अरविंद केजरीवाल हे मोदींना पर्याय आहेत की त्यांच्यासारखेच नेते आहेत?

नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल Image copyright Getty Images

इंग्रजीतल्या Patriotism या शब्दाला मराठीत देशभक्ती म्हणतात. ऑक्सफोर्ड शब्दकोशानुसार कुठल्याही एका देशाबद्दल प्रेम, त्याचं हित आणि रक्षणाला देशभक्ती म्हणण्यात आलं आहे. मात्र, त्याच शब्दकोशात ब्रिटीश लेखक सॅम्युअल जॉन्सन यांचा एक कोट आहे. डॉ. जॉनसन देशभक्ताला अराजक आणि बळाचा वापर करणारा म्हणायचे. त्यांचं म्हणणं आहे की 'देशभक्ती हे आचरटाचं अंतिम ठिकाण असतं.'

दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देशभक्तीच्या मुद्द्यावरून घेरलं तेव्हा केजरीवाल यांनी आपण 'कट्टर देशभक्त' असल्याचं सांगितलं. त्यांनी कितीतरी वेळा याचा उल्लेख केला की भाजपने त्यांना अतिरेकी म्हटलं असलं तरी ते 'कट्टर देशभक्त' आहेत.

11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागला आणि आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाळाला. तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह पक्ष कार्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांना 'कट्टर देशभक्त' म्हणाले.

ही तुलना आपण एखाद्या प्रियकराशी करू शकतो जो मोठमोठ्याने हा दावा करतो की तो 'कट्टर आशिक' आहे. मात्र प्रेम आणि कट्टरता एकत्र नांदू शकतात का?

बनारस हिंदू विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्राध्यापक अशोक त्रिपाठी म्हणतात, "प्रेम करणारा कट्टर असू शकत नाही. मग तो देशावर प्रेम करणारा असो किंवा प्रेयसीवर. एक तर तो कट्टर असेल किंवा मग प्रियकर असेल. कट्टरतेत हिंसा, सूड आणि संकुचित दृष्टिकोन अंतर्भूत असतो. मात्र, प्रेमात स्वयंभू होण्याची मनिषा असते."

नेहरू, गांधी यांची देशभक्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख गोळवलकर यांच्या देशभक्तीत फरक होता. 'Bunch of Thoughts' हे गोळवळकर यांचं पुस्तक वाचल्यास त्यांच्या राष्ट्रवादाबद्दलची बरीचशी संकल्पना लक्षात येते.

गोळवलकर यांच्या देशभक्तीत हिंदू हे श्रेष्ठ आहेत अशी भावना दिसते. याउलट नेहरू, गांधी यांच्या देशभक्तीत विविधता आणि मोकळेपणा दिसतो. संकुचितपणा नाही. केजरीवाल जेव्हा स्वतःला कट्टर देशभक्त म्हणतात तेव्हा त्यांची कट्टरता गांधी, नेहरू यांच्या देशभक्तीपेक्षा खूप वेगळी होते.

बीएचयूमध्ये पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक आर. पी. पाठक सांगतात की इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीसुद्धा स्वतःला कट्टर देशभक्त म्हणायचा. ते सांगतात, "एक कट्टर देशभक्त आणि कट्टर हिंदूमध्ये फार फरक नाही. कारण एक कट्टर देशभक्त कट्टर हिंदू असू शकतो. एक कट्टर ब्राह्मणही असू शकतो. ही कट्टरता थांबत नाही."

संकुचितपणा, श्रेष्ठत्वाची भावना आणि त्यामुळे 'इतरांना' तुच्छ आणि घृणास्पद मानणे एक सहज मानसिक प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ एखादा हिंदी भाषक म्हणतो की तो 'कट्टर देशभक्त' आहे तेव्हा त्याच्या देशभक्तीत हिंदी भाषेप्रतीसुद्धा कट्टरता असेल, हे स्पष्ट आहे. ही कट्टरता हिंदी भाषेपुढे तामिळ, तेलुगू, मलयालम या भाषांना कमी लेखणार. तो आपल्या खाण्या-पिण्याच्या पद्धती, पेहराव यांना स्वतःच्या ओळखीशी जोडूनच बघणार आणि ज्यांचं खाणं-पिणं, पेहराव, भाषा त्याच्यासारखी नाही त्यांना तो 'परकं' मानेल.

मात्र, स्वातंत्र्य लढ्यावेळी सर्वोच्च पातळीवर पोचलेली देशभक्तीची भावना या सर्व संकुचित विचारांच्या वर जाऊन विकसित झाली होती.

Image copyright AFP

11 फेब्रुवारी रोजीही अरविंद केजरीवाल आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसमोर आले तेव्हा त्यांनीही 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' अशा घोषणा दिल्या. जणू काही त्यांना भाजप आणि पंतप्रधान मोदींना सांगायचं होतं की विजयाच्या जल्लोषातही ते 'भारत माता की जय' म्हणायला विसरत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आपल्या सभा आणि रॅलींमध्ये भाषणाची सुरुवात आणि शेवट 'भारत माता की जय'नेच करतात.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्कूल ऑफ सोशल सायन्सचे प्राध्यापक प्रवीण झा म्हणतात, "अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यात फरक करणं अवघड आहे. दोघांचं राजकारण बघितल्यावर असं वाटतं की एक गहिरे मोदी आहेत आणि दुसरे उथळ मोदी आहेत. अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा पर्याय अजिबात असू शकत नाही. भाजपच्या धार्मिक आणि हिंदू बहुसंख्यकवादाच्या राजकारणाविरोधात उघडपणे बोलण्याचं धाडस अरविंद यांच्यात नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रचार मोहीम बघा. खरं तर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मोदी समर्थक मतदारांना अडचण (uneasy) जाणवत नाही."

प्रवीण झा पुढे सांगतात, "दिल्लीने दिलेला निकाल मोदींच्या धार्मिक धोरणांविरोधात नाही. अरविंद केजरीवाल पहिले नेते होते ज्यांनी काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. अरविंद केजरीवाल यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नोंदणी रजिस्टर (NRC) याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवलं."

"अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवडणूक प्रचारात शाहीनबागेला इतकं दूर ठेवलं जणू तो दिल्लीचा भागच नाही. त्यांची देशभक्ती आणि राष्ट्रवाद भाजपच्या नरेटिव्हपेक्षा वेगळी नाही. ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना मुक्त केलं पाहिजे, असंही ते कधी म्हणाले नाही. हे तर लांबचं झालं. मी तर त्यांना एका मुलाखतीत हे म्हणताना ऐकलं की दिल्ली पोलीस त्यांच्या नियंत्रणात असते तर त्यांनी शाहीनबाग दोन तासात रिकामं केलं असतं. अशी व्यक्ती मोदींचा पर्याय कसा असू शकतो?" झा विचारतात.

Image copyright Getty Images

अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या रणनीतीला आव्हान दिलेलं नाही. दिल्ली विद्यापीठात सोशल सायन्सचे प्राध्यापक सतीश देशपांडे म्हणाले की केजरीवाल यांनी या निवडणूक प्रचारात भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचा विरोध केला नाही. ते म्हणतात, "केजरीवाल यांच्या संपूर्ण प्रचार मोहीमेतून हाच संदेश गेला की त्यांना धार्मिक राजकारणाची अडचण नाही. मात्र, ते उघडपणे हे बोलणार नाही."

सतीश देशपांडे म्हणतात, "केजरीवाल निवडणूक जिंकण्यात पटाईत झाले आहेत. मात्र, त्यांना हे ठरवावं लागेल की त्यांना निवडणूक जिंकणारी मशीन व्हायचं आहे की देशाच्या राजकारणात काही निर्णायक भूमिका बजावायची आहे. भाजप आणि मोदी यांची जी राजकीय वचनबद्धता आहे त्याचा सामना केजरीवाल आपल्या राजकारणाने करू शकतील, यावर पूर्णपणे साशंकता आहे. मोदी आणि भाजपबद्दल जी भीती आहे त्यावरचा तोडगा केजरीवाल आहे का? हाच सर्वांत मोठा प्रश्न आहे. वीज आणि पाणी स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचं काम कुठलाही राजकीय पक्ष करू शकतो. भाजपसुद्धा करू शकतो. मात्र, आज देशाच्या लोकशाहीला केवळ वीज आणि पाणी हे प्रश्न भेडसावत आहेत का? मोदींचा विरोध करणारे केजरीवाल यांच्या विजयावर खुश होऊ शकतात. मात्र, हा विजय पुन्हा त्याच भीतीत बदलू नये."

राहुल गांधी यांनी कलम 370, सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी यांचा संसदेपासून रस्त्यापर्यंत विरोध केला आहे. मात्र, काँग्रेसला दिल्लीत एकही जागा मिळाली नाही. इतकंच नाही तर त्यांचा व्होट शेअरही 2015च्या तुलनेत घसरला. ज्या ओखला विधानसभा क्षेत्रात CAAचा विरोध सुरू आहे तिथे काँग्रेस दुसऱ्या स्थानावरही नाही. मुस्लीम मतं निर्णायक असणाऱ्या मतदारसंघात ही परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाचे अमानतुल्लाह खान 70 हजार मतांनी विजयी झाले.

प्राध्यापक प्रवीण झा म्हणतात, "दिल्लीचा जनादेश मोदींच्या धोरणाविरोधात असता तर काँग्रेसचा विजय झाला असता. आम आदमी पक्षाचा नव्हे. कारण मोदींच्या धोरणाचा उघडपणे विरोध राहुल गांधी यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी नव्हे." एका मोदीचा पराभव करण्यासाठी घाईघाईत दुसरा मोदी तयार होऊ नये, अशी भीतीही प्रा. प्रवीण झा व्यक्त करतात.

ते म्हणतात, "मोदी आणि केजरीवाल यांच्या अनेक साम्यं आहेत. दोघांनाही पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर विरोध सहन होत नाही. भाजपमध्ये मोदींना प्रश्न विचारणारा कुणी नाही. त्याचप्रमाणे आम आदमी पक्षातही केजरीवाल यांना प्रश्न विचारणारा कुणी नाही. दोघांचाही निवडणूक प्रचार व्यक्तीकेंद्रित असतो. दोघांसाठीही मंत्रिमंडळ आणि सभागृह यापेक्षाही वर त्यांचं मन आहे. आपण मोदींवर धर्मनिरपेक्षतेबाबत विश्वास ठेवू शकत नाही तर ते केजरीवाल यांच्या भरवशावरही सोडू शकत नाही."

8 फेब्रुवारीला मतदानाला जाण्याआधी अरविंद केजरीवाल आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांचा तो व्हिडियो सोशल मीडियावर पोस्ट झाला.

त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईला भेटायला अहमदाबादला जातात तेव्हा ते दृश्यं टिव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येतं.

केजरीवाल 7 फेब्रुवारी रोजी कॅनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले आणि गेल्यानंतर लोकांना ट्वीट करून सांगितलं की त्यांची हनुमानजींसोबत बातचीत झाली आहे आणि हनुमानजी त्यांना म्हणाले की तू चांगलं काम करतो आहेस.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)