मनसेच्या नव्या झेंड्यावर शिवमुद्रा : 'शिवरायांचा अधिकार स्वतःकडे घेऊ नका'

मनसे झेंडा Image copyright MNS twitter

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचं अधिवेशन बोलावलं.

या अधिवेशनात एक मुद्दा सर्वांत जास्त चर्चेत राहिला. तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बदललेला झेंडा.

पूर्वी निळ्या, भगव्या आणि हिरव्या रंगात असलेला मनसेचा झेंडा आता पूर्णपणे भगवा बनला आहे. खालच्या बाजूला तपकिरी रंगात पक्षाचं नाव लिहिलेलं आहे. पण यात सर्वांत महत्त्वाची आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या झेंड्यावर शिवकालीन राजमुद्रेची प्रतिमा आहे.

मनसेच्या या नव्या झेंड्याचं अनावरण झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या झेंड्यावरून काही जण शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरल्यामुळे राज ठाकरें आणि मनसेवर टीका करताना दिसत आहेत. तर काहीजण झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यास काहीच हरकत नसल्याचं मत व्यक्त करत आहेत.

राजमुद्रेचा समावेश The Prevention of Insult To National Honour 1971मध्ये करण्यात यावा अशी विनंती आर.आर. पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

तसंच निवडणूक आयोगालाही पत्र पाठवून अशी राजमुद्रा वापरण्यापासून मनसे पक्षाला रोखावं असं त्यांनी सांगितलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेप्रती त्यांच्या अनुयायांची श्रद्धा आणि भावना निगडीत आहेत. तिचा पक्षाद्वारे गैरवापर झाल्यास त्यांच्या भावनांना धक्का पोहोचेल आणि कायदा-सुव्यवस्थेलाही धक्का पोहोचेल असं त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Image copyright R.R. Patil Foundtation Maharashtra State
प्रतिमा मथळा विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र

सोशल मीडियावरही नव्या झेंड्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. झेंड्याच्या अनावरणानंतर याबाबत प्रतिक्रियांचा पाऊस पडत असल्याचं चित्र आहे. यापैकी काही प्रतिक्रिया बीबीसीच्या वाचकांसाठी.

'अवहेलना होऊ नये'

झेंड्याचा वापर करताना काळजी घ्यावी, राजमुद्रेची अवहेलना होऊ नये, असं मत नितीन शहासने या फेसबुक वापरकर्त्याने व्यक्त केलं आहे.

नितीन सांगतात, "शिव मुद्रा ज्या गोष्टीवर उमटत होती ती फायनल ऑर्डर होती. ती एक सनद होती ,तो एक अधिकार आहे. आपण हा शिवरायांचा अधिकार स्वतःकडे घेऊ नका."

Image copyright facebook

"झेंड्याचा वापर राजकीय असतो. तो कुठेही लावला जातो, कुठेही वापरला जातो, गाडीला लावला जातो. त्यामुळे तो पडून शिव मुद्रेची अवहेलना होण्याची शक्यता आहे," असं त्यांचं म्हणणं आहे.

तर पक्षाचा ध्वज आणि रंग बदलून मनसेला काय संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न शरद मराठे यांनी विचारला आहे.

Image copyright facebook

कांचन पवार यांनीही झेंडा बदलण्यावर टीका केली आहे. यामुळे जनतेचा विश्वास गमवाल, असं त्यांनी म्हटलंय.

Image copyright facebook

अमोल सपकाळे यांच्या मते, राजमुद्रा महाराजांची ओळख आहे, त्यावरून राजकारण करण्यात येऊ नये.

Image copyright facebook

मनसेच्या बदललेल्या झेंड्यावर केवळ नकारात्मक प्रतिक्रिया आहेत, असं नाही. तर काहीजण पक्षाच्या नव्या झेंड्याचं स्वागत करताना दिसत आहेत.

शिवाजी महाराजांचं नाव वापरून यापूर्वीही राजकारण झालेलं असल्यामुळे यात काही गैर नाही, असं मत काहीजण व्यक्त करत आहेत.

Image copyright facebook

सोशल मीडियावर या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी चर्चेचे फड रंगले आहेत.

Image copyright facebook

हा स्वराज्याचा प्रसार

प्रथमेश करेकर यांनी झेंड्यावरील राजमुद्रेचा वापर म्हणजे स्वराज्याचा प्रसार असल्याचं म्हटलं आहे.

Image copyright facebook

अरूण निकम यांनी हा निर्णय स्तुत्य आहे. परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Image copyright facebook

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)