मंगळुरूत ‘स्फोटकं’ ठेवणारा खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता का? - फॅक्ट चेक

SM VIRAL IMAGE Image copyright SM VIRAL IMAGE

कर्नाटकातील मंगळुरू विमानतळावर कथितरीत्या स्फोटकं ठेवण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जातोय.

या दाव्यासोबत सोशल मीडियावर एक फोटोही पोस्ट होतोय. या फोटोत संघाचा गणवेश घातलेल्या दोन व्यक्ती दिसत आहेत.

या फोटोवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी म्हटलं आहे की आरोपी हिंदू असल्यामुळे त्याला कुणीच दहशतवादी म्हणत नाहीय. हीच व्यक्ती मुस्लीम असती तर तिला अतिरेकी म्हटलं असतं, असं अनेकांचं म्हणणं आहे.

20 जानेवारी रोजी कर्नाटकातील मंगळुरू विमानतळावर एक बेवारस बॅग सापडली होती. त्यात स्फोटकं असल्याचं म्हटलं जात होतं.

या प्रकरणात बंगळुरूच्या एकाने आत्मसमर्पण केलं होतं. त्याचं नाव आदित्य राव असल्याचं सांगण्यात आलं होतं.

या बातमीमागचं तथ्य शोधून काढण्यासाठी बीबीसीने मंगळुरू पोलिसांशी संपर्क केला.

Image copyright SM VIRAL IMAGE

मंगळुरूचे पोलीस आयुक्त पी. एस. हर्षा यांनी बीबीसीला सांगितलं की प्राथमिक तपासात आदित्य राव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नसल्याचं आम्हाला आढळलं आहे.

प्राथमिक तपासात आदित्य राव यांच्याविषयी काय-काय समोर आलं, हे विचारल्यावर आयुक्त हर्षा यांनी सांगितलं की आदित्य राव नावाच्या या व्यक्तीने बंगळुरू पोलिसांसमोर स्वतःहून समर्पण केलं.

आदित्य यांनी नामांकित महाविद्यालयांमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि एमबीएचं शिक्षण घेतलं असून अनेक बँका आणि कंपन्यांमध्ये काम केल्याचंही स्वतः आदित्य राव यांनी पोलिसांना सांगितलं.

Image copyright SM VIRAL IMAGE

आपल्या योग्यतेनुसार आपल्याला नोकरी मिळत नसल्याची आदित्य राव यांची तक्रार होती, असंही पोलीस आयुक्त हर्षा यांनी सांगितलं. उच्चशिक्षित असूनही त्यांनी सुरक्षा गार्डची नोकरीही केली होती.

त्यांनी मंगळुरू विमानतळावर एका नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यांना वैध कागदपत्रं आणण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र ते मंगळुरूला गेले तोवर ती नोकरी दुसऱ्याच कुणाला देण्यात आली होती.

यामुळे आदित्य राव संतापले आणि विमानतळ अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच त्यांनी धमकीचे फोन केले.

यापूर्वीही बंगळुरूच्या सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये असेच धमकीचे फोन केल्याच्या आरोपाखाली त्यांनी 11 महिन्याचा तुरुंगवास भोगला आहे. 2019 मध्ये ते कारागृहात बाहेर आले होते.

त्यांनी ई-रिटेलर्सकडून सुटे भाग खरेदी करून डिव्हाईस बनवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आदित्य राव यांनी 20 जानेवारी 2020च्या सकाळी मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे डिव्हाईस ठेवलं. त्यानंतर ऑटोरिक्षाने ते तिथून निघून गेले.

इतकंच नाही तर सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या दोन कार्यकर्त्यांचा फोटो फिरत आहेत आणि त्यापैकी एक आदित्य राव असल्याचा दावा केला जातोय, ती व्यक्ती आदित्य राव नसून संदीप लोबो आहे.

भाजप दक्षिण कन्नडा नावाच्या फेसबुक पेजवर दिलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की संदीप लोबो यांनी आपला फोटो मंगळुरू विमानतळावर स्फोटकं ठेवणारी व्यक्ती म्हणून सोशल मीडियावर फिरत असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. त्यांचा फोटो चुकीच्या पद्धतीने पोस्ट केला जात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

Image copyright TWITTER

मंगळुरू पोलिसांनी सांगितलं की संदीप लोबो यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे आणि ते स्वतः संघ स्वयंसेवक आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मंगळुरू विमानतळावर 20 जानेवारी रोजी सकाळी एक बेवारस बॅग सापडली होती. या बॅगेत कथितरीत्या स्फोटकं असल्याचं म्हटलं जात होतं.

Image copyright FACEBOOK/BJP

आपल्याला मंगळुरू विमानतळाच्या तिकीट खिडकीजवळ एका बेवारस बॅगेत स्फोटकं (IED) सापडल्याची माहिती 20 जानेवारी रोजी CISFचे डीआजी अनिल पांडे यांनी म्हटलं होतं.

Image copyright TWITTER

सीसीटीव्हीमध्ये संशयित व्यक्ती स्पष्टपणे दिसत असल्याचं पोलिसांनी म्हटल्याचं ANI या वृत्तसंस्थेच्या बातमीत सांगण्यात आलं होतं. 23 जानेवारी रोजी मंगळुरू पोलिसांनी आदित्य राव यांनी आत्मसमर्पण केल्याचं सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)