कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या भीतीने त्याने केली आत्महत्या

व

आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यातील 50 वर्षीय एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. बालक्रिश्नय्या असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या भीतीनेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

चित्तूर जिल्ह्यातील शेषय्या नायडू गावात राहणाऱ्या बालक्रिश्नय्या यांनी सोमवारी आत्महत्या केली होती.

या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी न्यूजचे पत्रकार हृदया विहारी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

बालक्रिश्नय्या यांच्या पत्नी लक्ष्मीदेवी यांनी त्यांच्या पतीबाबत माहिती सांगितली. कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या संशयातून ते तणावात होते. कुटुंबीयांना त्यांच्यापासून दूर राहण्याची सूचना ते वारंवार करत होते, असं त्यांनी सांगितलं.

त्या सांगतात, "आम्ही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला जवळ न येण्याचा इशारा दिला. सोमवारी पहाटे ते सकाळी लवकर घरातून बाहेर पडले. त्यांच्या आईच्या शेताजवळ फाशी घेऊन त्यांनी आत्महत्या केली."

बालक्रिश्नय्या यांना पोटदुखी आणि घसादुखीची समस्या होती. वेगवेगळी माध्यमं तसंच सोशल मीडियावरील कोरोना व्हायरसच्या बातम्यांमुळे ते संभ्रमावस्थेत होते, असं कुटुंबीय सांगतात.

"बालक्रिश्नय्या हे 5 फेब्रुवारी रोजी आपल्या तिरूपतीतील रुईया हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बालक्रिश्नय्या यांनासुद्धा बरं वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिथेच वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर 8 फेब्रुवारीला ते तिथून परतले," असं बालक्रिश्नय्या यांच्या मृत्यूपर्यंतच्या घटनाक्रमाची माहिती देताना त्यांचे चिरंजीव बालामुरली यांनी सांगितलं.

Image copyright Bala murali

डॉक्टरांनी बालक्रिश्नय्या यांच्या मूत्राशयात संसर्ग आणि तोंडात अल्सर असल्याचं निदान केलं. त्यांना त्यानुसार औषधं लिहून देण्यात आली.

त्यांना लिहून देण्यात आलेली औषधांची चिट्ठी स्थानिक प्रशासनाने आंध्र प्रदेश सरकारला पाठवली आहे. त्यामध्ये बालक्रिश्नय्या यांची तब्येत अधिक बिघडू नये यासाठी मास्क घालण्याचा सल्ला दिल्याचा उल्लेख आहे.

अल्सर, मास्क, इंफेक्शन यांसारखे शब्द ऐकून आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, असं बालक्रिश्नय्या यांना वाटू लागलं होतं, असं कुटुंबीय सांगतात.

"माझे बाबा दिवसभर कोरोना व्हायरसशी संबंधित बातम्या विविध टीव्ही चॅनेलवर पाहत होते. त्यांच्यात दिसून आलेली लक्षणं कोरोना व्हायरसचीच असल्याचा त्यांचा समज झाला होता."

Image copyright Bala murali
प्रतिमा मथळा बालक्रिश्नय्या यांचा अंत्यविधी

"त्यांना कोरोना व्हायरसची लागण नाही, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्यांनी आम्हाला दूर राहण्याचा इशारा दिला. त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला दगड मारत होते. त्यांनी एकदा आपल्या मनगटावर चाकू धरून कापून घेण्याची धमकीही आम्हाला दिली होती. आम्हाला वाचवण्यासाठीच त्यांनी स्वतःचा जीव दिला."

"आम्ही दिवसभर त्यांना समजावत होतो. पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे झोपलेले असताना ते घरातून निघून गेले आणि फाशी घेतली," बाला सांगतात.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पेंचलय्या यांनी सरकारला पाठवलेल्या अहवालानुसार, तीन वर्षांपूर्वी बालक्रिश्नय्या यांची गॅस्ट्रोएंटेरिटीसची शस्त्रक्रिया झाली होती. तसंच त्यांना हायपर टेंशनची समस्या होती.

आरोग्य अधिकाऱ्यांकडे एंडेमिक आणि एपीडेमिक आजारांपासून संरक्षण, नियंत्रण आणि जिल्ह्यातील सगळ्या प्राथमिक आरोग्य संस्थांचे व्यवस्थापन यांची जबाबदारी असते. त्यांनी बालक्रिश्नय्या यांच्या मृत्यूची चौकशी केली आणि आपला अहवाल सरकारला दिला आहे.

बीबीसीशी बोलताना डॉ. पेंचलय्या यांनी सांगितलं, बालक्रिश्नय्या यांना धुम्रपान किंवा मद्यपानाची सवय नव्हती. त्यांच्या वैद्यकीय अहवालात त्यांना तोंडात अल्सर, खोकला आणि मूत्राशयाच्या समस्या आढळून आल्या. औषधोपचारानंतर ते बरे झाले असते. डॉक्टरांनी त्यांना मास्क घालण्याचा सल्ला दिल्यामुळे ते प्रचंड तणावाखाली आले. पण डॉक्टरांनी मास्क घालण्याचा सल्ला देण्याचं कारण पूर्णपणे वेगळं होतं.

डॉक्टरांनी त्यांच्या आजाराबाबत योग्य प्रकारे न सांगितल्यामुळे तसंच त्यांनी मास्कसारखा शब्द वापरल्यामुळे माझे वडील तणावात होते. त्यामुळेच त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं वाटू लागलं. त्यांना याबाबत योग्य माहिती नसल्यामुळेच असं झालं आहे, त्यांच्या मुलाने सांगितलं.

Image copyright DMHO Chittoor

बीबीसीने रुईया हॉस्पिटलचे निवासी आरोग्य अधिकारी डॉ. ई. आर. हरिकृष्णा यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनीच बालक्रिश्नय्या यांची तपासणी केली होती.

खोकला आणि तोंडातील अल्सर यांच्यासाठी ते हॉस्पिटलला आले. आम्ही त्यांची तपासणी करून त्यांना औषधं लिहून दिली. त्यांना खोकला असल्यामुळे आम्ही मास्क घालण्याचा सल्ला दिला. सर्दी, खोकला झालेल्या प्रत्येकाला आम्ही हा सल्ला देतो. पण फक्त मास्क वापरण्यास सांगितल्यामुळे एखादा व्यक्ती हे पाऊल उचलेल, याची आम्हाला कल्पना नव्हती, असं डॉ. हरिकृष्णा म्हणाले.

कुटुंबीयांनी कोरोना व्हायरसबाबत जारी केलेल्या टोल नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिथून मदत मिळू शकली नाही, अशी तक्रार मुलाने केली.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पत्रकं, पोस्टर यांच्यामार्फत जनजागृती सुरू असल्याचं डॉ. पेंचलय्या यांनी सांगितलं.

याप्रकरणी तपासापूर्वीच मृतदेहास अग्नी देण्यात आल्यामुळे माहिती मिळूनही एफआयआर दाखल करू न शकल्याचं क्षेत्रीय निरीक्षक पी. आरोहना राव यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)