शाहीनबाग: पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आंदोलक अमित शाहांना न भेटताच परत

शाहीन बाग Image copyright ANI

CAA आणि NPR विरोधात शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. आज हे आंदोलक गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन निघाले होते.

अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली होती. पण अमित शाह यांनी भेटण्याची वेळ दिलेली नसेल तर तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही असं पोलिसांनी त्यांना सांगितलं आहे. त्यानंतर आंदोलक शाहीनबाग येथे परतले.

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलन सुरू असून अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. सुरुवातीला गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेची तयारी दाखवली नव्हती पण आता ते चर्चेला तयार झाले आहेत.

शिष्टमंडळातील लोक काय म्हणाले?

शनिवारी संध्याकाळी आंदोलनकर्त्यांचं एक शिष्टमंडळाने शाहीनबाग पोलीस ठाण्याला भेट दिली. सर्वं गृहमंत्री अमित शाह यांच्या घरापर्यंत जाऊ देण्याची परवानगी त्यांनी पोलिसांकडे मागितली. मात्र तसं झालं तर त्यात महिला आणि लहान मुलं असतील. त्यांच्या सुरक्षेची हमी कोणीही घेणार नाही असं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं.

पोलीस अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दहा ते पंधरा लोकांची निवड करण्यास सांगितलं. तेच लोक गृहमंत्र्यांशी जाऊन बोलतील असं ते म्हणाले. याच शिष्टमंडळात शाहीन कौसर यांचाही समावेश होता.

त्या म्हणाल्या, " पोलीस अधिकारी आमच्याशी चांगले वागले. सर्व लोकांना ते घरापर्यंत जाण्याची परवानगी का देऊ शकत नाहीत याची कारणं त्यांनी आम्हाला सांगितली. दहा पंधरा लोक गेले तर काहीही अडचण नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आता पुढे काय करायचं याबदद्ल आम्ही आंदोलनाला बसलेल्या महिलांशी चर्चा करू."

मात्र या नेतृत्वहीन आंदोलनात सरकारशी कोण चर्चा करणार आणि महत्त्वाचं म्हणजे काय चर्चा करणार यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.

गृहमंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या शिष्टमंडळात ज्येष्ठ नागरिक विशेषत: तिथल्या आज्यांचा समावेश व्हावा अशी चर्चा सुरू आहे. मात्र इतक्या मोठ्या मुद्द्यावर फक्त महिला सरकारशी चर्चा करू शकत नाही हाही मुद्दा उपस्थित झाला.

Image copyright Getty Images

शिष्टमंडळातील एक सदस्य जुबैर यांच्या मते आता असा प्रश्न उपस्थित झालाय की नागरिकत्व सुधारणा कायदा, NRC यांच्याविरोधात आंदोलन करणारे एकटे नाही. संपूर्ण भारतात या मुद्दयांवर 300 ठिकाणी शाहीनबाग सारखं आंदोलन होत आहे. गृहमंत्री चर्चा करण्यासाठी तयार आहेत मात्र कुणाशी हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही असंही ते पुढे म्हणाले.

दुसरीकडे शाहीनबागच्या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गृहमंत्र्यांनी वेळ दिली की नाही याबाबत सरकारी सुत्रांनी कोणतीही माहिती दिली नाही.

Image copyright Getty Images

आंदोलकांपैकी एक असलेल्या जावेद म्हणतात की संपूर्ण मुद्द्यांवर ते आंदोलकांशी चर्चा करतील त्यानंतरच एखादा निष्कर्ष निघेल.

मात्र सद्यपरिस्थितीत असा कोणताही चेहरा नाही ज्याचं सगळं ऐकलं जाईल. कारण सध्या आंदोलनाला कोणतंही ठोस नेतृत्व नाही. शाहीनबागमध्ये आंदोलन करणारी लोकं कुणाचंही ऐकायला तयार नाहीत. मग अगदी सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा नेते. आंदोलकांवर कशाचाही परिणाम होताना दिसत नाहीये.

आंदोलकांतर्फे कोण चर्चा करणार

एकदा तर अशी परिस्थिती निर्माण झाली की सगळ्यांनाच अमित शाहांशी बोलायचं होतं. ते अर्थातच शक्य नाही. मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर शाहीनबागच्या शिष्टमंडळाशी अमित शाहांनी चर्चा केली तर आसाममधील आंदोलकांचं काय? तिथले आंदोलक शिष्टमंडळाचं ऐकतील का? इथेच सगळा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या

'कर्नाटकातल्या गावात साधं किराणा घ्यायला गेलं की तिप्पट पैसे मागतात,' मराठी मजुरांची व्यथा

कोरोना लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - अजित पवार

इटलीच्या चुकांमधून भारताने काय शिकण्यासारखं आहे?

स्थलांतरितांचा प्रश्न केंद्राने लष्कराकडे सोपवायला हवा होता का?

कम्युनिटी ट्रान्सफरच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र गेलाय का?

'गंगाधर ही शक्तिमान है', आणि तो परत आलाय

कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कार कसे करावेत?

निजामुद्दिनच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातले १०० पेक्षा जास्त लोक सहभागी

'सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापणार नाही, टप्प्याटप्प्याने देणार'