Mumbai 24x7: आदित्य ठाकरे यांच्या 'मुंबई नाईटलाईफ' संकल्पनेला अनिल देशमुख यांच्याकडून ब्रेक? #5मोठ्याबातम्या

मुंबई नाईटलाईफ Image copyright AFP

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ संकल्पनेला अनिल देशमुखांकडून ब्रेक?

येत्या प्रजासत्ताक दिनापासून मुंबईत नाईट लाईफ सुरू करणार, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केल्याच्या 36 तासांतच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दलची असमर्थता व्यक्त केली आहे.

मुंबईत नाईटलाईफ सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्तात पोलिसांनी अद्याप तरी केलेली नाही. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून नाईटलाईफचा प्रारंभ अशक्य आहे, असं देशमुख यांनी रविवारी पत्रकारांसमोर स्पष्ट केलं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मात्र त्याचवेळी ही संकल्पना चांगली आहे. येत्या बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय अपेक्षित आहे, असंही त्यांनी सांगितलं.

"नाईट लाईफ सुरू करण्याबाबत पोलिसांची अद्याप पाहणी सुरू आहे. त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळात त्यावर चर्चा झालेली नाही. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत त्यावर चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतर गृह आणि संबंधित विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच मंजुरी दिली जाऊ शकते," असं देशमुख म्हणाले.

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने 2016 मध्ये यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. मात्र राज्य सरकारची अनुमती न मिळाल्याने नाईट लाईफची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती. शिवसेना मंत्र्यांच्या निर्णयाला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी खोडा घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

2. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायलादेखील डोकं लागतं - सुब्रमण्यम स्वामी

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायलादेखील डोकं लागतं, असा टोला भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लगावत सरकारला घरचा अहेर दिला आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्यानं विरोधकांकडून वारंवार मोदी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे.

'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सुब्रमण्यम स्वामी

"सामान्यपणे मंदी महागाईसोबत येत नाही. मागणीत घट झाल्यानंतर सामान्यपणे वस्तूंच्या किमती वाढत नाहीत. मात्र आता भारताच्या अर्थव्यवस्थेत या साऱ्या त्रुटी पाहायला मिळत आहेत. याप्रकारे अपयशी ठरायलादेखील डोकं लागतं, असं या परिस्थितीवर मला गंमतीने म्हणावसं वाटतं," असं स्वामींनी ट्वीट करून म्हटलं आहे.

3. शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच - पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेने 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावेळी काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावला होता, असं चव्हाण यांनी PTIला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

प्रतिमा मथळा पृथ्वीराज चव्हाण

"राजकारणात जय-पराजय असतातच, आम्ही निवडणूक हरल्याने विरोधात बसणार हे स्पष्ट केलं होतं. आताही शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली," असं चव्हाण यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास 40 आमदारांना पक्ष बदलण्यासाठी धमक्या किंवा आमिषं दाखवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

4. कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारीसुद्धा PF योजनेस पात्र - सर्वोच्च न्यायालय

खासगी किंवा सरकारी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF)मध्ये गुंतवलेली रक्कम भावी काळासाठी महत्त्वाचा असतो. कोणत्याही कंपनी किंवा संस्थेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पीएफ आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळाले पाहिजेत, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

'द हिंदू'ने ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सर्वोच्च न्यायालय

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कलम 2 नुसार, कर्मचाऱ्यांच्या परिभाषेत सर्वच पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. मग ते नियमित काम करणारे असोत किंवा कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारी असोत.

खासगी क्षेत्रातील पवन हंस लिमिटेड या कंपनीशी संबंधित एका प्रकरणावरच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. न्यायालयानं पवन हंसच्या सर्वच कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कर्मचारी निर्वाह निधी योजनेत समाविष्ट करण्याचा आदेश दिला आहे.

5. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय

रोहित शर्माच्या दिमाखदार शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 7 विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना स्टीव्हन स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर 286 धावांची मजल मारली. स्मिथने 14 चौकार आणि एका षटकारासह 131 धावांची खेळी केली. मार्नस लबूशेनने 54 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. भारतातर्फे मोहम्मद शमीने 4 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहित शर्माने वनडे करिअरमधील 29व्या तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8व्या शतकाची नोंद केली. रोहितने 8 चौकार आणि 6 षटकारांसह 119 धावांची मॅरेथॉन खेळी केली. कर्णधार कोहलीने त्याला चांगली साथ देताना 89 धावांची खेळी साकारली.

रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच तर विराट कोहलीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. ू6

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)