नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रंप भेट: पाहुण्यांना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहतीये भिंत

ट्रंप आणि मोदी Image copyright Getty Images

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलॅनिया ट्रंप भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.

ट्रंप 24 आणि 25 फेब्रुवारी हे दोन दिवस भारतात असणार आहेत. या दोन दिवसात ते दिल्ली आणि अहमदाबादचा दौरा करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेत जेवढा भव्य स्वागत सोहळा झाला होता, त्याच धर्तीवर ट्रंप यांच्याही स्वागताची तयारी सुरू आहे. अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये 'हाउडी मोदी' कार्यक्रम झाला होता. तसाच अहमदाबादमध्ये 'केम छो ट्रंप' कार्यक्रम आखण्यात येतोय. गुजराती भाषेत 'केम छो ट्रंप' म्हणजे 'तुम्ही कसे आहात ट्रंप?'

या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप भारतीयांना संबोधित करणार असल्याचं कळतं. यावेळी ट्रंप यांच्यासोबत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा असणार आहेत.

मात्र, अहमदाबादमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर एक झोपडपट्टी येते. ही झोपडपट्टी लपवण्यासाठी एक भिंत उभारण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांकडून याला विरोध होतोय. ही झोपडपट्टी अहमदाबाद एअरपोर्टहून साबरमती आश्रमाच्या मार्गावर आहे.

स्थानिक जनता मात्र सरकारच्या या निर्णयावर नाराज आहे त्यांचा भिंत उभारण्याला विरोध आहे.

झोपडपट्टी लपवण्यासाठी भिंत

गुजरातमधल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये गुरुवारी ही बातमी प्रसिद्ध झाली की ट्रम्प यांच्या मार्गातली एक झोपडपट्टी लपवण्यासाठी सहा ते सात फूट उंच भिंत उभारण्यात येत आहे. ही भिंत जवळपास अर्धा किमी लांब आहे.

बीबीसी प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी सांगितलं की अहमदाबाद शहरातल्या इंदिरा ब्रिज लगतच्या सरणियावास भागातून राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा ताफा जाणार आहे. या झोपडपट्टीत जवळपास अडीच हजार लोक राहतात.

सरकार गरिबी लपवू इच्छिते. झोपडपट्टी दिसू नये, असं सरकारला वाटत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. सरकारला झोपडपट्टी नको असेल तर ते सरकारी खर्चातून पक्की घरं का बांधून देत नाही.

वस्तीत राहणाऱ्या कमलाबेन म्हणतात, "दोन-तीन दिवसांपासून काम सुरू आहे. ही भिंत उभारल्याने आमची वस्ती बंदिस्त होईल. हवा, प्रकाश बंद होईल. इथी सिवेजची व्यवस्था नाही. वीज, पाणी याची सोय नाही. अंधारात रहावं लागतं. झोपडपट्टीतला रस्ता इतका छोटा आहे की धडपडत तिथून जातात. गुडघ्यापर्यंत पाणी साचतं."

पूर्वी पडदे लावून लपवायचे झोपड्या

आणखी एका रहिवाशी महिलेने सांगितलं की भिंत उभारली नाही तर इथून जाताना अमेरिकेच्या अध्यक्षांना आमची खरी परिस्थिती दिसेल. मात्र, सरकारला वास्तव लपवायचं आहे.

हा भाग विमानतळाजवळ आहे. आजवर कुणी व्हीआयपी इथून जाणार असेल तर पडदे लावून झोपड्या लपवल्या जायच्या. मात्र, आता भिंत उभारून ही झोपडपट्ची कायमची लपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Image copyright Getty Images

एक महिला म्हणते, "ही भिंत उभी होता कामा नये. नरेंद्र मोदींना झोपडपट्टी आवडत नसेल. आमचं दारिद्र्य दिसत असेल तर पक्की घरं बांधून द्यावी."

सरकारने भिंत उभारून रस्ता बंद केल्याचं लोकांचं म्हणणं आहे. निवडणुकीत नेते मंडळी मतं मागायला येतात. मात्र, नंतर कुणी फिरकतही नाही. परिसरात स्वच्छतागृह, वीज आणि पाण्याची व्यवस्थाही नसल्याचं आणि झोपडपट्टीतल्या आतल्या गल्ल्यांमधून जाताही येत नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

80 वर्षांच्या एका आजीने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आमचं दारिद्र्य, पडदे आणि भिंतीने लपवण्याऐवजी सरकारने आम्हाला सुविधा द्याव्यात. जेणेकरून आमचं आयुष्य सुधारेल."

ट्रं यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ह्युस्टनमध्ये जवळपास 50 हजार अमेरिकी आणि भारतीय वंशाच्या नागरिकांना एकत्रित संबोधित केलं होतं. अहमदाबादमध्येही असंच काहीसं करण्याचा विचार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रंप आणि मोदी शहरातल्या मोटेरा भागात नव्याने उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं उद्घाटनही करतील. यावेळी स्टेडियममध्ये जवळपास लाखभर लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

या स्टेडियमची क्षमता 1 लाख 10 हजार एवढी आहे आणि ती ऑस्ट्रेलियातल्या क्रिकेट मैदानापेक्षाही जास्त असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलं आहे.

Image copyright Getty Images

काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार या कार्यक्रमाला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा हजर राहण्याची शक्यता आहे.

याशिवाय अहमदाबाद शहरात ट्रंप यांचा भव्य रोड शोदेखील आयोजित करण्यात आला आहे. ते साबरमती आश्रमातही जातील.

अहमदाबाद महापालिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या रोडशोच्या तयारीशी संबंधित वेगवेगळी कामं अधिकाऱ्यांना सोपवली आहेत.

सुरक्षा, सजावट आणि बरंच काही

मिळालेल्या माहितीनुसार हा रोड शो अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत असेल. यासाठी 10 किमीचा मार्गाची खास सजावट करण्यात आली आहे. सोशल मीडियावर #KemChoTrum या हॅशटॅगसोबत रोडशोच्या तयारीचे फोटो शेअर होत आहेत.

बीबीसी गुजराती प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी सांगितलं की साबरमती आश्रम आणि मोटेरा स्टेडियममध्ये जवळपास दहा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात येणार आहे.

Image copyright Getty Images

इतकंच नाही तर ट्रंप यांचं अहमदाबाद शहरात आगमन होण्याच्या दोन दिवस आधीपासून मोटेरा स्टेडियममध्ये सशस्त्र सुरक्षादलाच्या जवानांनाही तैनात करण्यात येणार आहे.

बीबीसी प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी हेदेखील सांगितलं की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या दौऱ्यानिमित्ताने मोटेरा स्टेडियम आणि साबरमती आश्रमाच्या आसपासच्या जवळपास 16 रस्त्यांच्या पुनर्बांधणीचंही कामही करण्यात येतंय.

शाळा, महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांना मोटेरा स्टेडियममधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितलं जातंय.

ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे अहमदाबाद एअरपोर्ट अथॉरिटी आणि महापालिकेचे अधिकारी दिवसरात्र काम करत आहेत.

यापूर्वी चीनचे अध्यक्ष शी चिनपिंग, जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हेदेखील अहमदाबाद शहरात येऊन गेले आहेत.

हा दौरा ट्रंप यांच्यासाठी महत्त्वाचा का आहे?

अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने ट्रंप यांच्यासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा आहे.

काही विश्लेषकांच्या मते ट्रंप यांचा हा भारत दौरा त्यांच्या निवडणूक प्रचाराचाच एक भाग आहे. अमेरिकेत मूळ गुजराती असणाऱ्या नागरिकांची संख्या खूप जास्त आहे आणि गुजरातमधूनही मोठ्या संख्येने लोक अमेरिकेत जात असतात.

Image copyright Getty Images

मीडिया रिपोर्ट्सनुसार 'केम छो ट्रंप' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काही गुजराती वंशाच्या काही अमेरिकन नागरिकांना आमंत्रित केलं जाऊ शकतं.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा हा पहिला भारत दौरा आहे आणि ते सिनेटमध्ये त्यांच्याविरोधात सुरू असलेला महाभियोगाचा खटला निकाली निघाल्यानंतर येत आहेत.

या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये काही व्यापारी करारही होऊ शकतात, असाही विश्लेषकांचा अंदाज आहे.

उत्साहित ट्रं, आनंदी मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटलं होती की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी या महिन्यात भारत भेटीवर येत आहेत, याचा मला अत्यानंद होतो आहे. इथे त्यांचं भव्य आणि संस्मरणीय राहील, असं स्वागत करण्यात येईल, असंही मोदी म्हणाले.

त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी 24 आणि 25 ला भारत दौऱ्यावर येणार असल्याने मला अत्यानंद झाला आहे. आपल्या माननीय पाहुण्यांचं संस्मरणीय स्वागत करण्यात येईल. ट्रंप यांचा भारत दौरा विशेष आहे. हा दौरा दोन्ही देशांचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरणार आहे."

आणखी एक ट्वीट करत पंतप्रधान मोदी म्हणतात, "भारत आणि अमेरिका यांचे दृढ संबंध केवळ आपल्या नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी फायद्याचे ठरतील. भारत आणि अमेरिका लोकशाहीवादी विचारधारेशी वचनबद्ध आहेत. दोन्ही राष्ट्रं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकमेकाशी व्यापक स्वरूपात आणि जवळून सहकार्य करत आहेत."

ट्रंप यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका यांचे द्विपक्षीय संबंध दृढ होतील, अशी आशा दोन्ही देशांच्या सरकारांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी फोनवरून बातचीत केली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी यावर सहमती व्यक्त केली होती की हा दौरा भारत-अमेरिका यांच्या धोरणात्मक सहकार्याला दृढ करेल.

या दौऱ्यामुळे अमेरिकी आणि भारतीय नागरिकांचे संबंधीही वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षाही या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)