Srinivasa Gowda: उसेन बोल्टला आव्हान देतोय चक्क म्हशींबरोबर पळून...

श्रीनिवास गौडा, उसेन बोल्ट, शर्यत, Image copyright ANNU PAI
प्रतिमा मथळा श्रीनिवास गौडा

धावायला सुरुवात करून डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत शर्यत जिंकणारा उसेन बोल्ट जगभरात प्रसिद्ध आहे. बोल्टच्या वेगमैफलीला आव्हान देईल असा धावलिया भारतात असेल तर! कर्नाटकमधले श्रीनिवास गौडा या धावपटूला भारताचा बोल्ट अशी बिरुदावली मिळाली आहे. त्याला कारणही तसंच आहे.

कर्नाटकमध्ये कंबाला शर्यत आयोजित केली जाते. बैलांच्या किंवा म्हशींच्या जोडीबरोबर धावायचं असतं. बांधकाम कामगार म्हणून काम करणाऱ्या श्रीनिवासन यांनी 142 मीटरचं अंतर अवघ्या 13.42 सेकंदात पूर्ण केल्याचं समजतं. ही शर्यत शेतात होते. 100 मीटर शर्यतीचा जागतिक विक्रम बोल्टच्या नावावर असून त्याने 9.58 सेकंदात हे अंतर कापलं होतं. श्रीनिवास यांनी बोल्टच्या आकडेवारीला साधर्म्य राखेल अशा वेळेत शर्यत पूर्ण केल्याने त्याला भारताचा बोल्ट अशी बिरुदावली मिळाली आहे.

दरम्यान श्रीनिवास यांच्या कामगिरीची बोल्टची तुलना करू नये असं कंबाला शर्यतीच्या आयोजकांनी म्हटलं आहे. ऑलिम्पिक इव्हेंट मॉनिटर्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये धावपटूंच्या वेळेची नोंद ठेवणारी यंत्रणा अत्यंत शास्त्रोक्त आणि अत्याधुनिक असते. त्यामुळे श्रीनिवास आणि बोल्ट यांची तुलना करण्याच मोह टाळावा असं कंबाला अकादमीचे अध्यक्ष के.गुणपला कंदाबा यांनी म्हटलं आहे.

स्थानिक वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांनी श्रीनिवास याला थेट बोल्टची उपमा देत त्याचं कौतुक केलं होतं.

Image copyright ANNU PAI
प्रतिमा मथळा श्रीनिवास गौडा

पिळदार शरीरयष्टीचे श्रीनिवास दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूदाबिद्रीचे आहेत. माझ्याइतकंच दोन म्हशींची भूमिका महत्त्वाची असल्याचं श्रीनिवास यांनी सांगितलं.

गेली सात वर्ष कंबाला शर्यतीत सहभागी होत असल्याचं श्रीनिवास यांनी सांगितलं.

कंबाला शर्यत नेमकी कशी असते?

तुलू भाषेत कंबाला शब्दाचा अर्थ पाणी-चिखलाने भरलेलं शेत असा होतो. ही शर्यत कर्नाटकच्या ग्रामीण परंपरेचा भाग आहे.

शर्यतीत सहभागी होणारे धावपटू बैल किंवा म्हशीच्या जोडीबरोबर शेतातून साधारण 132 किंवा 142 मीटरचं अंतर पळतात.

माणसांच्या बरोबरीने प्राणीही शर्यतीत सहभागी होत असल्याने आंतरराष्ट्रीय प्राणीप्रेमी संघटनेने या शर्यतीवर टीका केली होती.

2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील बैलांच्या पारंपरिक शर्यत असलेल्या जलीकट्टू प्रकारावर बंदी आणली होती.

दोन वर्षांनंतर कर्नाटकमध्येही कंबाला शर्यतीच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली होती.

प्राण्यांना कोणतीही इजा न करता, त्यांना धाक न दाखवता ही शर्यत कशी आयोजित करता येईल यावर संघटनेने भर दिल्याचं प्राध्यापक कदंबा यांनी सांगितलं.

2018 मध्ये कर्नाटक सरकारने कंबाला शर्यतीच्या आयोजनाला कठोर अटींसह परवानगी दिली. प्राण्यांवर हंटर चालवता येणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं.

दरम्यान प्राणीहक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा संघटनेने याशर्यतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

श्रीनिवास सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरण रीजेजू यांनी याप्रकरणी लक्ष घातलं आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने श्रीनिवास यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांचं रेल्वेचं तिकीट काढण्यात आलं आहे. ते सोमवारी साइ केंद्रात पोहोचतील. त्यांची धावण्याची चाचणी घेण्यासंदर्भात मी अव्वल प्रशिक्षकांशी बोललो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही सगळेजण प्रतिभाशोध घेण्यासाठी कटिबद्ध आहोत असं केंद्रीय क्रीडामंत्री किरण रीजेजू यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)