पद्म पुरस्कार: राहीबाई पोपेरे - देशी वाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाते'ला पद्मश्री

राहीबाई Image copyright BBC/sharad badhe

देशी वाणांचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना केंद्र सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित केलं आहे. याआधी राहीबाई पोपेरे या 'बीबीसीच्या 100 वूमन' यादीत झळकल्या होत्या.

पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. BAIF या संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात बियाणे बँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय.

राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात.

2018मध्ये बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या बॅंकेविषयी माहिती दिली. बॅंकेबाबत आपली जशी कल्पना असते तशी ही बॅंक नाही. मातीच्या घरावर काही पत्रं टाकून त्यांनी आपली बॅंक उभी केली. या बॅंकेत पैसे ठेवलेले नाहीत पण त्याहून अधिक अशी मूल्यवान बियाणं राहीबाईंनी जतन करून ठेवली आहेत.

कशी आहे राहीबाईंची बॅंक?

आत गेल्यावर राहीबाई आपल्याला उत्साहाने त्या बियाण्यांबद्दल माहिती देतात. हे सफेद वांगं आहे, हे गावठी हिरवं वांगं आहे, ही सफेद तूर आहे अशी कित्येक नावं त्या एकामागून एक घेत राहतात. आपण ज्या भाज्यांबद्दल कधी ऐकलंही नाही त्या भाज्यांचं वाण त्यांनी पारंपरिक पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे.

राहीबाई सांगतात आपण जे खातो त्यानेच आपलं शरीर बनतं आणि मनही बनतं. शरीर सदृढ असेल तर मनही सदृढ राहील असा त्यांचा विश्वास आहे.

गावात आजारी लोकांचं प्रमाण त्यांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं की आधी बाळ कधी कुपोषित दिसत नव्हते. पण आता जी बालकं जन्माला येत आहेत त्यांचं वजन कमी असतं. याचं कारण काय असावं यावर त्यांनी विचार केला.

हायब्रीड किंवा संकरित वाणांमुळे तर आपली रोग प्रतिकारक क्षमता तर कमी होत नाही ना असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी यावर काहीतरी उपाय शोधण्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधली.

आजकालच्या भाज्या आणि पीक हे रासायनिक खतावर येतात पण देशी बियाणं मात्र नुसत्या हवेवर आणि पाण्यावर येऊ शकतं असं त्या सांगतात. पण हायब्रीड बियाणांना रासायनिक खतांशिवाय येतच नाही असं त्यांचं निरीक्षण आहे.

'जुनं ते सोनं'

नाचणी, वरई, राळा आणि जुन्या वाणाचे भात आता वापरातच नाहीत याची खंत त्यांना वाटते.

आपल्या घराशेजारील बागेतच त्यांनी चारशे ते पाचशे झाडे लावली आहेत. कुठलंही औपचारिक शिक्षण न झालेल्या राहीबाई बियाण्यांबद्दल भरभरून बोलतात. मला माझ्या वडिलांची शिकवण लक्षात आली. ते म्हणायचे जुनं ते सोनं. त्यानुसारच मी वागत गेले असं त्या सांगतात.

Image copyright BBC Sport

आज राहीबाईंना वेगवेगळे मानसन्मान मिळत आहेत. त्यांचं कौतुक होत आहे पण सुरुवातीला मी जेव्हा हे काम हाती घेतलं तेव्हा लोक मला वेड्यात काढायचे. मी काय काम करायचे हेच बहुतेकांना कळत नव्हतं. हळुहळू लोकांना मी दिलेल्या बियाणांचं महत्त्व पटलं.

त्यानंतर माझ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी मला बोलवलं जाऊ लागलं. जर लोकांची बोलणी ऐकून हे काम मी सोडून दिलं असतं तर आज जे देशी बियाणं इथं दिसतंय ते तुम्हाला दिसलं नसतं असं त्या सांगतात.

(रिपोर्टिंग - मयुरेश कोण्णूर, व्हिडिओ- एडिट- शरद बढे)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)