'चहा-पोहे कार्यक्रम करून लग्न झालेले मग सगळेच बांगलादेशी,' कैलास विजयवर्गीयंच्या वक्तव्यावरील प्रतिक्रिया

कांदापोहे Image copyright Getty Images

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय सध्या एका वक्तव्यावरून बरेच ट्रोल होत आहेत. आपल्या घरात एक नवीन खोली बांधण्याचं काम करणारे काही बांधकाम मजूर बांगलादेशी नागरिक असल्याचा आपल्याला संशय आल्याचं ते म्हणाले होते.

मात्र, त्यांना हा संशय कशावरून आला याविषयी सांगताना ते म्हणाले, "हे मजूर जेवणात फक्त पोहे खात होते. त्यामुळे ते बांगलादेशी असावे," असं आपल्याला वाटल्याचं ते म्हणाले.

Image copyright Facebook

दिल्लीतल्या एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात सुधारित नागरिकत्त्व कायद्याची बाजू मांडताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

फेसबुकवर डॉ. महेंद्र भास्कर यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच मजेशीर आहे. ते लिहितात. "माझ्या कामवाल्या बाईचा मुलगा पिझ्झा, बर्गर खातो. कदाचित तो अमेरिकेन असावा."

Image copyright Twitter

अशीच काहीशी प्रतिक्रिया पवनकुमार शिंदे यांनी दिली आहे. ते लिहितात, "अच्छा पोहे खाणारा बांगलादेशी. तसंच उपमा खाणारा म्यानमारी, जिलेबी खाणारा अफगाणी, बिर्याणी खाणारा पाकिस्तानी (विमान थांबवून उतरणारे नव्हे बरं का!), मोमो खाणारा नेपाळी, इडल्या चुरणारा श्रीलंकी."

तर ज्ञानेश्वर देवकर लिहितात, "मग कसं चाललंय माझ्या बांगलादेशी मित्रांनो."

तर एकाने मला पिझ्झा आवडतो. मग मी इटालियन आहे का, असा खोचक सवाल विचारला आहे.

पोहे हा खास महाराष्ट्रीयन पदार्थ. महाराष्ट्रात पोहे आवडीने खाल्ले जातात. इंदूरचे पोहे तर भारतभर प्रसिद्ध आहेत. त्या अनुषंगाने अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

Image copyright Facebook

विजय काळे लिहितात, "म्हणूनच मी आईला सकाळी पोहे देऊ नको म्हणून सांगितलं. बांगलादेशी म्हणून मला पण बाहेर काढतील."

अभिषेक पाटील यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे, "नागपुरात सगळे बांगलादेशी असतील मग. रेशीमबाग पण."

गायत्री पवार यांनी विजयवर्गीय यांना सल्ला दिलाय. त्या म्हणतात, "नीट तपासून बघा नागपुरी पण असू शकतात ते."

मंदार कदम म्हणतात, "गुजरात आणि नागपूर खाली होईल अशाने. मलाही पोहे खूप आवडतात. मग मलाही जावं लागेल."

सुजीत पाटील लिहितात "पुणे बांगलादेशात आहे वाटतं. सगळीकडे घराघरात नाष्ट्याला पोहे मिळतात."

महाराष्ट्रात मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला कांदापोहे असंच म्हणतात. कारण या कार्यक्रमात हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे. त्यावरूनही अनेक वाचकांनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Image copyright facebook

फेसबुकवर कपील सूर्यवंशी विचारतात, "आमच्याकडे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात चहा आणि पोहे असतात. म्हणजे आम्ही मुलगी बघायला बांगलादेशात गेलो होतो की काय?"

योगेश गायकवाड म्हणतात, "आजवर चहा पोह्यांचा कार्यक्रम करून लग्न झालेले सगळेच बांगलादेशी आहेत."

ट्वीटरवर अप्पा पाटील लिहितात, "बघण्याच्या कार्यक्रमात मुलाने पोहे खाल्ले तर तो बांगलादेशी ठरतो का?"

तर अजय लिहितात, "मग आता मुलगी बघायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम रद्द करायचा का?"

काहींनी विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरिफांची भेट घेतली होती त्याचा संदर्भ देत फिरकी घेतली आहे.

Image copyright facebook

फेसबुकवर जालिंदर जाधव लिहितात, "मग पाकिस्तानची बिर्याणी खाणारे पंतप्रधान नक्कीच पाकिस्तानी असू शकतील."

फेसबुकवर दीपक बोरुडे लिहितात,

" मला तर आता अश्मयुगात असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं आहे.

ना कांदा, ना पोहे

ना गटर गॅस

पाहिजे तेव्हा शिकार करायची आणि खायची

नो तक तक नो झंझट."

विजयवर्गीय यांच्या बाजूनेही अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांना वेगळं म्हणायचं होतं किंवा त्यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्या, असं म्हणत काहींनी विजयवर्गीय यांची बाजू सांभाळून घेण्याचाही प्रयत्न केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)