इंडियन वुमन लीग: महिला फुटबॉलपटूंचं दे दणादण!

इंडियन वुमन लीग Image copyright AIFF
प्रतिमा मथळा महिला फुटबॉलपटू

गेल्या काही वर्षात भारतात विविध खेळांच्या लीगचं पेव फुटलं आहे. क्रिकेटमध्ये आयपीएल रुजल्यानंतर हॉकी इंडिया लीग, फुटबॉलमध्ये आयएसएल, प्रीमियर बॅडमिंटन लीग, प्रो कबड्डी लीग, टेनिस लीग, कुस्ती लीग, बॉक्सिंग लीग आणि आता टेबल टेनिस लीगही सुरू झाली आहे. हॉकी इंडिया लीग आता बंद झाली आहे. मात्र तरीही लीग स्पर्धा खेळांच्या प्रचार आणि प्रसारात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत हे नक्की.

भारतात ज्या पद्धतीने महिला फुटबॉलकडे दुर्लक्ष करण्यात येतं ते पाहता देशात महिला फुटबॉलपटूंसाठी लीग स्पर्धा सुरू होईल असा कुणी विचारही केला नसेल. इंडियन वुमन लीगचा चौथा हंगाम शुक्रवारी बेंगळुरुमध्ये संपला.

जेतेपदासाठी गोकुलम केरळा आणि कृफ्सा या संघांमध्ये झाला. गोकुलम केरळ संघाने हा सामना 3-2 असा जिंकला. केरळ संघातर्फे परमेश्वरी देवी, कमला देवी आणि सबित्रा भंडारी यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. याआधी सेतू फुटबॉल क्लब, स्टुटंड्स फुटबॉल क्लब आणि इस्टर्न स्पोर्टिंग युनियन या संघांनी जेतेपदावर नाव कोरलं आहे.

यंदाच्या स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले होते. सहा-सहा अशा दोन गटात संघांची विभागणी करण्यात आली होती. मणिपूर, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, शेष भारत असे संघ सहभागी झाले होते.

2016-17 मध्ये लीगच्या पहिल्या हंगामात केवळ सहाच संघ होते. पुढच्याच हंगामात काही विदेशी महिला खेळाडू स्पर्धेचा भाग झाल्या.

गोकुलम फुटबॉल संघात युगांडाच्या फजीला इक्वापुत आणि रिताह नाब्बोसा यांच्याबरोबरच इंग्लंडची टेन्वी हैंस, बांगलादेशच्या सबीना खातून आणि कृष्णा रानी याही होत्या.

इंडियन वुमन लीगच्या एका हंगामात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मणिपूर पोलीस स्पोर्ट्स क्लबची खेळाडू आणि भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार नांगोम बाला देवीच्या नावावर आहे.

बाला देवीने 2018-19च्या तिसऱ्या हंगामात 26 गोल केले. 2016-17 पहिल्या हंगामात इस्टन स्पोर्टिंग युनियनच्या कमला देवी तर 2017-18 हंगामात नांगोम बाला देवी यांनी प्रत्येकी 12 गोल केले. 2017-18 हंगामात बाला देवीने कृफ्सा फुटबॉल क्लबसाठी खेळत होती.

Image copyright AIFF
प्रतिमा मथळा महिला फुटबॉलपटू

इंडियन वुमन फुटबॉल लीगबाबत फुटबॉल समीक्षक नोव्ही कपाडिया म्हणाले की, अनेक वर्ष दुर्लक्षित झाल्यानंतर भारतीय फुटबॉल संघाने 2016-17 वर्षी पहिल्यांदा अशी लीग आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

यावर्षी भारताला U19 महिला वर्ल्ड कपचं आयोजन करायचं आहे. त्यामुळे भारताच्या टीमकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

देशात महिला फुटबॉल लोकप्रिय करायचं असेल तर अशा स्वरुपाच्या स्पर्धा सातत्याने आणि नियमितपणे आयोजित कराव्या लागतील असं नोव्ही सांगतात.

परदेशात आर्सेनल, चेल्सी अशा जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबचे महिला संघही आहेत. मात्र भारतातले प्रसिद्ध फुटबॉल क्लब मोहन बागान, ईस्ट बंगाल किंवा आयएसएल क्लबचे महिला संघ नाहीत.

त्यामुळे इंडियन वुमन लीग होणं ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. कारण स्पर्धेच्या निमित्ताने व्यावसायिक स्पर्धेचा, दडपणाच्या वातावरणाचा सराव होतो. त्यातूनच खेळाडू घडत जातो.

Image copyright AIFF
प्रतिमा मथळा वुमन लीग विजेता संघ गोकुलम केरळ

या लीगचे सगळे सामने बेंगळुरुतच का झाले? यामुळे लीगचं आकर्षण कमी झालं का?

यावर नोव्ही कपाडिया म्हणतात, महिलांच्या मॅचचे टेलिव्हिजन अधिकार देण्यात आले नव्हते. तिकीटंही कमी विकली गेली होती. सामने होत आहेत यावरच समाधान मानलं गेलं.

ही लीग पुरुषांच्या लीगप्रमाणे रुजलेली नाही. वुमन फुटबॉल लीगचे हा प्राथमिक टप्पा आहे त्यामुळे हे होणं स्वाभाविक आहे.

कपाडिया यांच्या मते या लीगच्या माध्यमातून प्रतिभावान खेळाडू समोर येत आहेत. भारतीय फुटबॉल संघाने 2018-19 वर्षासाठीची सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून आशालता देवीची निवड केली होती. फ्री-किकसाठी प्रसिद्ध दिल्लीची डालिमा छिब्बर, भारताची गोलकीपर अदिती चौहान, मणिपूरची ओबौंडो देवी या खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून नाव कमावलं. बिहार तसंच ओडिशासारख्या आदिवासी भागातूनही महिला फुटबॉलपटू समोर येत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

लीगच्या माध्यमातून काही स्टार खेळाडूंना चांगले पैसे मिळाले आहेत. मात्र जाणकारांच्या मते देशात अधिकाअधिक महिला खेळाडूंना संधी मिळेल अशा स्पर्धा व्हायला हव्यात. या स्पर्धेत सहभागी झालेल्या बहुतांश खेळाडू शिकत आहेत किंवा छोटी-मोठी कामं करत आहेत.

लीगनंतर मणिपूर पोलीस, रेल्वे तसंच आयकर विभागात या खेळाडूंना नोकरी मिळत आहे. डालिमा छिब्बरला स्कॉलरशिप मिळाली आहे आणि ती कॅनडात व्यावसायिक लीगमध्ये खेळत आहे. या लीगमुळे महिला खेळाडूंमध्ये सकारात्मक भाव निर्माण झाला आहे.

दिल्लीसारख्या व्यग्र शहरात मुलींच्या फुटबॉलकडे लक्ष दिलं जात आहे. नोव्हा कपाडिया सांगतात की हंस आणि हिंदुस्तान क्लबव्यतिरिक्त अन्य क्लब आता फुटबॉलचं प्रशिक्षण देत आहेत. काही स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. लीगच्या निमित्ताने महिला फुटबॉल क्षेत्राने एक पाऊल पुढे टाकलं आहे, ज्याचे सकारात्मक परिणाम भविष्यात पाहायला मिळतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)