जामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर

जामियातील विद्यार्थ्यांवर हल्ला Image copyright JCC

15 डिसेंबरला जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराचा आणखी एक व्हीडिओ समोर आला आहे. हा व्हीडिओ खरा आहे का?

29 सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस, लायब्ररीत बसलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करताना दिसत आहेत. मुलं खुर्चीखाली लपताना दिसत आहेत, काही मुलं पोलिसांसमोर हात जोडून न मारण्याची विनंती करत आहेत.

जामियामधील विद्यार्थ्यांची संघटना जामिया कोऑर्डिनेशन कमिटीने 16 फेब्रुवारीला रात्री 1 वाजून 37 मिनिटांनी हा व्हीडिओ ट्वीट केला. लगेचच सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाला.

मात्र हा व्हीडिओ आला कुठून? ठीक दोन महिन्यांनंतर तो का शेअर करण्यात आला? या सगळ्या प्रश्नांची पडताळणी बीबीसीने केली.

आम्ही जामिया कोऑर्डिनेशन कमिटीचे मुख्य सदस्य सफोरा यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले, "हा व्हीडिओ आम्हाला काल रात्रीच मिळाला. ही एमफिलची लायब्ररी आहे. ही लायब्ररी पहिल्या मजल्यावर आहे. कॉलेज प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची कॉपी पोलिसांना सादर केली होती."

ही कॉपी आम्हालाही द्या अशी विनंती आम्ही केली मात्र न्यायालयाचं कारण सांगत आम्हाला हा व्हीडिओ देण्यात आला नाही. महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर करू असं कॉलेजने सांगितलं. मात्र दोन महिन्यांनंतरही पोलिसांच्या लाठीमारासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. याप्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं.

हा व्हीडिओ कुठून मिळाला या प्रश्नावर सफोरा सांगतात, "आमच्या विद्यापीठाची लोकल वेबसाईट चालते. त्याचं नाव महफिले-ए-जामिया. काल रात्री तिथूनच आम्हाला हा व्हीडिओ मिळाला."

यानंतर आम्ही महफिले-ए-जामिया इस्लामियाचे सदस्य मोहम्मद हारिफ यांच्याशी आम्ही बाचतीत केली. हारिफ बीएसस्सी फिजिक्स ऑनर्सचा विद्यार्थी आहे. "हा व्हीडिओ 15 फेब्रुवारीला रात्री उशिरा व्हॉट्स्अप ग्रुप स्टुंडट ऑफ बिहार इथे मिळाला. मात्र व्हीडिओ शेअर केल्यानंतर त्या व्यक्तीला लोकांनी प्रश्न विचारून घेरलं. घाबरून त्या व्यक्तीने व्हीडिओ डिलिट केला आणि ग्रुपही सोडला. मी त्याच्याशी बोललो तेव्हा तो खूप घाबरलेला होता. आपण अडकू अशी भीती त्याला वाटत होती."

29 सेकंदाच्या हा व्हीडिओ दोन व्हीडिओ क्लिप जोडून तयार करण्यात आला आहे. व्हीडिओचा स्पीड 10 फ्रेम प्रति सेकंद इतका होता असं हारिफ यांनी सांगितलं. नव्याने तयार करण्यात आलेल्या व्हीडिओचा स्पीड 20 फ्रेम प्रति सेकंद केल्याचं हारिफ यांनी सांगितलं. पोलिसांची कारवाई स्पष्टपणे दिसावी यासाठी व्हीडिओचा स्पीड जास्त केल्याचं त्यांनी सांगितलं.

व्हीडिओच्या सत्यासत्येबाबत साशंकता होती. त्यामुळे आम्ही जामिया विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अजीम यांना विचारलं. ते म्हणाले, व्हीडिओ खरा आहे. मात्र जामियाच्या अधिकृत हँडलवरून हा व्हीडिओ ट्वीट करण्यात आलेला नाही. हा व्हीडिओ खरा आहे. मात्र मी यावर जास्त काही बोलू शकत नाही.

कॉलेज प्रशासनाने व्हीडिओ पोलिसांना दिला होता का? यावर ते म्हणाले, मी यावर बोलू इच्छित नाही. आम्हाला थोडा वेळ द्या.

Image copyright BBC/KIRTIDUBEY
प्रतिमा मथळा जामिया मिलिया

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांप्रती दिल्ली पोलिसांची भूमिका वादग्रस्त ठरली आहे. हा व्हीडिओ तिथलाच आहे. यामुळे आम्ही दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एम.एस.रंधावा यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले, आम्ही व्हीडिओ पाहिला. काही सांगण्यापूर्वी आम्ही चौकशी करू. आम्ही तो व्हीडिओ नीट पाहू.

दोन महिन्यांनंतर हा व्हीडिओ शेअर करण्याचा काय अर्थ असं आम्ही सफोरा यांना विचारलं. ते म्हणाले, कोणीही आमच्याबरोबर नाही. दोन महिने उलटून गेले मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. आमच्यावर काय प्रसंग ओढवला होता हे जगाला समजावं असा आमचा हेतू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. व्हीडिओ शेअर केल्याने आमच्यावर कारवाईही होऊ शकते.

दरम्यान दिल्ली पोलीस स्पेशल कमिशनर प्रवीर रंजन यांनी सांगितलं की आम्ही या व्हीडिओची दखल घेतली आहे. याची चौकशी करू असं एएनआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

बीबीसीने केलेल्या पडताळणीत विद्यापीठ हा व्हीडिओ खरं असल्याचं मानत आहे. दुसरीकडे पोलिसांनी या व्हीडिओच्या सत्यासत्येवर प्रश्न उपस्थित केलेला नाही. हा व्हीडिओ 15 डिसेंबरच्या संध्याकाळचा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)