HIV AIDS : 'माझ्या पतीने हनीमूनला नकार दिला आणि माझा जीव वाचला'

  • भार्गव परीख
  • बीबीसी गुजरातीसाठी
प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रतिकात्मक छायाचित्र

"अल्लाहच्या कृपेने माझे पती लग्नानंतर लगेच आजारी पडले नसते, तर मलाही एड्स झाला असता आणि माझ्या समलैंगिक पतीमुळे मला नरक यातना भोगाव्या लागल्या असत्या."

25 वर्षांची रहिमा ((नाव बदललेलं आहे) सांगत होती.

MA, M.Ed. झालेली रहिमा शिक्षिका होती. मध्यमवर्गीय कुटुंबातली रहिमा दिसायला सुंदर आणि सुसंस्कृत असल्याने तिच्यासाठी अनेक स्थळं येत होती.

रहिमाच्या वडिलांना तिच्याएवढा शिकलेला मुलगा हवा होता. त्यांना तसा मुलगा मिळालासुद्धा. मात्र, लग्नानंतर जे घडलं त्याची कल्पना या बापलेकींनी कधीच केली नव्हती.

लंडनमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत असलेल्या एका देखण्या मुलासोबत रहिमाचं लग्न झालं. रहिमाच्या वडिलांचा अहमदाबादच्या जमालपुऱ्यात जीन्स-पॅन्ट बनवण्याचा कारखाना आहे.

ते सांगतात, "आमच्या कुटुंबातले काही जण त्यांना ओळखायचे आणि आमचं नातंही निघालं. घराणंही चांगलं होतं. मुलगा लंडनमध्ये नोकरी करत होता. आम्ही आनंदी होतो. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीचं लग्न त्या मुलाशी ठरवलं.

"लग्नासाठी मुलीला नोकरी सोडावी लागेल, अशी अट त्यांनी ठेवली. आम्ही मान्य केली," असं तिच्या अब्बांनी सांगितलं.

फोटो स्रोत, BHARGAV PARIKH

रहिमा सांगत होती, "वडिलांनी विचारपूर्वकच निर्णय घेतला असेल, असा विचार करून मीही होकार दिला. लग्नाआधी मी शाहिदला (नाव बदललं आहे) भेटले. त्याने मला लंडनची अनेक स्वप्नं दाखवली."

...म्हणून लग्न झालं

"मला सांगितलं की तो लंडनमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत आहे आणि त्याला शिकलेली आणि घर सांभाळणारी बायको हवी." ती पुढे म्हणाली, "त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की मला माझी शिक्षिकेची नोकरी सोडावी लागेल. त्यांची नोकरी लंडनला होती, त्यामुळे ते म्हणाले ते जाऊन येतील. सहा-सात महिन्यात लग्न करू.

"आम्ही भेटलो तेव्हा ते हेही म्हणाले की ते नवीन घर बांधत आहेत आणि लग्नानंतर आम्ही नव्या घरात राहायला जाऊ. माझीही खूप स्वप्नं होती. त्यामुळे मी त्यांच्या सर्व अटी मान केल्या आणि नोकरी सोडली."

"साखरपुडा करून ते लंडनला गेले. मी कधी कॉल केला की ते नोकरीचं कारण सांगायचे. म्हणायचे व्हिडियो कॉल किंवा व्हॉट्सअप कॉल करू नकोस. साधा कॉल तुला महाग पडेल त्यामुळे मीच कॉल करेन."

"लग्नाआधी दर चौथ्या दिवशी ते फोन करायचे आणि खूप बोलायचे. त्यानंतर ऑक्टोबर 2019 ला ते भारतात आले आणि नोव्हेंबरमध्ये आमचं लग्न झालं. मी त्यांना सांगितलं होतं की आपण हनीमूनला जाऊया, पण त्यांनी हनीमूनला जाण्यास नकार दिला."

फोटो स्रोत, BHARGAV PARIKH

नवीन घरासाठी शाहीदने रहिमाच्या वडिलांकडे टीव्ही, वॉशिंग मशीन मागितली. तिच्या वडिलांनी ती दिलीसुद्धा.

ती पुढे सांगते, "लग्नानंतर मी सासरी गेले. पण माझे पती माझ्यापासून दूर राहू लागले. दिवसभर लॅपटॉप आणि फोनवर असायचे. लग्नापूर्वीचा रोमॅंटिक बोलणं आता बंद झालं होतं."

"लग्नानंतर ते माझे सासरे आणि नणंदेसोबत सारखे डॉक्टरांकडे जायचे. मी त्यांना विचारलं की काय झालंय, तर काहीच सांगायचे नाही."

"एकदिवस ते बेडरूममध्ये लॅपटॉपवर काम करत होते. तेव्हा मी त्यांना गमतीत विचारलं, "तुम्हाला माझ्यात इंटरेस्ट नाही. तुम्ही पुरुष तर आहात ना?"

"तर ते माझ्यावर चिडले आणि सांगितलं की त्यांना माझ्यात अजिबात रस नाही," रहिमा सांगते.

"मी समलैंगिक आहे. लंडनमध्ये मी एका समलैंगिकाशी लग्न केलं आहे," असं शाहीदने रहिमाला सांगितलं. "माझे आईवडील म्हणाले मी भारतात येऊन लग्न केल्यावर सगळं काही विसरून जाईन. तुझ्याशी लग्न केल्यानंतर सगळं सामान्य होईल," असं शाहीदच्या आईवडिलांनी त्याला सांगितलं होतं, असं रहिमाने सांगितलं.

रहिमाने अशी मिळवली सुटका

रहिमा पुढे सांगते, "हे लग्न बळजबरीने लावलेलं आहे. मी माझी नोकरी सोडली होती. मी माझ्या सासूला सगळं सांगितलं तर त्यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला.

"वडिलांना वाईट वाटू नये, म्हणून मी सुरुवातीला त्यांना काहीच सांगितलं नाही. एक दिवस मला माझ्या पतीच्या फोनमध्ये त्याने एका मुलाशी लग्न केल्याचा फोटो दिसला. तो फोटो मी माझ्या फोनमध्ये घेतला."

"दरम्यानच्या काळात माझे सासू-सासरे, नणंद शाहीदला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे घेऊन जायचे. पण त्यांना काय झालंय, हे कुणीच मला सांगत नव्हतं. एक दिवस त्यांच्या मेडिकल रिपोर्टची झेरॉक्स काढण्याची संधी मला मिळाली."

ती सांगते, "त्यांच्या घशात त्रास होता. त्यांना काहीही गिळता येत नव्हतं. 8 जानेवारीला त्यांनी रक्ताची उलटी केली. मी माझ्या सासऱ्यांना कॉल केला."

फोटो स्रोत, BHARGAV PARIKH

रहिमाच्या वडिलांनी सांगितलं, "त्याचे रिपोर्ट्स आम्ही डॉक्टरांना दाखवले. त्यांनी सांगितलं माझ्या जावयाला एड्स आहे. बरं झालं जावई आणि माझ्या मुलीत शरीर संबंध झाला नाही अन्यथा माझ्या मुलीलाही एड्स झाला असता."

रहिमाने सांगितलं, "आम्हाला 10 जानेवारीला हे कळलं. माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ते म्हणाले, मला यातली कशाचीच कल्पना नव्हती. इतकंच नाही तर तुमच्या मुलीमुळेच माझ्या मुलाला हा आजार झाला, असा बोभाटा करू, अशी धमकी त्यांनी माझ्या वडिलांना दिली."

"माझे वडील घाबरले. त्याच रात्री आम्ही आमच्या काही नातेवाईकांशी चर्चा केली आणि पोलिसांमध्ये तक्रार केली की आम्हाला अंधारात ठेवून हे लग्न करण्यात आलं आहे."

दानिलिमदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वी. आर. वासवा यांनी बीबीसीला सांगितलं, "तक्रार मिळताच आम्ही कारवाई सुरू केली. शाहिद आणि त्याचे कुटुंबीय घरी नाहीत. घर बंद आहे. त्यांचे फोनही बंद आहेत."

फोटो स्रोत, BHARGAV PARIKH

फोटो कॅप्शन,

लग्नाच्यावेळेस काढलेला फोटो

"त्या सर्वांचे मोबाईल आम्ही सर्वेलियन्सवर टाकले आहेत. कुणीही मोबाईल सुरू केला की आम्हाला त्याची माहिती मिळेल. त्यांच्या नातेवाईकांकडेही विचारपूस सुरू आहे."

वासवा यांनी पुढे सांगितलं, "दुर्दैवाने शाहीद लंडनमध्ये कुठल्या कंपनीत नोकरीला होता, याची माहिती कुणालाच नाही. त्यामुळे तपासात थोड्या अडचणी येत आहेत. मात्र, आम्ही लंडनमधल्या भारतीय दूतावासाशी संपर्क केला आहे आणि त्यांना या कुटुंबाची काही माहिती मिळते का, याचा तपास करण्याची विनंती केली आहे."

दुसरीकडे बीबीसीने शाहिदवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की एड्ससारखा आजार असणाऱ्या रुग्णाविषयी ते माहिती देऊ शकत नाही. डॉक्टर म्हणाले, "त्यांना हा आजार होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीचं चेकअप करावं आणि तिला या सर्वाची कल्पना द्यावी, असं आम्ही त्यांना सांगत होतो. मात्र, तिला हॉस्पिटलला आणणं, ते टाळत होते."

हे वाचलं का?

फोटो कॅप्शन,

BBC Indian Sportswoman of the Year

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)