी आपला जन्म कुठे झाला याबाबत काहीच सांगितलं नाही. स्वतःचं नाव साईबाबा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं," असं कांदळकर सांगतात.

रामनाथ कोविंद यांनी दिली होती पाथरीला भेट

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 2016 मध्ये पाथरीला भेट दिली आहे. त्यावेळी ते बिहारचे राज्यपाल होते, असं चौधरी सांगतात.

साईबाबांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले होते, 'साई जन्मस्थळ पाथरीचा विकास होणं आवश्यक आहे.' त्यांनी साईबाबांचा जन्मस्थळ म्हणून पाथरीचा उल्लेख करणं अनेकांना पटलं नाही.

Image copyright Saibaba Janmasthal Mandir Trust Pathri
प्रतिमा मथळा साईबाबा जन्मस्थळ मंदिर पाथरीला रामनाथ कोविंद यांनी भेट दिली होती.

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की 'रामनाथ कोविंद यांना कुणीतरी चुकीची माहिती दिल्यामुळेच त्यांच्याकडून असा उल्लेख झाला असावा.'

यावर तोडगा काय निघू शकतो?

सध्या निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेची तयारी ही पाथरी आणि शिर्डीकरांची आहे. चौधरी म्हणतात "आमच्याकडे 29 पुरावे आहेत. ते पुरावे सरकारकडे सुपूर्त करण्याची आमची तयारी आहे. ते अभ्यासून, तपासून सरकारने निर्णय द्यावा. त्याला आमची काही हरकत नाही."

"सरकारकडून अनावधानाने पाथरी हे जन्मस्थळ आहे असा दावा करण्यात आला आहे. तेव्हा सरकारनेच आपली चूक दुरुस्त करावी," असं हावरे यांना वाटतं. "अभ्यासाच्या आणि पुराव्याच्या आधारावरच निर्णय घेण्यात यावा. हा भावनिक आणि श्रद्धेचा विषय आहे सरकारने जपून हाताळावा," असं हावरे यांना वाटतं.

100 कोटींच्या निधीचं करणार?

पाथरीचा विकास करण्यासाठी शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. 'शंभर कोटी निधी फक्त मंदिरासाठी आहे असा गैरसमज पसरवला जात आहे,' असं म्हणणं आहे विधान परिषदेचे आमदार आणि पाथरी जन्मस्थान कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांचं.

ते सांगतात की "शासनाने 100 कोटी मंजूर केले आहेत हे खरं आहे पण याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात झाली होती. 100 कोटी रुपयांपैकी निम्मे पैसे हे लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी लागतील.

"साईमंदिराच्या भोवतालचा रस्ता रुंद करण्यासाठी अनेक कुटुंबांना आपलं राहतं घर सोडावं लागणार आहे. त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यांच्यासाठी हे पैसे लागतील. भक्तनिवास, अन्नछत्र, शौचालय यासारख्या पायाबूत सुविधांसाठी पैसे लागतील. एकट्या भक्तनिवासाचाच खर्च 10 कोटींच्या घरातला आहे."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शिर्डीचं साई मंदिर

पाथरीला शंभर कोटी मिळाले म्हणून शिर्डी आहेत आणि त्यातून शिर्डीत बंद पुकारला जात असण्याची शक्यता आहे का, असं विचारलं असता हावरे सांगतात, "हा अत्यंत चुकीचा समज आहे. पाथरीच्या विकासाला आणि मंदिराला 100 काय, 200 कोटी दिले तरी शिर्डीकरांची त्यावर हरकत नाही. फक्त मुद्दा हा आहे की शासनाने पाथरी हे जन्मस्थळ आहे, अशी मान्यता पुराव्यांशिवाय देऊ नये."

साईबाबांचं हिंदुत्वीकरण होतंय?

साईबाबा जन्माने हिंदू होते असं सांगून साईबाबांचं हिंदुत्वीकरण करण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी भीती काही लोकांकडून व्यक्त केली जात आहे. याबद्दल विचारलं असता चौधरी सांगतात की "साईबाबा जन्माने कुणी जरी असले तरी त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही फरक पडत नाही. साईबाबांच्या मंदिरात सर्व जाती-धर्माचे लोक येतात. साईबाबांची शिकवण ही 'सबका मालिक एक' हीच आहे. तिला तडा जाईल असं आम्ही काही करणार नाही."

Image copyright Sai.Org.In

दरम्यान, जन्मस्थळाच्या वादात भक्तांची गैरसोय नको, असं मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मांडलं आहे. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले की "साईबाबांच्या जन्मस्थानावरून वाद निर्माण करण्यात येऊ नये. साईबाबा सगळ्यांचे आहेत. ते सर्वच ठिकाणी आहेत. त्यामुळे हा वाद वाढवू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वादावर तोडगा काढतील, यासाठी त्यांनी सोमवारी बैठक बोलावली आहे, असं यांनी सांगितलं.

पाथरी आणि शिर्डीच्या वादाचं काय होईल, हे 20 जानेवारीच्या बैठकीनंतरच आपल्याला कळू शकेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)