फोन टॅपिंग प्रकरण : अनिल देशमुख यांच्या निर्णयानंतर खळबळ

अनिल देशमुख Image copyright FACEBOOK/ANIL DESHMUKH
प्रतिमा मथळा अनिल देशमुख

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपा सरकार असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळेस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचें फोन टॅप होत होते आता त्याची चौकळी करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.

फोन टॅप करण्यासाठी सरकारी पैसे वापरून इस्रायली सॉफ्टवेअर वापरल्याचे आरोप होत आहेत आता या आरोपांची चौकशी होईल असं देशमुख यांनी सांगितलं आहे. यानंतर राज्यात विविध नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश दिला नव्हता असे सांगितले तसेच कोणत्याही एजन्सीद्वारे चौकशी करण्यास आताचे सरकार मोकळे आहे असेही त्यांनी सांगितले. तेव्हाच्या गृह मंत्रालयात शिवसेनेचा समावेश होता याचीही आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आताच्या काळातील राजकारणात फोन टॅपिंग होत असतं. विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाला फोन टॅपिंगची सवय लागलेली आहे. फोन टॅपिंग होऊनही आम्ही सरकार स्थापन केलं अश प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना विरोधकांचे फोन टॅपिंग करणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही, सरकार त्याचा तपास करू शकतं असं सांगितलं. याबाबत तक्रारी करणाऱ्या लोकांची विश्वासार्हता सर्व देशाला माहिती आहे असंही ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)