Republic Day: भारताचे पाहुणे म्हणून आलेल्या जाईर बोल्सोनारोंच्या 5 वादग्रस्त गोष्टी

जाइर बोल्सोनारो Image copyright Getty Images

भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो उपस्थित आहेत. बोल्सोनारो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोल्सोनारो यांनी एकमेकांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांदरम्यान 15 करार झाले होते. आरोग्य, जैव ऊर्जा सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण, भू-गर्भ आणि खनिज साधनसंपत्ती या विषयांसह अन्य महत्त्वाच्या विषयांवरील करारांवर मोदी आणि बोल्सोनारो यांनी सह्या केल्या.

भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे हे पाहुणे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अमेरिकेचे पुलित्झर पुरस्कारप्राप्त पत्रकार ग्लेन ग्रीनवाल्ड यांनी त्यांची संभावना 'लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेला सर्वाधिक वर्ण-लिंगविद्वेषी लोकप्रतिनिधी आणि किळसवाणा राजकारणी' अशी केली होती.

कट्टर उजव्या विचारसरणीचे बोल्सोनारो यांना 'ब्राझीलचे ट्रंप' म्हणूनही ओळखलं जातं.

काही महिन्यांपूर्वी ब्राझीलमधील अमेझॉनच्या जंगलाला आग लागली होती. या आगीसाठी बोल्सोनारोच जबाबदार आहेत, असं मानणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्या धोरणांमुळेच अमेझॉनच्या जंगलांमध्ये आग लागली आणि त्यांनी योग्य वेळी कारवाई केली नाही, असा या वर्गाचा आक्षेप आहे.

पर्यावरण संरक्षण आणि शेतीचा विकास यासंबंधी एका पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर बोल्सोनारो यांनी अजब उत्तर दिलं होतं. "कमी खाल्लं तरी चालेल. तुम्ही पर्यावरण प्रदूषणाबद्दल बोलत आहात, तर एक दिवसाआड शौच केलं तरी पुरेसं आहे. ते जगाच्या दृष्टीनं भल्याचं आहे," असं बोल्सोनारो यांनी म्हटलं होतं.

बोल्सोनारो यांचे हे विचार केवळ पर्यावरणापुरतेच मर्यादित नाहीत. महिलांबद्दल त्यांनी वेळोवेळी अनुद्गार काढले आहेत. गर्भपात, वंश, निर्वासित आणि समलैंगिक संबंध अशा विषयांवरही बोल्सोनारो यांनी मर्यादा सोडून विधानं केली आहेत.

1. विरोधक त्यांना ब्राझीलचे हिटलर म्हणतात

बोल्सोनारो यांचा जन्म 21 मार्च 1955 साली साओ पाओलोमधील कँपिनास शहरात झाला. 1977 साली त्यांनी अगलस नेग्रास मिलिटरी अॅकेडमीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

1986 साली त्यांनी एक लेख लिहिला होता, ज्यामुळे त्यांना तुरूंगाची हवा खावी लागली होती. या लेखात त्यांनी लष्करातील सैनिकांना मिळणाऱ्या कमी पगारावर असंतोष व्यक्त केला होता.

Image copyright Reuters

64 वर्षांचे बोल्सोनारो स्वतःही ब्राझीलचे माजी लष्करप्रमुख होते. आपण ब्राझीलच्या हितसंबंधांचा कायम विचार करतो, अशी स्वतःची प्रतिमा त्यांनी तयार केली आहे. पण त्यांनी जेव्हा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली, तेव्हा त्यांच्या विरोधात अनेक मोर्चे काढण्यात आले. अर्थात, विरोध होऊनही ऑक्टोबर 2018 साली ते ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.

त्यांच्या निवडणूक आणि सोशल मीडियावरील प्रचाराची तुलना डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रचाराशी करण्यात आली होती. बोल्सोनारो यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या सिराओ गोमेज यांनी तर त्यांना 'ब्राझीलचे हिटलर' असं म्हटलं होतं.

2. महिलांचा अपमान करणारी विधानं

बोल्नासारो यांनी डाव्या पक्षाच्या एका महिला खासदाराला उद्देशून म्हटलं होतं, की "तू इतकी कुरूप आहेस की तुझ्यावर मी बलात्कार देखील करणार नाही. तुझी तेवढी देखील लायकी नाही."

2014 मध्ये रिओ डी जेनेरियोमधून बोल्सोनारो यांना सर्वाधिक मतं मिळाली होती. याच दरम्यान आपल्या अनेक प्रक्षोभक विधानांमुळेही ते चर्चेत होते.

"मला पाच मुलं आहेत. त्यातले चार मुलगे आहेत. पाचव्या वेळी मी थोडा दुबळा पडलो. त्यामुळे मला मुलगी झाली,'' असंही एक वक्तव्यं त्यांच्या खात्यावर जमा आहे.

2016 साली बोल्सोनारो यांनी एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, "महिलांना पुरूषांच्या बरोबरीनं पगार दिला जाऊ नये. कारण त्यांना मातृत्वाच्या रजेसारखे अनेक लाभ मिळत असतात. पुरूषांच्या बरोबरीनं पगार देऊन मी कोणत्याही महिलेला कामावर ठेवणार नाही."

3. लष्कराच्या अधिकारांचं समर्थन

2016 साली तत्कालिन राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांच्याविरोधातील महाभियोगावर मतदान सुरू होतं. त्यावेळी बोल्सोनारोंनी दिवंगत नेते कर्नल एलबर्टो उस्तरांना आपलं मत दिलं होतं. एलबर्टो ब्राझीलमधील वादग्रस्त नेते होते. त्यांच्यावर देशात लष्करी राजवट असताना कैद्यांचा छळ केल्याचा आरोप होता.

गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या सीमारेषांशी संबंधित आर्थिक प्रस्तावामध्ये वाढ केली होती. ते सामान्य लोकांची सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलही भाष्य करतात. ब्राझीलमधील अपराधांचं प्रमाण वाढत असताना त्यांनी मांडलेल्या या गोष्टी लोकांना पटत होत्या.

Image copyright Getty Images

11 सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी ट्वीट केलं होतं, "सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. लोकांना रोजगार हवा आहे, शिक्षण हवं आहे. पण रस्त्यात चालता चालता तुम्हाला कोणी लुटत असेल तर नोकऱ्यांचा काय फायदा? जर शाळांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असेल तर शिक्षणाचाही काही अर्थ नाही."

4. समलैंगिकतेला विरोध

2011 मध्ये बोल्सोनारो यांनी प्लेबॉयला एक इंटरव्ह्यू दिला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, "माझा मुलगा गे असण्यापेक्षा तो रस्त्यावरील अपघातात मेलेला मला चालेल."

त्यांचा केवळ समलैंगिकतेलाच विरोध नाहीये, तर ते वंशवादी विधानांसाठीही ओळखलं जातं.

5. कृष्णवर्णीयांबद्दलचा द्वेष

तुमचा मुलगा कृष्णवर्णीय मुलीसोबत डेटिंग करायला लागला तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न एका महिला पत्रकारानं विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं होतं, की तुम्ही जशा वातावरणात वाढलात तसल्या वातावरणात माझी मुलं वाढलेली नाहीत. ती उत्तम वातावरणात वाढली आहेत.

Image copyright Getty Images

राजकीयदृष्ट्या योग्य विचार करणं हे डाव्या पक्षांचं काम आहे. पण माझ्यावर सर्वाधिक हल्ले होताना दिसतात, असं त्यांनी जून 2018 साली टीव्हीला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं.

बोल्सोनारो यांची विधानं कितीही प्रक्षोभक असली तरी तरूणांना त्यांची शैली आवडताना दिसत आहे. सोशल मीडियावरही अनेक जण त्यांचं समर्थन करतात. अर्थात, समलैंगिकतेवरील त्यांच्या विचारांना मात्र विरोध होताना दिसतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)