Pulwama: हल्ल्याला वर्ष पूर्ण, तपास कुठपर्यंत आला?

पुलवामा Image copyright Reuters

14 फेब्रुवारी 2019. हा दिवस बरोबर एका वर्षापूर्वीपर्यंत दक्षिण काश्मीरमधल्या लाटूमोड भागासाठी इतर दिवसांप्रमाणेच होता. पण दुपारी 3.10 नंतर सगळंच बदललं. तेही कायमचं.

या भागातून सीआरपीएफच्या गाड्यांचा ताफा चालला होता. त्या ताफ्यावर दारुगोळ्याने भरलेली मारुती सुझुकी इको कार आदळवून आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता.

दहशतवादाच्या तीन दशकांच्या इतिहासामध्ये अशी घटना कधीच घडली नव्हती.

CRPFसाठी आपल्या ताफ्यावर हल्ला होणं किंवा काश्मीरमधील संघर्ष नवा नव्हता.

पण तरीही असी घटना पुन्हा घडू नये यासाठी सीआरपीएफमध्ये काही बदल करण्यात आले आहेत का? हे पाहाण्याची गरज आहे.

CRPFचे महासंचालक आनंद प्रकाश माहेश्वरी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "CRPF अशाप्रकारच्या खलप्रवृत्तीच्या संघटनांशी लढण्यासाठी सतत पावलं उचलत आहे आणि त्याप्रकारचे बदलही घडवून आणत आहे. त्याचप्रमाणे अशा शक्ती जेथे वाढतात त्या जागाही नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु असतो."

गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्याच्या अहवालाबद्दल विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले नाही.

2019मध्ये हा हल्ला झाल्यानंतर त्याबद्दल आधी माहिती नव्हती का असे प्रश्न उपस्थित झाले होते. जर तशी माहिती उपलब्ध असती तर ताफ्याला संरक्षण देता आले असते.

सीआरपीएफच्या अनेक अधिकाऱ्यांनी या आत्मघातकी हल्ल्यानंतर काहीही बदल झाला नसल्याचे बीबीसीला सांगितले.

कुणावर कारवाई झाली का?

एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, पुलवामा हल्ला ही चूक नव्हती. त्यामुळे कोणावरही कारवाई करण्याचा प्रश्न नाही. त्यादिवशी आम्ही कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी तयार होतो मात्र VB-IEDसाठी (Vehicle Borne Improvised Explosive Device) नाही. ते म्हणजे अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न विचारल्यासारखे होते.

अर्थात अशा प्रकारे वाहनात स्फोटक भरुन हल्ला करण्याच्या अनेक घटना आधी घडल्याची आकडेवारी उपलब्ध आहे.

Image copyright Getty Images

साऊथ एशिया टेररिझम पोर्टलवरती 2 नोव्हेंबर 2005 साली नौगाम येथे आत्मघातकी हल्लेखोराने आपली कार उडवून देऊन तीन पोलीस कर्मचारी आणि सहा नागरिकांना ठार मारल्याची माहिती आहे. तसेच इतर घटनांमध्ये वाहनांचा कार बॉम्ब म्हणून वापर झाल्याची माहिती उपलब्ध आहे.

बीबीसीने सीआरपीएफचे निवृत्त महानिरीक्षक व्हीपीएस पवार यांच्याशी चर्चा केली. तेव्हा म्हणाले, "सीआरपीएफ सतत लढण्यासाठी सज्ज असते. एका पेचप्रसंगानंतर दुसऱ्या पेचप्रसंगाच्या येथे जाऊन लढणं सुरू असतं. माझ्या मते पुलवामा घटना ही मोठी चूक होती. परंतु त्यानंतर सीआरपीएफने काय धडा घेतला याबद्दल माझ्या मनात शंका आहे."

सीआरपीएफचा ताफा आता ज्या महामार्गावरुन जात असेल तेथे इतर वाहनांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

संघर्ष सुरू असलेल्या भागातून प्रवास करण्यासाठी वाहनांऐवजी विमानाचा वापर करता आला असता अशी टीका सरकारवर पुलवामा हल्ल्यानंतर करण्यात आली.

आता त्यातही बदल करण्यात आलेला आहे.

Image copyright RAJNISH PARIHAN

सीआरपीएफचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "आता जम्मू आणि श्रीनगर यांच्यामधील सीआरपीएफ जवान आणि अधिकाऱ्यांची ये-जा हवाई मार्गाने होते. तसेच हे लोक खासगी विमानाचा वापर करुन त्याचे पैसे सरकारकडून घेऊ शकतात."

जम्मू आणि श्रीनगर मार्गावरील सीसीटीव्हीचे जाळेही वाढवण्याचे काम सुरू आहे. सुरक्षेतील अडथळ्यांची माहिती मिळण्यासाठी हे सीसीटीव्ही थेट प्रक्षेपण उपलब्ध करुन देतील.

ताफ्यांचे संरक्षण करण्यासाठी महामार्गाच्या शेजारी लावण्यात आलेले ट्रक्सही बाजूला करण्यात येणार आहेत.

याबाबतीत नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणांसह आरोपपत्र कोर्टात अद्याप दाखल करण्यात आलेले नाही.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने हा प्रकरणाचा तपास 20 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्या हातात घेतला होता.

त्या वाहनाचा मालक, आत्मघातली हल्ला करणारी व्यक्ती, स्फोटकांचा प्रकार शोधणे हा त्याची पाळेमुळे शोधून काढण्याचा भाग असल्याचे एनआयने स्पष्ट केले आहे.

एनआयए सांगते, "या हल्ल्याची जबाबदारी घेत असल्याचे जैश ए मोहम्मदचा प्रवक्ता मोहम्मद हसनने माध्यमांना कळवले होते. त्याच्या कॉम्प्युटरचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुलवामा तपासादरम्यान जैशचे जाळं उघड झाले असून दुसऱ्या एका प्रकरणात UAPA कायद्यांतर्गत जैशच्या 8 लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जैशचा दक्षिण काश्मीरमधील कणाच मोडला आहे."

आरोपपत्र दाखल करण्याबाबत विचारले असता एनआयएने उत्तर दिले, "वरील कारणांमुळे कोणतेही आरोपपत्र दाखल केले नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)