Maharashtra Bandh : प्रकाश आंबेडकर यांच्या बंदला महाराष्ट्रात समिश्र प्रतिसाद

प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज CAA आणि NRC विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

12.10 AM: राज्यभर बंद असूनही पुण्यातलं जनजीवन सुरळीतपणे चालू असल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

11. 40 AM: हा बंद पूर्णतः स्वयंप्रेरणेने झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट केलं आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली नाही सर्वांनी शांततापूर्ण मार्गाने हा बंद पाळावा असं आंबेडकर म्हणाले.

11. 20 AM: औरंगाबाद येथे एका बसवर दगडफेक झाल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

बंदाच्या आधीच काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांना त्वरित सोडण्यात यावं असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

  • नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात बंद पुकारण्यात येणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं.
  • वंचित बहुजन आघाडीचे घाटकोपर पूर्व तालुका अध्यक्ष चंदन निकालजे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यांची त्वरित सुटका व्हावी अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा?

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे.

सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे.

यासाठी यापूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा, 1955मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल. याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याचीही तरतूद होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून वाद काय?

हा कायदा मुस्लीमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतं, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा आक्षेप विरोधक घेत आहेत.

ईशान्य भारतात, विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे, कारण हे राज्य बांगलादेश सीमेला लागून आहेत. असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररीत्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून, आपला व्होट बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यातच, राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून (National Citizenship Register / NCR) बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल, असाही एक आरोप होतोय.

प्रतिमा मथळा BBC Indian Sportswoman of the Year

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)