कोरोना व्हायरसची लागण चिकन खाल्ल्याने खरंच होते का?

कोंबडा Image copyright Getty Images

चिकन खाल्ल्यानं कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने महाराष्ट्रासह भारतातील पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे.

गेल्या तीन आठवड्यात चिकन विक्रीत घट झाल्यानं 1300 कोटी रुपयांचं नुकसान पोल्ट्री उद्योगाला सहन करावं लागल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलीय.

तर महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाला गेल्या 20 दिवसात तब्बल 100 ते 120 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळेंनी अॅग्रोवनला दिली.

केवळ व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर अफवा पसरल्यानं अनेकांनी चिकन खाणं बंद केलंय. मात्र, खरंच चिकन खाल्ल्यानं कोरोना व्हायरसची लागण होते का? बीबीसी मराठीनं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.

Image copyright Getty Images

"कोरोना हा प्राणीजन्य रोग (Zoonotic Disease) आहे. त्यामुळे लोकांना तशी भीती वाटत असावी. मात्र, चिकन आणि कोरोना व्हायरसचा काहीच संबंध नाही," असं महाराष्ट्र आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

चिकन किंवा कुठल्याही प्राण्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरत नसला, तरी काही गोष्टींची खबरदारी घेण्याचंही डॉ. प्रदीप आवटे सुचवतात.

'खबरदारी म्हणून मांस कच्चं न खाता, पूर्णपणे शिजवून खा'

"आपण फक्त एक काळजी घ्यायची की, कुठलंही मांस कच्च खाऊ नये. मांस पूर्णपणे शिजलेलं असावं. एवढी काळजी घ्यावी, बाकी चिकन, मटन, अंडी अशा कुठल्याही माध्यमातून कोरोना व्हायरस पसरत नाही. शाकाहारामध्येही फळे, पालेभाजी स्वच्छ धुवून घ्याव्यात," असं डॉ. प्रदीप आवटे सांगतात.

याचसंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशीही बातचीत केली. त्यांनीही कोरोनाशी संबंधित पसरलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे काही उपाय सुचवले.

कोरोनाच्या भीतीनं मांसाहार टाळण्याची काहीही आवश्यकता नसल्याचं सांगत डॉ. भोंडवे खबरदारी घेण्याचीही सूचना करतात.

कुठल्याही प्रकारचं मांस शिजवून खाण्याचा सल्ला ते देतात. कच्च्या मांसातून संसर्ग होतो, असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"अनेकदा हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पूर्णपणे शिजवलेलं अन्न नसतं आणि खाताना ते आपल्या लक्षातही येत नाही. त्यामुळं बाहेरचा मांसाहार टाळावा आणि घरी मांस आणलंत तर पूर्णपणे शिजवलेलं खावं," असं डॉ. भोंडवे सांगतात.

Image copyright Getty Images

55 डिग्री सेल्सिअसच्या वर अन्न शिजवल्यास, त्यात कुठलाही विषाणू शिल्लक राहत नसल्याचंही डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

डॉ. प्रदीप आवटे आणि डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितल्याप्रमाणे चिकनमधून कोरोना व्हायरसा प्रसार होत नाही, त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नसल्याचं स्पष्ट आहे.

पण या अफवांवर विश्वास ठेवल्यानं महाराष्ट्रातल्या पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसलाय.

चिकनमधून कोरोना व्हायरस पसरत असल्याच्या अफवा महाराष्ट्रातल्याही अनेक भागात व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरतायत.

'महाराष्ट्रात पोल्ट्री उद्योगाला 20 दिवसात 100-120 कोटींचं नुकसान'

महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी अॅग्रोवन या शेतीविषयक वृत्तपत्राला यासंदर्भात माहिती दिली.

डॉ. परकाळे म्हणतात, "महाराष्ट्रात ब्रॉयलर चिकनची मागणी दिवसाला 2,800 टन एवढी आहे. मात्र, कोरोना व्हायरससंबंधी सोशल मीडियावरून अफवा पसरल्यानं गेल्या 20 दिवसात चिकनच्या मागणीत 600 टनांनी घट झाली. यामुळं सुमारे 100 ते 120 कोटींचं नुकसान झालं."

Image copyright Getty Images

मात्र, केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारनं केलेल्या जनजागृतीमुळं बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचंही डॉ. परकाळेंनी सांगितलं.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सोयाबीन आणि मक्याच्या किंमतीतही गेल्या तीन आठवड्यांपासून 8 टक्क्यांनी घट झालीय. कारण हे पदार्थ प्राण्यांच्या आहारासाठी वापरले जातात आणि पोल्ट्री उद्योजकांनी या खाद्यपदार्थांची खरेदी कमी केली आहे.

अफवांमुळं पोल्ट्री आणि त्याला पूरक असणाऱ्या उद्योगांना फटका बसत असल्याचं लक्षात येताच, महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं परिपत्रक काढून अफवांचं खंडन केलंय.

"कुक्कूट पक्षी किंवा कुक्कूट उत्पादनं यांचा कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही. कुक्कूट मांस आणि कुक्कूट उत्पादनं मानवी आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी अशाप्रकारे अफवांकडे दुर्लक्ष करावं," असं महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागानं म्हटलंय.

तसंच, "कोरोना व्हायरस सांसर्गिक असून, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमित होतो. कुक्कूट पक्षातील कोरोना व्हायरस मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत," असंही या पत्रकात म्हटलंय.

Image copyright Maharashtra Animal Husbandry
प्रतिमा मथळा महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाचं पत्रक

याच पत्रकात पशुसंवर्धन विभागानं अफवांमुळं पोल्ट्री उद्योगासह सोयाबीन आणि मका या उत्पादनांना फटका बसल्याचं नमूद केलंय.

एकूणच कोरोना व्हायरसबाबत महाराष्ट्रासह भारतात पसरणाऱ्या अफवांचा संदर्भ चिकन किंवा इतर पक्षी-प्राण्यांशी जोडला जातोय. त्यामुळं बीबीसी मराठीनं प्राणी आणि कोरोना व्हायरस यांच्यातील संबंधाचाही आढावा घेतला.

'कोरोना' आणि प्राण्यांचा काय संबंध?

डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, "चीनमधील वुहान शहरातल्या मटण मार्केटमध्ये गेलेल्या लोकांना सर्वप्रथम कोरोना व्हायरसची लागण झाल्याने भारतातील लोकांनाही तशी भीती वाटत असावी. मात्र, हे तर्क पूर्णपणे निराधार आहेत."

पण कोरोना आणि प्राणी यांचा संबंध डॉ. आवटे उलगडून सांगतात. ते म्हणतात, "कोरोना व्हायरसचं मूळ वटवाघूळ आहे. यापूर्वी कोरोनाचा दोनदा उद्रेक झाला होता. 2004 साली ज्यावेळी पहिल्यांदा SARS कोरोनाचा उद्गेक झाला, तो मांजरातून माणसात आला होता. त्यानंतर 2012 साली MERS कोरोनाचा उद्रेक झाला, तो उंटापासून माणसात आला होता."

"आताचा कोरोना व्हायरस प्राण्यांमधून आल्याचं माहिती आहे, पण नक्की कोणत्या प्राण्यातून? याची अद्याप स्पष्टता झाली नाहीय. त्यामुळं भीतीचं तेही एक कारण आहे," असं डॉ. आवटे सांगतात.

Image copyright Getty Images

Kyasanur forest disease (KFD) हा आजार प्राण्यांमधून भारतात पसरल्याचंही डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात. मात्र, हा एक आजार वगळल्यास प्राण्यांमधून माणसांमध्ये श्वसनाचे आजार पसरण्याची भारतात तरी काही नोंद नसल्याचं डॉ. भोंडवे सांगतात.

नवीन आजारांमध्ये 70 टक्के आजार प्राण्यांमधून येतात आणि हे प्रमाण वाढलं असल्याचं डॉ. आवटे सांगतात. पण त्याचवेळी ते पुढे सांगतात, "हे आजार प्राण्यांमधून येत असले, तरी नंतर त्यांचा प्रसार माणसांमधूनच होतो."

याबाबत डॉ. आवटे स्वाईन फ्लूचं उदाहरण देतात. ते म्हणतात, "स्वाईन फ्लूचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. स्वाईन म्हणजे डुक्कर. मेक्सिकोत स्वाईन फ्लू आजार डुकरातून माणसात आला, पण नंतर डुकराचा काहीही संबंध राहिला नाही. तो माणसांतून माणसाकडे पसरत गेला."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण, सहा जणांचा मृत्यू

'अवकाळीतून जीवापाड वाचवलेली बाग आता स्वतःच्या हाताने तोडतोय'

कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

कोरोना व्हायरसचा धारावीतील संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपायोजना सुरू आहेत?

कोरोना संबंधी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यास तुरुंगात जावं लागणार?

मुंबई लॉकडाऊनमुळे भिकारी आणि बेघरांच्या रोजच्या जगण्याचं काय होणार?

'जिवंत राहायचंय बस, पुढचं पुढे पाहता येईल,' लॉकडाऊनमध्ये भरडलेल्या सेक्स वर्कर्सची कहाणी

चीनमधल्या या शहरात आता कुत्रा आणि मांजर खाण्यावर बंदी

कोरोनाशी मुकाबला करणारे व्हेंटिलेटर्स नेमके काय असतात, ते इतके महत्त्वाचे का आहेत?