राज ठाकरे यांचा मुंबईतील नायजेरियन्सवर ड्रग्स विक्रीचा आरोप कितपत योग्य?

नायजेरियन तरुण Image copyright Sharad Badhe / BBC

राज ठाकरेंनी 9 फेब्रुवारीला मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व यादी (NRC) प्रक्रियेच्या समर्थनार्थ 'महामोर्चा' काढला. तेव्हा केलेल्या भाषणात त्यांनी भारतात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या नायजेरियन लोकांचा उल्लेख केला.

"त्या मीरा भाईंदरला जा. नायजेरियाची लोकं आली आहेत. कोण त्यांच्यावर लक्ष ठेवायला नाही आहेत. पोलीस तिथं आत जाऊ शकत नाही आहेत, सरकार त्यांना साथ देत नाही आहे. त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही आहे.

"ते सगळे नायजेरियामधनं आलेले लोक ड्रग्स विकताहेत, स्वत: ड्रग्समध्ये असतात. तिथल्या महिलांची छेड काढतात, मुलींची छेड काढतात. पण काहीही होत नाही," असं राज ठाकरे त्यांच्या भाषणांत म्हणाले होते.

त्यानिमित्तानं गेली काही वर्षं संवेदनशील असलेल्या मुद्द्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. मुंबईत आणि देशाच्या इतरही भागात मोठ्या संख्येनं आफ्रिकन देशांतले अनेक नागरिक राहतात. पण अनेक कारणांनी, विशेषत: नायजेरियातून येणारे नागरिक वादात राहिले आहेत. पण त्यांना त्यांच्याविरुद्धच्या या भाषेबद्दल काय वाटतं? मुंबईत राहताना त्यांच्या काय तक्रारी आहेत?

मुंबईजवळच्या मीरा रोड, नालासोपारा, नायगाव, नवी मुंबई या भागात नायजेरियन आणि आफ्रिकन देशातले अनेक नागरिक राहतात. त्यांची लोकसंख्या असणाऱ्या वस्त्या इथे तयार झाल्या आहेत. अनेक जण इथे शिक्षणासाठी वा व्यवसायासाठी बऱ्याच वर्षांपासून राहताहेत.

पण सोबतच अनेक अवैध कृत्यांमध्येही नायजेरियन्सची नावं यापूर्वी आलेली आहेत. तणावपूर्वी घटना या भागात घडल्याच्या बातम्या आल्या आहेत. पोलिसांना कारवाईसुद्धा करावी लागली आहे.

बऱ्याचदा अंमली पदार्थांबद्दल वा आर्थिक गुन्ह्यांमध्ये नायजेरियन्सचा संबंध आला आहे, त्यांना पकडलं गेलं आहे. स्थानिक आणि या परदेशी नागरिकांचे वाद कायम संवेदनशील मुद्दा राहिला आहे.

या वादांवरून शिवसेना, मनसेसारख्या पक्षांनी आंदोलनंही केली आहेत. पण या तक्रारी काय इथे राहणाऱ्या सगळ्याच नायजेरियन वा आफ्रिकन नागरिकांबद्दल आहेत?

महेश शिंदे मिरा रोड इथे शिवसेनेचे शाखाप्रमुख आहेत. त्यांनी यापूर्वी नायजेरियन्सविरोधात आंदोलनं केली आहेत. ते म्हणतात, "पहिली गोष्ट की ते नायजेरियन आहेत. सगळे लोक दिसतात एकसारखे. यामध्ये चांगले कोण, वाईट कोण, आपण काय बघणार? चांगल्या लोकांनी चांगलं पण काम काही केलं नाही ना इथं, की आपण त्यांना चांगलं म्हणू शकतो. आम्हाला हे माहिती आहे की इथे हे लोक 'असं-असं' करतात.

"चांगले कोण, वाईट कोण काहीही सांगू शकत नाही. एखादी नायजेरियन व्यक्ती चांगलं काही करत असेल तर आपण तसं म्हणू शकतो. पण तसं काहीही इथं नाही. ते एका फ्लॅटमध्ये राहतात, पोलिसांची NOC घेतात भाड्यानं घर घ्यायचं असेल तर. त्यावेळेस 3-4 जणांची नावं देतात, 3-4 जणांच्या नावावर 10-15 लोक राहतात, म्हणजे त्या एग्रिमेंटचा पण काही फायदा नाही ना. म्हणजे कुठे तरी काहीतरी काही गोष्टी घडताहेत."

Image copyright Sharad Badhe / BBC
प्रतिमा मथळा महेश शिंदे

आम्ही जेव्हा या भागात फिरलो, इथल्या नागरिकांशी बोललो तेव्हा समजलं की इथे वाद होऊ लागल्यानंतर काही स्थानिक सोसायट्यांनी नायजेरियन नागरिकांना घरं भाड्यानं देणं बंद केलंय. काहींनी चालू करारसुद्धा रद्द करायला लावले.

त्यानंतर मीरा रोड परिसरातली बहुतांश वस्ती कमी झाली आहे. त्यातले अनेकजण नालासोपारा भागात रहायला गेले आहेत.

संदीप कांबळे हे मीरा रोडच्या 'पांडव एन्क्लेव्ह' सोसायटीमध्ये राहतात. "अॅग्रीमेंट कॅन्सल यासाठीच केलं की ते लोक बरोबर राहत नव्हते. अश्लील चाळेसुद्धा करत होते. परत शनिवार-रविवार रात्रभर त्यांच्या पार्ट्या पण चालायच्या. लोक पूर्ण कंटाळले होते इथले.

"आपली एक संस्कृती आहे 'अतिथी देवो भव' अशी. पण पाणी जर डोक्यावरच गेलं तर आपण काय करू शकतो? जर तुम्ही बाहेरून येऊन आपल्यामध्ये मिसळता आहात तर त्यांचं स्वागत आहे. पण इथे येऊन वेगळे चाळे करणे, शिड्यांवर बिअरच्या बॉटल्स ठेवणे, असं असेल तर आपण त्यांना आपल्या सोसायटीतून काढूनच टाकणार ना?" संदीप सांगतात.

नायजेरियन आणि इतर नागरिकांची वस्ती केवळ मुंबईतच नाही तर दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरांतही आहे. साधारण 60 हजारच्या आसपास त्यांची भारतातली लोकसंख्या असल्याचा अंदाज वर्तवला जातो. त्यातले अनेक जण शिक्षणासाठी वा व्यवसायासाठी अनेक वर्षं इथे वास्तव्याला आहेत. मग त्यांच्यापैकी काही जणांच्या कृत्यांमुळे सर्वांनाच नावं ठेवायची का?

प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तशाच याही प्रश्नाला आहेत.

राजकीय पक्षांकडून होणाऱ्या या टीकेबद्दल, आरोपांबद्दल मुंबईत राहणाऱ्या काही नायजेरियन नागरिकांना आम्ही बोलतं करण्याचा प्रयत्न केला. भारतात वास्तव्याला असणाऱ्यांची नायजेरियन नागरिकांची 'नायजेरियन स्टुडंट्स अँड कम्युनिटी वेल्फेअर असोसिएशन' सुद्धा आहे. त्यांच्या मुंबई शाखेचेही 600हून अधिक सभासद आहेत.

या असोसिएशनच्या कार्यालयात गेलं की तिथे काहींच्या चेहऱ्यावर शंका आणि चिंता स्पष्टपणे दिसली. कार्यालयात या संघटनेचे अध्यक्ष दाऊद अकिंडेले अरेजी आणि उपाध्यक्ष ख्रिस्तोफर ओबासी यांच्यासह इतर काही लोक आम्हाला भेटले.

परिचय झाल्यावर, विषयाला हात घातलल्यावर ते जरा मनमोकळेपणाने बोलू लागले. अशा प्रकरणात सरकरटीकरण केलं जातं आहे, असं त्यांना वाटतं. ते नाकारत नाहीत की त्यांच्या देशातून आलेले काही जण अंमली पदार्थ बाळगण्या किंवा त्याचं सेवन करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडले गेले आहेत. पण इथे राहणारे सगळेच नायजेरियन असेच आहेत, हे म्हणणं चुकीचं आहे, असं त्यांना वाटतं.

Image copyright Sharad Badhe / BBC
प्रतिमा मथळा ख्रिस्तोफर ओबासी

"मी असं म्हणून शकत नाही की हे पूर्णपणे खोटं आहे, पण हा प्रश्न एकाच दृष्टिकोनातून मतं ठरवण्याचा आहे. इथं राहणाऱ्यांना आफ्रिकन लोकांना आपली मतं सांगण्याचा अधिकारच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एकच बाजू कायम ऐकू येते," असं ओबासी म्हणाले.

"अर्थशास्त्रात आपल्याला कायम डिमांड आणि सप्लायबद्दल सांगितलं जातं. त्यामुळे कोणी जर 18 करोड लोकसंख्येच्या देशातले सगळे जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, असं सरसकटपणे म्हणत असेल तर मग असं म्हणणं बरोबर असेल का की सगळे भारतीय ड्र्ग्सच्या आहारी गेलेत?

"कारण जगभराचे आकडे बघितले तर असं दिसतं की नायजेरियामध्ये ड्र्ग्सची निर्मिती होत नाही. तिकडे तुम्हाला ड्र्ग्स सापडणार नाहीत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ड्रग डीलर म्हणणं हे गडबडीत तयार केलेलं मत आहे. मी त्याच्याशी सहमत नाही. आमच्यातले अनेक जण अनेक प्रकारचे व्यवसाय इथे करताहेत. आमच्यातल्या अनेकांना ड्रग्स कसे दिसतात, हे माहीतसुद्धा नाही," ओबासी सांगतात.

व्हिसाची मुदत संपून गेल्यावरही काही जण बेकायदेशीररीत्या इथं राहतात, ते मायदेशी परत जात नाहीत, या आरोपाविषयी आम्ही ख्रिस्तोफर यांना विचारलं. "माझं इथल्या नागरिकांना हेच सांगणं आहे की आम्ही बेकायदेशीर राहणारे स्थलांतरित नाही आहोत. आम्ही कायदेशीर मार्गानेच भारतात आलो आहोत."

Image copyright Sharad Badhe / BBC
प्रतिमा मथळा दाऊद

या संघटनेचे अध्यक्ष दाऊद अकिंडेले अरेजी सांगतात, "भारतात काय होतं की जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा ते तुम्हाला सहा महिन्यांचा किंवा तीन महिन्यांचा व्हिसा देतात. तो व्हिसाचा काळ संपला तर तो गुन्हा आहे का? जर तुम्ही परत गेला नाही तर तुम्हाला इथं थांबण्यासाठी दंड भरावा लागतो. त्यामुळे सामान्य लोकांना समजत नाही की हे लोक कुठून येतात आणि तुमच्या देशात का राहतात."

काही नायजेरियन्स चुकीच्या कृत्यांमध्ये पकडले गेल्यानं इथे येणारे सगळेच तसे नाहीत, असं त्यांना स्पष्ट करायचंय. अनेक जणांचे इथे व्यवसाय आहेत आणि कित्येक भारतीय त्यांच्याकडे वा त्यांच्यासोबत काम करतात.

काहींना उत्तर हिंदी आणि मराठीसुद्धा समजतं, बोलताही येतं. पण निर्दोषांना टार्गेट केलं जातं याबाबत त्यांना वाईट वाटतं.

"खूप नायजेरियन्स चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केले जातात. आम्ही असं म्हणत नाही की लोक गुन्हेगारीपासून मुक्त आहोत, पण तुम्ही एका व्यक्तीकडे बोट दाखवून ते सिद्ध करू शकत नाही.

Image copyright Sharad Badhe / BBC

"मी भारतीयांनाच विनंती करतो की तुम्हीच स्वत: तपास करून पाहा. आम्हाला याचा त्रास होतो आहे की अनेक निर्दोषींना पकडलं जातंय. ते तुरुंगात आहेत. ते कोणत्या कारणानं आत आहेत हे त्यांनाच माहीत नाही. सगळे आरोप खोटे असतात," असं इथेच बसलेले एल्व्हिस ओवी बॉबी सांगतात.

फवाले क्लॅमंट ओलाजिदे पाच वर्षांपासून मुंबई विद्यापीठात शिकतोय. मास्टर्स झाल्यावर आता तो राज्यशास्त्रात पीएच.डी करायची तयारी करतोय. नुकताच सिंधुदुर्गात एका फिल्म फेस्टिव्हलला जाऊन आल्याचं तो आवर्जून सांगतो.

"मी अनेकांना म्हणतो की मी 'सन ऑफ युनिव्हर्स' आहे. मी भारतीयांकडे पाहतो किंवा इतर देशाच्या कुणाला भेटतो, तेव्हा त्यांना माझं म्हणणं समजतं, भाषा कळते. मग आपण एक आहोत. आपण सगळे एक आहोत. लोकांनी असंच समजायला हवं. हेच नेत्यांनी सुद्धा म्हणायला हवं. लोकांच्या हितासाठीच बोलायला हवं," क्लॅमंट म्हणतो.

त्याचं बोलून झाल्यावर आवर्जून 'जय महाराष्ट्र' म्हणतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)