'मला जमिनीवर राहू द्या एवढीच माझी मागणी,' आरेतील प्रकल्पग्रस्त लक्ष्मीबाईंची कहाणी

लक्ष्मीबाई, Lakshmibai, Metro, SRA, आदिवासी, प्रजापूरपाडा, मुंबई, चकाला, PRAJAPURPADA Image copyright ONKAR KARAMBELKAR
प्रतिमा मथळा लक्ष्मीबाई गायकवाड (80)

"माझी भरपूर झाडं होती. पेरु होते, केळी होत्या, कोंबड्या होत्या... ते सगळं सोडून आता मीच इथं या खुराड्यात येऊन बसलेय." 80 वर्षांच्या लक्ष्मीबाई रामजी गायकवाड त्यांच्या लहानशा खोलीत बसून सांगत होत्या.

मेट्रो प्रकल्पामुळे आरेच्या प्रजापूरपाड्यातल्या काही लोकांना चकालाच्या एसआरए इमारतीत घरं देण्यात आली आहेत. त्यातल्याच एका 260 चौरस फुटांच्या घरात लक्ष्मीबाई राहातात.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

लक्ष्मीबाई बोरिवलीच्या काजूपाड्यातून लग्न करुन प्रजापूरपाड्यात राहायला आल्या आणि गेली अनेक वर्षं त्या तिथंच राहिल्या. त्या सांगतात, "या मधल्या काळात आरे प्रकल्पाचा तबेला तिथं आला, तिथं सिप्झ आलं आणि आता तिथं मेट्रो प्रकल्प आला. हे सगळं आमच्या डोळ्यांसमोर झालं आहे.

आम्हाला तिथून हुसकावून लावलं आणि इथं पाडा नव्हताच असं दाखवण्यात आलं. आम्ही कोकणा आदिवासी आहोत. जवळच्या सारीपूतनगरचं नाव पुढे करून इथं पाडा नव्हताच असं सांगण्यात आलं आणि आम्हाला तिथून हलवलं."

Image copyright ONKAR KARAMBELKAR
प्रतिमा मथळा लक्ष्मीबाई त्यांच्या मुलीबरोबर लहानशा घरात राहातात. इथं आल्यापासून आपली तब्येत बिघडली असं त्या सांगतात.

लक्ष्मीबाई सांगतात, "मेट्रो प्रकल्प आला तेव्हा मी तिथून जाणार नाही अशी भूमिका घेतली. मी एकटी तिथं राहिले. तिथं मी दिवसभर काम करायची. सकाळपासून लाकडं गोळा कर, शेतात काम कर, कोंबड्या सांभाळ, भाजी पिकव असं सुरु असायचं.

पण एकेदिवशी मेट्रोवाले आले आणि सगळं सामान बाहेर फेकून द्यायला सुरुवात केली. तांदूळ, धान्य, मसाले, भांडीकुंडी घराबाहेर काढून फेकायला सुरुवात केली. जे हाताला लागलं तितकं या घरात आणू शकले. काही कोंबड्या नातलगांकडे पाठवून दिल्या, काही हरवल्याही. एवढा त्रास मला कोणीच दिला नाही."

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत.

लक्ष्मीबाई आता त्यांच्या एका मुलीबरोबर एसआरए म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधून बांधलेल्या इमारतीत 12व्या मजल्यावर राहातात. लिफ्टसाठी बराच वेळ घालवल्यावर, अंधाऱ्या पॅसेजमधून गेल्यावर लक्ष्मीबाईंचं घर दिसतं.

इथं त्यांच्याबरोबर त्यांची एक मुलगी राहाते आणि बाकीचे नातलग इतर इमारतींमध्ये राहातात. लक्ष्मीबाई इथं आल्यापासून त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. या लहानशा घरात त्यांचा वावर एका कॉटपुरता मर्यादित राहिला आहे.

Image copyright ONKAR KARAMBELKAR
प्रतिमा मथळा लक्ष्मीबाई आणि त्यांची कॉट. 'मी दिवसभर या कॉटवर बसून असते', असं त्या सांगतात.

त्या म्हणतात, "इथं मला 12 व्या मजल्यावर टाकलं आहे. मला लिफ्ट कशी वापरायची समजत नाही. शिडी चढता येत नाही. एवढ्याच जागेत स्वयंपाक करायचा आणि इथंच राहायचं. दोन खुर्चा टाकल्या की जागा संपते. मी कॉटवरून उतरुच शकत नाही. टीव्ही बघत वेळ घालवावा लागतो."

बोलताबोलता लक्ष्मीबाईंची मुलगी म्हणते, "इथं आल्यापासून आई रोज भांडते, तिची खुपच चिडचिड होते. टेन्शन येतं तिला. झोपही लागत नाही."

सतत मोकळ्या हवेत, जमिनीवर राहायची सवय असलेल्या लक्ष्मीबाईंना या बाराव्या मजल्यावर राहायला लागणं आजिबात आवडलेलं नाही. त्यांनी वारंवार आपली जागा परत मिळावी यासाठी मागणी केली आणि त्यांच्या जागेचा कोर्टात खटलाही सुरु आहे.

Image copyright ONKAR KARAMBELKAR
प्रतिमा मथळा एकेकाळी मोकळ्या हवेत, जमिनीवर राहाणाऱ्या लक्ष्मीबाई आता SRA इमारतीच्या बाराव्या मजल्यावर राहातात.

त्या म्हणतात, "तिकडं पाड्यावर आम्ही कुठेही बसायचो, कुठेही फिरायचो. इथं मला बाराव्या मजल्यावर जगणं शक्य नाही. मला किमान या इमारतीत खालीतरी जागा द्या असं मी म्हटलं तरीपण ते मान्य केलं नाही. आता मी कुठे जाऊ. इथं आले आणि आजारपण मागे लागलं. आधी कधी डॉक्टरकडे जायची वेळ आली नाही.

आता ब्लडप्रेशरच्या गोळ्या सुरु झाल्या. इथं आल्या आल्या मणक्याचं ऑपरेशन झालं. या एवढ्याशा घरात मी पडलेसुद्धा. सगळ्या पायातली ताकद निघून गेली. ऑपरेशन झाल्यावर कुठे थोडी प्रकृती सुधारली. भूक लागते पण एक चपाती खाल्ली की पुढे नको वाटतं मग जेवणच नको असं वाटतं. इथं खावसंच वाटत नाही."

Image copyright ONKAR KARAMBELKAR
प्रतिमा मथळा लक्ष्मीबाई म्हणतात, मला किमान खालची जागा तरी द्या.

प्रकल्पग्रस्तांना घर दिलं की वरवर पुनर्वसन झालं असं आपल्याला वाटतं. पण पुनर्वसन म्हणजे फक्त घर मिळणं असं नाही तर सर्वप्रकारे पुनर्वसन होण्याची गरज आहे हे लक्ष्मीबाईंकडे पाहिलं की लक्षात येतं.

प्रकल्पग्रस्तांच्या मानसिक स्थितीकडे फारच कमीवेळा लक्ष दिलं जात असावं असं वाटतं. एकेकाळी शेती करणाऱ्या, दिवसभर कार्यरत असलेल्या, लाकडांची मोळी स्वतः उचलून नेणाऱ्या आदिवासी बाईचं अस्तित्व अचानक एका कॉटपुरतं मर्यादित राहिलं तर तिच्या मनावरचा ताण नक्कीच समजून घेता येईल.

Image copyright ONKAR KARAMBELKAR
प्रतिमा मथळा मेट्रोच्या कारशेडमुळे घर गेलेल्या लक्ष्मीबाईंना आता या घराच्या खिडकीतून दर काही मिनिटांनी जाणारी मेट्रो पाहात बसावी लागते.

आरे प्रकल्पाच्यावेळेस लक्ष्मीबाईंची 2 एकर जमिन गेली होती. ती त्यांनी कोर्टात केस करून परत मिळवली होती. आता कदाचित पुन्हा ही जमिनही मिळेल या आशेवर त्या लहानशा घरात राहिल्या आहेत.

आज लक्ष्मीबाईंची स्थिती एखाद्या उपटून टाकलेल्या रोपाप्रमाणे झाली आहे. जी जमिन इतके दिवस कसली, जी झाडं जपली त्याची आठवण काढत राहण्यापलिकडे त्यांच्या हातात फारसं काहीच राहिलेलं नाही.

प्रकल्पग्रस्तांमध्ये महिलांच्या प्रश्नांचे प्रमाण जास्त- डॉ. राजेंद्र बर्वे

एखाद्या प्रकल्पामध्ये घरदार, जमीन सोडून जावं लागतं तेव्हा कुटुंबातील सर्वांवर त्यातही महिलांवर जास्त ताण येतो, असं मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात.

ते म्हणाले, "स्थलांतरित कामगार किंवा लोकांचे प्रश्न असतात त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांचेही प्रश्न असतात. नाइलाजानं स्थलांतर करावं लागल्यामुळे आपण आपल्या मुळांपासून तुटल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. या मोकळ्या जागेत राहाणाऱ्या लोकांची किंबहुना सर्वांची आपापल्या घराशी, जागेशी, शेजाराशी आणि जीवनशैलीशी एक नाळ जोडलेली असते. ती अशा सक्तीच्या स्थलांतरामुळे तुटली अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रजापूरपाडा इथंल्या कारशेडच्या कामाचं ऑक्टोबर 2019मध्ये काढलेलं छायाचित्र

"महिलांची त्यांच्या गावात सर्व कामांची सवयीची ठिकाणं ठरलेली असतात. धुणं धुण्याची, दळणाची, मंदिराची जागा ठरलेली आणि सवयीची झालेली असतात. त्यात बदल होणं त्रासदायक ठरतं. स्थलांतरानंतर त्यांना नवी स्पेस शोधावी लागते.

या लोकांचं पुन्हापुन्हा स्थलांतर होत असेल, आज इकडे-उद्या तिकडे असं चालू असेल तर तो ताण आणखी वाढतो. प्रकल्पग्रस्तांमध्ये महिलांना जास्त सहन करावे लागते कारण त्यांना पुरुषांपेक्षा अनेक आघाड्यांवर जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. पुरुष कदाचित कामधंद्यामध्ये स्वतःला गुंतवून घेऊ शकतात परंतु महिलांचं तसं नसतं त्यांना घरातली कामं, मुलांचं करणं अशी अनेक कामं असतात."

'अचानक झालेल्या कोणत्याही बदलामुळे ताण येऊ शकतो'

अचानक झालेला कोणत्याही बदलाचा ताण व्यक्तीवर येऊ शकतो. तो बदल कसा स्विकारला जाईल हे मात्र व्यक्तीपरत्वे वेगवेगळं असतं असं मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कीर्ती तांडेल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एकेकाळी लक्ष्मीबाई आणि या झाडांची दररोज भेट होत असे. आता मात्र 12 व्या मजल्याच्या खिडकीतून त्यांना इमारती आणि मेट्रो पाहात बसावं लागतं.

ते म्हणाले, "वयानुसार मानसिक स्वास्थ्यात बदल होत असतात. अचानक आलेल्या ताणामुळे नैराश्य (Depression), चिंता-ताण (Anxiety) अशी लक्षणं दिसून येतात. ताणाला सामोरं जाणं प्रतिकारक्षमतेवरही अवलंबून असतं. जर प्रतिकारक्षमता कमी असेल तर ताणाचे रुपांतर अस्वस्थतेत होतं. त्यामुळे कोणताही बदल करताना, पुनर्वसन करताना लोकांच्या मानसिक स्थितीचाही विचार करणं अत्यावश्यक आहे.

ग्रामिण किंवा आदिवासी भागाचा विचार केल्यास तेथिल राहणीमान, जगण्याची पद्धत, समाजाशी असलेला संबंध यामध्ये आणि शहरी जीवनात फरक असल्याचं दिसून येईल.

शहरामध्ये बंद दरवाजांमध्ये जगणं, लोकांशी संवाद कमी असे बदल असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये, निवृत्त झालेल्या लोकांत तसंच विधवा-विधुरांमध्ये एकटेपणा येऊ लागतो. त्याचा मानसिक त्रास होतो."

अशाप्रकारच्या पुनर्वसनामुळे काही 'मनोकायिक' (Psychosomatic) आजार दिसून येतात असे विचारले असता डॉ. तांडेल म्हणाले, "शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी जोडलेल्या असतात. त्यापैकी एकावरही झालेला बदल दुसऱ्यावर दिसून येतो. मानसिक त्रासाचे परिणाम शरीरावर दिसून येतात. आतमध्ये मनाला होणारी अस्वस्थता शारीरिक दुखण्याच्या स्वरुपात बाहेर दिसू शकते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये मनोकायिक आजारही दिसून येतात."

Image copyright Getty Images

पुनर्वसन करताना जीवनपद्धतीचा विचार झाला पाहिजे- वैशाली पाटील

आपल्याकडे आदिवासी असो वा कोणतेही प्रकल्पग्रस्त… पुनर्वसन करताना प्रत्येकवेळेस त्यांच्या जुन्या जीवनपद्धतीवर घाला घातला जातो. त्यांच्या मूळच्या जीवनपद्धतीचा विचार करून मगच विस्थापन आणि पुनर्वसन झालं पाहिजे, असं मत रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये आदिवासी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी कार्य करणाऱ्या वैशाली पाटील यांनी व्यक्त केलं.

पाटील यांच्या मते, "नर्मदा प्रकल्पापासून आदिवासींच्या पुनर्वसनातील दोष दिसून येतात. त्यानंतर राज्याला आणि मग केंद्राला पुनर्वसनासाठी कायदा करावा लागला. त्याची नीट काटेकोर अंमलबजावणी झाली तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. केवळ जमिनीला जमिन आणि घराला घर दिलं म्हणजे पुनर्वसन झाले असे नाही.

आदिवासींच्या सांस्कृतिक वैशिष्ट्याचा विचार पुनर्वसनात होणे गरजेचे आहे. बहुतांश ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना कोठेतरी दूर पत्र्याच्या खोलीत विस्थापित केल्याचं रायगड जिल्ह्यात दिसून आलं. तेव्हा लोकांनी अशा खोल्यांमध्ये राहाणं नाकारलं. तसं राहाणं शक्यही नसतं. त्यामुळे केवळ चार भिंती आणि छप्पर दिलं म्हणजे पुनर्वसन झालं असं होत नाही. धरण, महामार्ग किंवा कोणत्याही भूसंपादनामुळे पुनर्वसन होणार असेल तर समुहाच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा विचार केला गेलाच पाहिजे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)