पाळी सुरू आहे का, हे तपासण्यासाठी सर्व विद्यार्थिनींना अंडरवेअर काढायला लावल्याचा कॉलेजवर आरोप

पाळी Image copyright Getty Images

गुजरातच्या भूज शहरातील एका महाविद्यालयात मुलींची पाळी सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी मुलींना बळजबरीने अंडरवेअर काढायला लावण्याची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.

मुलींनी पाळीदरम्यान हॉस्टेलच्या धार्मिक नियमांचा भंग केला, अशी तक्रार हॉस्टेल प्रमुखांनी मुख्याध्यापकांकडे केली होती. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींना स्वामीनारायण संप्रदायाच्या परंपरांबद्दल एक मोठं व्याख्यान देण्यात आलं. त्याचबरोबर ज्या मुलींना पाळी सुरू आहे त्यांनी स्वेच्छेनुसार समोर येण्याचं आवाहन करण्यात आलं.

स्वामीनारायण संप्रदायाच्या नियमाअंतर्गत मासिक पाळीदरम्यान महिलांना मंदिरात आणि स्वयंपाकघरात जाण्यास मनाई असते.

या घटनेने प्रचंड मानसिक धक्का बसला असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं आहे आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गुजरात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष लीलाबेन अंकोलिया यांनी बीबीसी गुजरातीचे पत्रकार भार्गव पारीख यांच्याशी बोलताना सांगितलं की पोलिसांकडे चार लोकांविरुद्ध तक्रार करण्यात आली असून त्यात महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नेमली आहे. ही समिती महाविद्यालयाचा दौरा करणार आहे.

महाविद्यालय प्रशासनाने देखील या घटनेवर आश्चर्य व्यक्त केसं असून या घटनेची चौकशी केली जाईल आणि याबाबतीत कोणतीही हयगय केली जाणार नाही.

मात्र कच्छ विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या मते हे प्रकरण हॉस्टेलचं आहे आणि नियमभंग केलेल्या विद्यार्थिनींनी माफीही मागितली आहे.

विद्यार्थिनींचं काय म्हणणं आहे?

बीबीसी गुजरातीसाठी काम करणारे स्थानिक पत्रकार प्रशांत गुप्ता यांनी कॉलेजच्या काही विद्यार्थिनींशी बातचीत केली. त्यापैकी एक विद्यार्थिनी म्हणाली, "11 फेब्रुवारीला एक-एक करत सर्व विद्यार्थिनींना बाथरूममध्ये नेण्यात आलं आणि आम्हाला पाळी सुरू आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. त्यांनी आम्हाला हात लावला नाही, मात्र त्यांच्या बोलण्याने आम्ही इतक्या घाबरून गेलो की आम्ही कपडे काढून त्यांना शहानिशा करू दिली."

त्याचबरोबर कायदेशीर कारवाईसाठी आधी हॉस्टेल सोडावं लागेल, असं विद्यापीठाच्या कार्यकारी समितीचे सदस्य प्रवीण पिंडोरिया यांनी सांगितल्याचा आरोप विद्यार्थिनींनी लावला आहे.

महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक रीताबेन, समन्वयक अनिताबेन आणि शाळेच्या मुख्याध्यापिका दक्षाबेन यांनी विद्यार्थिनींना भावनिक साद घातल्याचा आरोपही त्यांनी लावला.

एक विद्यार्थिनी म्हणाली, "त्यांनी आमच्याकडून एक चिठ्ठी लिहून घेतली की हे प्रकरण आम्ही फार वाढवणार नाही तसंच आम्हाला कॉलेज किंवा संप्रदायाशी कोणतीही अडचण नाही."

तर काही विद्यार्थिनींच्या मते कोणतीही बळजबरी झालेली नाही.

Image copyright Prashant Gupta

एक विद्यार्थिनी म्हणाली, "पाळीदरम्यान मुलींना वेगळं बसावं लागतं. हा संस्थेचा नियम आहे. काही विद्यार्थिनींनी हा नियम पाळला नाही. त्यासाठी एक विशेष नोंदवही असते. त्यात गेल्या दोन महिन्यात एकाही मुलीने नाव लिहिलं नाही."

एक दिवस एका शिक्षिकेने येऊन कोणकोणत्या मुलींना पाळी सुरू आहे, अशी विचारणा केली. तेव्हा सर्वांनी नकारार्थी उत्तरं दिली आणि हवं तर त्या स्वत: तपासणी करू शकतात, असं विद्यार्थिनी म्हणाल्या.

विद्यार्थिनी पुढे म्हणाल्या, "मुलींनी स्वत:हून तपासणी करू दिली. मात्र काही दिवसांनी काही विद्यार्थिनींनी आरोप केला की त्यांना बळजबरीने असं करायला लावलं, मात्र असं काही झालेलं नव्हतं."

महाविद्यालय प्रशासनाचं काय म्हणणं आहे?

महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र मुलींनीच नियम तोडल्याचं म्हटलं आहे.

कच्छ विद्यापीठाच्या कुलगुरू दर्शना ढोलकिया म्हणाल्या, "मासिक पाळी सुरू असताना इतर लोकांबरोबर खानावळीत जेवू शकत नाही, असा हॉस्टेलचा नियम आहे. हे कॉलेज स्वामीनारायण संप्रदायाचं असल्यामुळे हा नियम करण्यात आला आहे."

तक्रार प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थिनींची बाजू जाणून घेतल्याचंही त्या म्हणाल्या.

Image copyright Prashant Gupta

त्यांनी सांगितलं, "मुलींनी स्वत:हून तपासणी करवून घेतली. तिथल्या स्टाफनेही त्यांना हातही लावला नाही. काही मुलींची पाळी सुरू होती. त्यांनी माफीही मागितली. त्यामुळे काही मुली खोटं बोलल्या. त्यांचीही चूक आहेच."

या प्रकरणात दोषी असलेल्या लोकांवर कडक कारवाईचं आश्वासनही त्यांनी दिलं.

स्वामीनारायण कन्या विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त प्रवीण पिंडोरिया यांनीही कारवाईचं आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले, "ही खूप जुनी संस्था आहे. अशी घटना याआधी कधीही घडली नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं कळल्यावर मी त्यात लक्ष घातलं आणि हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू आणि दोषींवर कारवाई केली जाईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)