औरंगाबादचा विकास करा, मगच संभाजीनगर नामांतरासाठी मीच पुढाकार घेईन: इम्तियाज जलील #5मोठ्याबातम्या

इम्तियाज जलील Image copyright Imtiaz jaleel/facebook
प्रतिमा मथळा इम्तियाज जलील

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. औरंगाबादचं नाव संभाजी नगर करण्याची चर्चा पुन्हा सुरू

औरंगाबाद जिल्ह्याचं नाव 'संभाजीनगर' करण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी केला. त्यानंतर बोलताना औरंगाबादचे AIMIMचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले, "आधी पुढच्या 4 वर्षात औरंगाबादचा विकास करा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्या. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ,"

दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

ते म्हणाले, "औरंगाबादमध्ये सध्या विकासाची गरज आहे. येथील लोकांना, इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा, नाव बदलायचं की विकास करायचा? संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. आधी पुढील 4 वर्षांमध्ये शहराचा विकास करावा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्यावा. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ.

"तुम्ही जर कचरामुक्त शहर केले तर मी स्वत: संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन. फक्त नाव बदलून तुम्ही काय साध्य करणार आहात?"

ते पुढे म्हणाले, "मी 32 वर्षांपासून ऐकत आहे की औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणार आहे. फक्त निवडणुकीदरम्यान हा मुद्दा येतो. आता महानगर पालिकेची निवडणूक येत आहे, त्यामुळेच नामांतराची पुन्हा मागणी होणार हे 200 टक्के माहिती होतं. कचरा, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे आहेत, पण यावर तुम्ही बोलणार नाही. ज्यांना काही कामं उरली नाहीत तेच असे मुद्दे उपस्थित करत आहेत."

औरंगाबादच्या या नामांतरला राज ठाकरेंनीही पाठिंबा दिलाय. औरंगाबादच्या दौऱ्यावर गेलेले राज ठाकरे म्हणाले, "औरंगाबादचं नाव बदललं तर काय हरकत आहे? चांगले बदल झाले पाहिजेत."

2. टेलिकॉम कंपन्यांना आदेश: आज मध्यरात्रीपर्यंत 1.47 लाख कोटी जमा करा

आज रात्री 12 वाजेपर्यंत टेलिकॉम कंपन्यांनी 1. 47 लाख कोटी रुपये जमा करावेत, असे आदेश सरकारनं दिले आहेत. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

Image copyright Reuters

याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं टेलिकॉम कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि सरकारला फटकारलं होतं. ही रक्कम जमा का करण्यात आली, त्यासाठी एवढा ऊशीर का झाला? अशी विचारणा केली होती. त्यानंतर सरकारनं हे आदेश दिले आहेत.

यामध्ये व्होडाफोन, आयडिया, भारती एअरटेल टेलिकॉम कंपन्यांचा समावेश आहे.

सरकारच्या आदेशानंतर भारती एअरटेलनं 20 फेब्रुवारीपर्यंत 10 हजार कोटी रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं आहे.

3. चंद्रकांत पाटील: आता मध्यावधी निवडणुकांची तयारी

महाआघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडबुद्धीने, द्वेषभावनेतून वागत असून शिवसेनेबरोबर पुन्हा लगेच सूर जुळणे कठीण आहे. भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठीच तयारी सुरू आहे, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना मांडलं आहे.

Image copyright facebook

"महाआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल," असंही त्यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, "तीन पक्षांचे महाआघाडी सरकार भिन्न विचारांचे असून अनेक विषयांवर मतभेद होत असल्याचे दिसून येत आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) करायचा की राज्य पोलिसांकडून करायचा, या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फिरविला. अशा प्रकारे महाआघाडी सरकारमध्ये मतभेद वाढत जातील आणि विसंवादातून सरकार पडेल, आम्हाला त्यासाठी काहीही करण्याची गरज नाही."

4. उत्तर प्रदेश सरकारला हायकोर्टाची चपराक

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानासाठीची भरपाई आंदोलकांकडून करण्यात यावी, या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला अलाहाबादच्या उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

लाईव्ह लॉ या वेबसाईटनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

कानपूर येथील एका याचिकाकर्त्यानं सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर न्यायाधीश पंकज नक्वी आणि सौरभ श्याम शमशेरी यांच्या खंडपीठानं सरकारच्या वसुलीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

5. कोरोनामुळे राज्यात चिकनचा खप ३०० टनांनी घटला

चिकनमधून कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असल्याच्या अफवा व्हायरल होत असल्यामुळे त्याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसतोय. या अफवांमुळे राज्यात दर दिवशी चिकनची विक्री जवळपास 300 टनांनी घटली आहे, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिलीय.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार चिकनमधून होत नसल्याचे सांगून चिकन हे मानवी आहारासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)