नागपूरमध्ये डॉक्टर महिलेवर अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न, इतर दोघी जखमी

प्रतीकात्मक फोटो Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतीकात्मक फोटो

नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरात सर्वेक्षणासाठी आलेल्या डॉक्टर महिलेवर माथेफिरू तरुणाने अॅसिडसदृष्य पदार्थाचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं प्रसंगावधान राखल्याने ती या हल्ल्यातून बचावली.

नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेयो हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांचं एक पथक नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये कुपोषित माता आणि बालकांची तपासणी करण्यासाठी गेलं होतं.

दुपारी 12 च्या दरम्यान गावातील महिलांची तपासणी करत हे पथक फिरत होतं. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

हे पथक सावनेरच्या पहिलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिराजवर असताना, आरोपी निलेश कन्हेरे हा २२ वर्षांचा युवक त्यांच्याजवळ आला आणि तुझा चेहरा खराब करतो असे म्हणत त्याने त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिडसदृष्य पदार्थ फेकला.

पण प्रसंगावधान राखत या डॉक्टर महिलेनं चेहरा बाजूला केल्याने या अ‍ॅसिडचे काही कण बाजूला असलेल्या एका विद्यार्थिनीवर आणि अन्य एका महिलेच्या चेहऱ्यावर पडले. यात या दोघींनाही जखमा झाल्या आहेत. त्यांना सावनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हा प्रकार बघणाऱ्या नागरिकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.

माथेफिरू तरुणाने शौचालय साफ करण्यासाठी ग्रामीण भागात अॅसिडसदृष्य जे द्रव्य वापरले जातं ते महिलेच्या अंगावर फेकलं असल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे.

आरोपी माथेफिरु तरुण आणि हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या महिला डॉक्टर किंवा त्यांच्या पथकाची ओळख नव्हती. महिला डॉक्टर तपासणीसाठी आल्या असतांना त्याचा राग आरोपी तरुणाला आला असावा त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस उपनिरीक्षक मोनिका राऊत यांनी सांगितलं आहे.

पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.

कुठून आलं हे अॅसिड?

ग्रामिण भागात शौचालय साफ करण्यासाठी घातक केमिकल सर्रास विकलं जातं आणि ते वापरलंसुद्धा जातं. या पूर्वीही अशा घातक अॅसिडमुळे अपघात होऊन अनेकांना ग्रामिण भागात दुखापतही झाल्या आहेत शिवाय काही आत्महत्या प्रकरणांमध्येही असे अॅसिड वापरल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच गोंदिया जिल्ह्यातील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थिनीवर तिच्या ओळखीच्याच दोन तरुणांनी एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला केला होता. त्यात ती जखमी झाली आहे. तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दोन महिन्यापासून उपचार सुरु आहेत.

तर अलीकडेच वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एका तरुणीचा आरोपी विकेश नगराळे यानं पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)