'बालपणीच लग्न लावलं, पण मला कधीच पाळी आली नाही आणि मग...'

  • प्राजक्ता धुळप
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
चित्रा पाटील यांच्या जगण्यासाठीचा संघर्ष

फोटो स्रोत, Ekal Mahila Sanghatan

फोटो कॅप्शन,

चित्रा पाटील

एकल महिलांची संख्या वर्षागणिक वाढतेय, असं अधिकृत आकडेवारीतून पुढे आलंय. एकल महिला म्हणजे कुटुंबाच्या आणि समाजाच्या आधाराशिवाय आयुष्य जगण्यासाठी धडपड करणाऱ्या महिला.

मराठवाड्यातल्या चित्रा पाटील प्रचंड मानसिक ताण-तणाव आणि छळानंतर आयुष्यात पुन्हा उभ्या राहिल्या आहेत.

चित्रा पाटील सातवीत शिकत होत्या तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात सगळं ठीक सुरू होतं. एक दिवस अचानक वडिलांनी त्यांचं लग्न ठरवून टाकलं. म्हणजे आज ठरलं आणि उद्या बोहल्यावर चढायचं असं वडिलांनी फर्मानच काढलं. अवघ्या बारा वर्षांच्या चित्राच्या मनावर पहिला आघात झाला. घरात दोन लहान बहिणी, सर्वांत लहान भाऊ होता. मोठी असल्याने या भावंडांची जबाबदारी काहीशी चित्रावरच होती.

आई शेतात राबायची तर वडील शेतात कमी आणि जुगाराच्या अड्ड्यावरच जास्त असायचे. व्यसनाने जखडलेल्या वडिलांना मुलीच्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं होतं. आपल्या मालकीच्या दहा एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन हुंडा म्हणून द्यायला ते तयारही झाले.

पहिला मानसिक आघात

तेव्हा चित्रा वयातही आल्या नव्हत्या. आधी लग्न लावून टाकू आणि एक-दोन वर्षांमध्ये मासिक पाळी आल्यावर लेकीला सासरी धाडू म्हणत वडील लग्नाची घाई करत होते.

होणारा नवरा थोडा-थोडका नाही तर तब्बल दुप्पट वयाचा होता. या बालविवाहाला चित्रा यांच्या आजीचा आणि आत्येचा कडवा विरोध होता.

इतका की आजी भांड-भांड भांडली आणि तिने लग्नाच्या दिवशी चित्रा यांना शेतात लपवून ठेवलं. लग्न सकाळी लागणार होतं, ते त्यांना हुडकून काढल्यावर संध्याकाळी लागलं. चित्रा वयाच्या अकराव्या वर्षीच विवाहबद्ध झाल्या होत्या.

ठरल्याप्रमाणे ती माहेरीच राहणार होती. फक्त सणासुदीला किंवा घरच्या कार्यक्रमांना तिला सासरे घेऊन जायला यायचे आणि घरी परत आणून सोडायचे. अशी दोन वर्षं गेली, मग तीन... पण पाळी काही येईना. नातेवाईकांमध्ये, गावात कुजबूज सुरू झाली. मासिक पाळी सुरू होण्यासाठी खासगी दवाखान्यात जाऊन वर्षभर उपचारही केले. तरीही पाळी आली नाही.

हळुहळू सासरची मंडळी यायची बंद झाली. चित्रांचं शिक्षण मात्र थांबलं नव्हतं. दहावीचं वर्ष सुरू होतं, त्यांना मैत्रिणी विचारत- आम्हाला पाळी आली तुला अजून कशी नाही आली? सततचा ताण, लोकांचे टोमणे, रोखलेल्या नजरा पाहून चित्रा अधिकच अस्वस्थ व्हायच्या. अशातच त्यांना कळलं की नवऱ्याने दुसरं लग्न केलं. त्यांच्यासाठी तो मानसिक धक्काच होता.

फोटो स्रोत, Dissoid

फोटो कॅप्शन,

सातवीत असताना चित्रा यांचा बालविवाह झाला.

चित्रा म्हणतात "तेव्हा मला कळलं की पाळी नसलेल्या स्त्रीला मूल होऊ शकत नाही आणि वंशाचा दिवा नसेल तर समाजात बाईला काहीच किंमत नाही. अशा बाईला आमच्या ग्रामीण भागात 'कणकवर' म्हणतात. पाळी असेल तरच तिचं अस्तित्व आहे. याचाच खूप मोठा धक्का बसला. खरंतर मी स्वतःला विवाहित समजत होते. पण सवाशिणींच्या कार्यक्रमाला मला लोक टाळायला लागले."

त्यांना लोकांचेच नाही तर नातेवाईकांचेही टोमणे चुकत नव्हते. त्यावेळी चित्रा यांच्या मनात आत्महत्येचेही विचार येऊ लागले.

'घरात ओझं असल्याची भावना'

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

गेल्या वीस वर्षामध्ये त्यांना आयुष्याच्या अशा अनेक प्रसंगामध्ये मानसिक ताण आणि नैराश्याला सामोरं जावं लागलंय.

चित्रा सांगतात, "आत्महत्येचे विचार सतत मनात यायचे. माहेरीच राहात होते. जर शिक्षण थांबलं असतं तर माझं अस्तित्व काहीच राहिलं नसतं. आपल्याच नशिबात हे असं का? मी स्वतःला दोष देत राहिले. मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं कारण घरात ओझं म्हणून राहायचं नव्हतं. घरचे टोचून टोचून बोलायचे."

चित्रा यांच्या सगळ्या भावंडांची लग्न झाली तशी त्यांना आपण घरात ओझं झालो आहोत असं वाटू लागलं. धड सासरची नाही आणि धड माहेरची नाही असं जाणवू लागल्याने चित्रा यांनी नोकरी करण्याचं ठरवलं.

2009 पासून गावात आरोग्य मदतनीस असणाऱ्या आशा वर्करचं काम त्यांना मिळालं. पण नैराश्य काही पाठ सोडेना. चित्रा म्हणतात, "आयुष्यात कोरो संस्था आली आणि सुखाचे दिवस दिसू लागले."

कोरो ही सामाजिक संस्था शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. कोरोच्या माध्यमातून 2016 पासून मराठवाड्यात 16 हजार महिलांचं नेटवर्क तयार झालंय. कोरोसारख्या इतर संघटनाही गेल्या पाच वर्षांपासून हजारो महिलांपर्यंत पोहचल्या आहेत.

महाराष्ट्रात आज महाराष्ट्र एकल महिला आधार परिषदेच्या अंतर्गत सोळा संस्था जोडल्या गेल्या आहेत.

"एका महिलेला अतिरक्तदाबाचा त्रास असल्याने रोज गोळ्या घ्याव्या लागायच्या. पण इतर महिलांशी जोडल्यानंतर तिच्या मानसिक स्थितीत सुधारणा होतेय, एकलेपणाची भावना दूर होतेय. अशी उदाहरणं आम्ही गेल्या चार-पाच वर्षांमध्ये अनेकदा पाहिली आहेत," असं कोरोच्या एकल महिला संघटनेचे समन्वयक राम शेळके म्हणतात.

एकल महिलांना मदत मिळण्यासाठी त्यांची ग्रामपंचायतमध्ये नोंद व्हायला पाहिजे, असंही राम शेळके यांना वाटतं.

फोटो स्रोत, Ekal Mahila Sanghatana

फोटो कॅप्शन,

एकल महिला संघटनेमुळे हजारो महिल्या एकत्र आल्या.

चित्रा यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगाच्या टप्प्यावर मात केली. अनेकदा त्यांचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न गावातूनच नाही तर घरातूनही झाला. आज चित्रा आपल्या माहेरी राहत नाहीत. त्याने स्वतःच्या कमाईने एक घर खरेदी केलंय.

आपल्यासारख्याच इतर एकल महिलांसाठी त्या आधार बनल्या आहेत. "ज्या लोकांनी माझा छळ केला त्यांच्यासाठी मी घर का देऊ? माझ्यासारख्या महिलांसाठी मी घर बांधलंय." आणि त्या आवर्जून म्हणतात- "आम्ही एकल आहोत पण एकट्या नाही."

एकल महिलांमध्ये चित्रा यांच्यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या परितक्त्या, विधवा, अविवाहीत, घटस्फोटीत महिलांचा समावेश होतो.

नवरा व्यसनी असणं, फसवून लग्न लावणं, घरात मारहाण होणं अशा अनेक कारणांमुळे स्त्रिया घराच्या बाहेर फेकल्या जातात.

या महिला समाजातल्या वेगवेगळ्या स्तरात एकट्या पडल्याने त्यांचं सुरुवातीला मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होतं, त्यानंतर कुटुंब आणि समाजाकडून मिळणाऱ्या संधी नाकारल्या जातात, त्यानंतर सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अशा महिलांची आर्थिक परवड होण्याची शक्यता जास्त असते. घरातील संपत्तीवरचा कोणताही अधिकार त्यांना मिळत नाही.

एकल महिलांमध्ये चिंता (anxiety) आणि उदासीनता (depression) हे सर्वसाधारपणे आढळणारे आजार आहेत, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार म्हणतात. एकल महिलांच्या मानसिक अवस्थेविषयी मराठवाड्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांची काही निरिक्षणं आहेत.

मानसिक आजारांचं निदान

अनेकदा मानसिक ताण हा Somatic लक्षणं म्हणून समोर येतो. महिला पेशंट डोकेदुखी, अंगदुखी, ओटीपोटात दुखणं अशी Somatic लक्षणं असणाऱ्या तक्रारी घेऊन समोर येतात. पण त्यामागे Somatic आजार नसतो.

मानसिक ताण-तणावाचं एका अर्थाने अशा दुखण्यांमध्ये रूपांतर झालेलं असतं. याचं कारण असं की आपल्याकडे मानसिक आजार हे सामाजिकदृष्ट्या स्वीकारले गेलेले नाहीत. त्यामुळे लोक मला शारीरिक त्रास होतोय असंच सांगतात. त्यामुळे डॉक्टरकडे उपचारासाठी वारंवार जाऊनही आजार बरा होत नाही. पण त्यांच्याशी सविस्तर बोलल्यानंतर आजाराचं निदान होऊ शकतं.

आयुष्यातल्या कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी पुरुषांपेक्षा बाईच्या मन अधिक सक्षम असतं, असं डॉ पोतदार म्हणतात.

"आपल्या समाजात स्त्रियांना दुय्यम आणि भेदभावाची वागणूक दिली जात असल्याने त्यांना आपल्या शिक्षणासाठीच नाही तर प्रत्येक हक्कासाठी झगडावं लागतं. तुलनेने पुरुषांना ते आपसुकच मिळतं. तर ताण-तणाव बाहेर येण्यासाठी रडणं गरजेचं असतं. एका अर्थाने मोकळं व्हायला मदत होते. पण आपल्या समाजात रडण्याची मुभा स्त्रियांना आहे, पुरुषांना नाही. त्यामुळे आयुष्यातल्या कमालीच्या कठीण प्रसंगावर मात करण्याची किंवा प्रतिरोध करण्याची क्षमता पुरुषांमध्ये तयार होत नाही. त्यामुळे टोकाचं पाऊल पुरुष उचलतात. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचं वाढतं प्रमाण आपल्याला समाजात दिसतं."

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN

फोटो कॅप्शन,

वेगवेगळ्या कारणांमुळे एकल.

डॉ. पोतदार यांनी एकल महिलांमधल्या 25 शेतकरी विधवा महिलांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या. या महिला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आहेत. पतीच्या मृत्यूनंतर या महिलांनी खचून न जाता स्वतःला आणि घराला उभं केलंय.

"जोडीदार गमावल्याचं दुःख एकीकडे असतं, त्यातून नैराश्य येऊ शकतं. पण स्त्रिया परिस्थितीशी जुळवून घेण्याची आपापल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी शोधतात," असं डॉ पोतदार यांचं म्हणणं आहे.

पण एकल महिलांच्या एकटेपणाच्या भावनेविषयी ते म्हणतात- कोणीतरी आपली काळजी घेतं ही मुलभूत मानवी गरज आहे. अशावेळी सपोर्ट सिस्टम गरजेची असते. सध्याच्या समाजव्यवस्थेत कुटुंबांकडून अशा एकल महिलांना आधार मिळत नाही.

कोणाशीच बोलता न येणं त्यामुळे या एकल महिलांचा कोंडमारा होतो. आपल्यासारख्या इतरही महिला समाजात आहेत, ही भावना एकल महिलांना सपोर्ट सिस्टम तयार करण्यासीठी प्रोत्साहन देते.

एकल महिलांच्या प्रमाणात महाराष्ट्र दुसरा

भारतीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार एकल महिलांच्या संख्येत 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकल महिलांची संख्या 2001 मध्ये 5 कोटी 12 लाख होती, ती 2011 मध्ये 7 कोटी 14 लाख इतकी झाली होती. 2021 मध्ये ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतायत.

आकडेवारीतील साधारण साडेचार कोटी स्त्रिया म्हणजेच 62 टक्के स्त्रिया ग्रामीण भागात राहतात, तर 38 टक्के शहरात राहतात.

ताज्या आकडेवारीनुसार भारतातील एकल स्त्रियांचं प्रमाण अधिक असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, याकडे औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक रेणुका कड लक्ष वेधू घेतात.

"उत्तर प्रदेशमध्ये 1 कोटी 18 लाख 93 हजारच्या आसपास तर महाराष्ट्रात जवळपास 60 लाख 50 हजार एकल महिला आहेत."

आर्थिक अडचणींच्या ओझ्यामुळे मानसिक ताण वाढतो म्हणूनच त्या एकल महिलांसाठी विशेष सरकारी धोरण असण्याची गरज या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व्यक्त करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)