IRCTC हून तुमचं रेल्वे तिकीट का बुक होत नाहीये?

रेल्वे तिकिट Image copyright Getty Images

रेल्वेच्या IRCTC या वेबसाइटवरून रेल्वे रिझर्व्हेशन करताना त्रास झाल्याचा अनुभव बहुतेकांना आला असेल. त्यामुळे तुमची चिडचिडही झाली असेल.

बऱ्याचदा तुम्ही स्लो इंटरनेटवर राग काढून मोकळे झाला असताल, पण हे तिकीट बुक न होण्याचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

रेल्वे पोलीस फोर्स (RPF) चे प्रमुख अरुण कुमार यांनी याबाबत खुलासा केला आहे. हमीद अशरफ नावाच्या व्यक्तीने अशी सॉफ्टवेअर सिस्टम डेव्हलप केली आहे की त्यामुळे IRCTCच्या सेक्युरिटी वॉल आणि पेमेंट गेटवे ब्रेक होतात आणि तुमच्या आधी त्यांना तिकीट मिळतं.

एक तिकीट बुक करण्यासाठी साधारणतः एका व्यक्तीला तीन मिनिटं लागतात. पण या रॅकेटने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळे त्यांना तीन तिकिटं बुक करण्यासाठी एक मिनिट लागतो. या टोळीतला एक माणूस शेकडो तिकिटं बुक करू शकतो आणि पूर्ण देशात किमान 20,000 जण फेक तिकीट काढण्याच्या कामात गुंतलेले आहेत, असा रेल्वे पोलिसांचा अंदाज आहे.

दिल्ली येथे झालेल्या प्रेस काँफरन्समध्ये अरुण कुमार यांनी हा खुलासा केला. फेक तिकीट काढण्यात माहीर असलेला गुलाम मुस्तफा या हॅकरला पोलिसांनी अटक केली आहे.

गुलाम मुस्तफाने कॉलेजचंही शिक्षण घेतलेलं नाही, परंतु तो हॅकिंग करत होता. अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. त्याच्या नावावर अनेक सायबर गुन्ह्याची नोंद आहे. गुलाम मुस्तफा आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

'ही टोळी काम कसं करते'

पोलिसांनी गुलाम मुस्तफाला अटक केली. त्याच्याकडे दोन लॅपटॉप मिळाले आहेत. सायबर एक्सपर्टने त्यातली माहिती डिकोड केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की हे सर्व काम ANMS नावाच्या एका सॉफ्टवेअरने सुरू आहे.

या रॅकेटचा मास्टरमाइंड हमीद अशरफ आहे. हमीदवर अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली होती, पण 2016मध्ये तो जामिनावर बाहेर आला. तो नेपाळमार्गे दुबईला गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

हमीद डेव्हलपर आहे. त्याच्या हाताखाली 18 ते 20 रिजनल कमांडर आहेत आणि एका कमांडरच्या हाताखाली किमान 200-300 पॅनल सेलर असतात. एका पॅनल सेलरला महिन्याला 28,000 रुपये मिळतात. पॅनल सेलरच्या हाताखाली एजंट काम करतात. देशात एकूण 20,000 एजंट सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

गुलाम मुस्तफा ANMS या सॉफ्टवेअर सिस्टमचा सुपर अॅडमिन आहे. डार्कनेट, हॅकिंग, बिट कॉइन या गोष्टींमध्ये त्याचा हातखंडा आहे. त्याने कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही, पण त्याने स्वतः शिकून त्याच्या साथीदारांनाही हॅकिंग आणि ANMS चा वापर कसा करायचा हे शिकवलं आहे. गुलामचं वय 28 वर्षं आहे. बंगळुरू पोलिसांनी त्याला भुवनेश्वरहून अटक केली.

Image copyright RPF
प्रतिमा मथळा गुलाम मुस्तफा

IRCTC चा एजंट होण्यासाठी एका प्रमाणपत्राची गरज असते. गुलामने आधी ते मिळवलं. आता त्याच्याकडे एकूण 563 आयडी मिळाले आहेत. लॅपटॉप ट्रेस होऊ नये म्हणून गुलाम विदेशी व्हीपीएन नंबर वापरतो. इतकंच नाही तर त्यांच्याकडे आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करण्याचं सॉफ्टवेअरही आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

ANMS काय आहे?

ANMS एक सॉफ्टवेअर आहे. काळ्याबाजारात जितके सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत त्या तुलनेत ANMSचा वाटा 85 टक्के असल्याचं अरुण कुमार सांगतात.

जेव्हा आपण IRCTC वर मॅन्युअल लॉगिन करतो तेव्हा आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड बरोबरच कॅप्चा टाकावा लागतो. म्हणजे आपण रोबो नाहीत हे सिद्ध करावं लागतं. पण ANMSला कॅप्चाची गरज नाही. इतकंच काय OTPची गरज नाही आणि बॅंक OTPची गरज नाही.

त्यात एकाच वेळी शेकडो आयडी वापरून तिकीट बुक करता येतं. ज्या व्यक्तीच्या नावाने तिकीट बुक करायचं आहे त्याची सर्व माहिती आधीच भरून ठेवता येते. हे सॉफ्टवेअर इतकं फास्ट आहे की त्यामुळे सामान्य व्यक्ती जी माहिती भरत असते तोपर्यंत या एजंट्सचे तीन तिकीट बुक होतात आणि सामान्य माणसाला तिकीट मिळत नाही, असं अरुण कुमार सांगतात.

हमीदला किंवा गुलामला कुणा एजंटला काही सांगायचं असेल तर ANMSमधून त्यांच्याशी संपर्क साधला जातो. IRCTC आणि रेल्वेमध्ये सुरू असलेल्या बारीक-सारिक गोष्टींवरही या सर्वांचं लक्ष असतं. ANMS वर या गोष्टींची चर्चा होते. एखाद्या वेबसाइटवर जसं FAQ म्हणजे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं असतात तशीच अनेक उत्तरं ANMS वर आहेत. हमीद अशरफने ANMS हून व्हॉट्सअॅप ब्रॉडकास्टने एक मेसेज सर्व एजंटला दिला की 'रेल्वे अधिकाऱ्यांवरच केस फाइल करा. म्हणजे बनावट एजंटचा शोध लावणाऱ्यांवरच गुन्हे दाखल झाले तर आपल्याला अधिक वेळ मिळेल.'

मुस्तफा बरोबर एकूण 23 जणांना देशात अटक झाली आहे. अटकसत्र अजून काही दिवस सुरू राहील, असं अरुण कुमार यांनी सांगितलं.

प्रतिमा मथळा BBC Indian Sportswoman of the Year

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)