डोनाल्ड ट्रंप: पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशी राष्ट्रप्रमुखांना गुजरातला का घेऊन जातात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरात

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 24-25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर आहेत. ट्रंप यांची ही पहिलीच भारतभेट आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात ट्रंप दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांमध्ये असणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गुजरातमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. ह्यूस्टन इथे झालेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाच्या धर्तीवर अहमदाबादमध्ये 'नमस्ते ट्रंप' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

ट्रंप यांच्या तयारीची विरोधी पक्षांपासून सोशल मीडियापर्यंत चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशी राष्ट्राध्यक्षांना गुजरातला का घेऊन जातात?

16 मे 2014 रोजी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून शंभरहून अधिक राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला आहे. यामध्ये एकाच देशाच्या विविध राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे.

प्रत्येक विदेशी नेत्याला मोदी गुजरात किंवा वाराणसीला घेऊन जात नाहीत. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षि जिनपिंग, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू अशा मोठ्या देशप्रमुखांना मोदींनी गुजरातची सैर घडवली आहे.

मोदींनी आतापर्यंत कोणकोणत्या विदेशी देशप्रमुखांना गुजरातला नेलं आहे.

1. क्षि जिनपिंग-चीनचे राष्ट्राध्यक्ष (17 ते 19 सप्टेंबर 2014)

विदेशी राष्ट्राध्यक्षांना गुजरात भेट घडवण्याची परंपरा क्षि जिनपिंग यांच्या दौऱ्यापासून सुरू झाली. 17 सप्टेंबरला क्षि जिनपिंग आपल्या पत्नीसह पेंग लियुआन यांच्यासह अहमदाबादला पोहोचले. मोदी, जिनपिंग यांना घेऊन साबरमती आश्रमात पोहोचले. जिनपिंग यांनी चरखा चालवून सुतकताईही केली.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, भारत-चीन यांच्यात काही करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानंतर साबरमतीच्या तीरावर जिनपिंग यांच्या स्वागताकरता पारंपरिक नृत्य सादर करण्यात आलं. मोदींनी जिनपिंग यांना झोपाळ्यावर बसवलं.

त्यानंतर जिनपिंग दिल्लीला परतले. दिल्लीत आणखी काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

2. डोनाल्ड रबींद्रनाथ रामोतार- गयानाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष (7 ते 12 जानेवारी 2015)

8 आणि 9 जानेवारीला गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गयानाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड रवींद्रनाथ रामोतार मुख्य पाहुणे होते.

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

गांधीनगर मध्ये नरेंद्र मोदी यांच्याबरोबर डोनाल्ड रवींद्रनाथ

गयानात भारतीय वंशाच्या नागरिकांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यांचं नावही भारतीय वाटावं असंच आहे. म्हणूनच रवींद्रनाथ यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं.

3. शेरिंग तोबगे- भूतानचे तत्कालीन पंतप्रधान (10 ते 18 जानेवारी 2015)

शेरिंग तोबगे यांचा दौरा अहमदाबादमध्ये आयोजित 'व्हायब्रंट गुजरात समिट'ने सुरू झाला. समिटचं उद्घाटन तोबगे यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी भाषणही केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि तोबिग यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली.

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

शेरिंग तोबगे तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबर

साबरमती आश्रमाला भेट देऊन तोबगे दिल्लीला आले. तिथून ते मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला रवाना झाले. तिथून ते बिहारमधील बोधगयासाठी रवाना झाले.

4. फिलिप जेसिंटो न्यूसी- मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष (4 ते 8 ऑगस्ट 2015)

फिलिप जिसिंटो यांचं भारताशी जुनं नातं आहे. अहमदाबादस्थित भारतीय प्रबंध संस्थान अर्थात IIM मधून त्यांनी मॅनेजमेंटची डिग्री घेतली. दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या काही मित्रांची भेट घेतली.

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

आनंद अॅग्रीकल्चरल युनिर्व्हिसिटीत फिलिप जेसिंटो

आनंद अॅग्रिकल्चरल युनिर्व्हिसिटी, दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम युनिव्हर्सिटी आणि साबरमती आश्रम अशा ठिकाणांना त्यांनी भेट दिली.

5. शिंजो आबे- जपानचे पंतप्रधान (11 ते 13 डिसेंबर 2015)

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी अनेकदा जपानला गेले आहेत. शिंजो आणि मोदी यांचे ऋणानुबंध जुने आहेत. त्यामुळे यावेळी आदरातिथ्य करण्याची जबाबदारी मोदी यांची होती.

आबे यांनी दौऱ्याच्या सुरुवातीला तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदी आबेंना वाराणसीला घेऊन गेले. दशाश्वमेध घाटावर दोघे पारंपरिक गंगा आरतीमध्ये सहभागी झाले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जपानचे पंतप्रधान शिंझो आबे पत्नीसह भारत दौऱ्यावर आले होते.

आबे यांच्या दौऱ्यात भारत-जपान बुलेट ट्रेन, अणूऊर्जा, पायाभूत सुरक्षाव्यवस्था, तंत्रज्ञान, शिक्षण आणि अर्थव्यवस्था या विविध क्षेत्रातील करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

6. केपी शर्मा ओली-नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान आणि सध्याचे पंतप्रधान (19 ते 24 फेब्रुवारी 2016)

भारत-नेपाळ संबंध ताणलेले असताना केपी शर्मा ओली भारत दौऱ्यावर आले होते. दिल्लीहून ओली यांनी उत्तराखंड इथल्या पॉवर प्रोजेक्टला भेट दिली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली

तिथून ओली गुजरातमधल्या भुज इथे गेले. 2011 भूकंपानंतर भूज नव्याने वसवण्यात आलं होतं. गुजरात दौऱ्यादरम्यान मोदी ओली यांच्याबरोबर नव्हते.

7. अॅंटोनियो कोस्टा-पोर्तुगालचे पंतप्रधान (7 ते 13 जानेवारी 2017)

आठव्या व्हायब्रंट गुजरात समिटसाठी नरेंद्र मोदी यांनी कोस्टा यांना आमंत्रित केलं होतं. या आमंत्रणाला मान देत कोस्टा व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात सहभागी झाले.

या दौऱ्यादरम्यान कोस्टा 14व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे मुख्य पाहुणे होते. हा कार्यक्रम बेंगळुरु इथं झाला होता. कोस्टा यांच्याबरोबरीने मोदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पोर्तुगालचे एंटोनियो कोस्टा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

गुजरात आणि बेंगळुरुला भेट दिल्यानंतर कोस्टा गोव्याला रवाना झाले. कोस्टा यांचे वडील प्रदीर्घ काळ गोव्यातच होते. ते आपल्या वडिलांच्या घरीही गेले होते.

8. अलेक्झांडर वुकिक- सर्बियाचे तत्कालीन पंतप्रधान आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष (9 ते 12 जानेवारी)

आठव्या व्हायब्रंट गुजरात समिटसाठी मोदींनी अलेक्झांडर वुकिक यांनाही निमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात मोदी आणि वुकिक यांच्या बैठकीची सुरुवात नमस्ते ने झाली होती.

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

अलेक्झांडर वुकिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

समिटनंतर वुकिक मुंबईला रवाना झाले. मुंबईत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि काही उद्योगपतींशी चर्चा केली.

9.विद्या देवी भंडारी-नेपाळचे राष्ट्राध्यक्ष (17 ते 21 एप्रिल 2017)

विद्या देवी यांच्या पाच दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात दिल्लीहून झाली. दिल्लीत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली.

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

राजघाटावर विद्यादेवी भंडारी

यानंतर भंडारी यांनी गुजरातमधल्या राजकोट, सोमनाथ आणि द्वारका या ठिकाणांना भेट दिली. भंडारी यांनी सोमनाथ आणि द्वारकाधीश मंदिरात पुजाअर्चाही केली. मात्र भंडारी यांच्या दौऱ्यावेळी मोदी उपस्थित नव्हते.

10. शिंजो आबे-जपानचे पंतप्रधान (13, 14 सप्टेंबर 2017)

वाराणसीनंतर गुजरातचा दौरा करण्याची आबे यांची ही दुसरी वेळ होती. या दौऱ्यात दिल्लीऐवजी ते थेट अहमदाबादला पोहोचले. विमातनळावर मोदी यांनीच आबे यांचं स्वागत केलं.

विमानतळापासून ते साबरमती आश्रमापर्यंत या दोघांनी रोड शो केला. विदेशी नेत्याबरोबरचा मोदी यांचा हा पहिलाच रोड शो होता.

या दौऱ्यात आबे यांनी साबरमती आश्रम, सिद्दी सैय्यद की जाली, दांडी कुटीर या ठिकाणांना भेट दिली. मोदी-आबे जोडीने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रोजेक्टचं भूमीपूजन केलं.

11. बिन्यामिन नेतान्याहू- इस्रालचे पंतप्रधान (14 ते 19 जानेवारी)

आग्र्याला जाऊन ताजमहालला भेट दिल्यानंतर नेतान्याहू अहमदाबादला पोहोचले. नरेंद्र मोदींनी नेतान्याहू यांना घेऊन 14 किलोमीटरचा रोड शो केला होता.

त्यानंतर मोदी नेतान्याहू यांना घेऊन साबरमती आश्रमात घेऊन गेले. नेतान्याहू यांनी आपल्या पत्नीसह चरखाही चालवला होता. याप्रसंगी मोदी आणि नेतान्याहू यांनी पतंगही उडवला.

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

बिन्यामिन नेतान्याहू

अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर नेतान्याहू वरदादस्थित आय क्रिएट सेंटरला गेले. भारत-इस्राइल यांच्यादरम्यान संरक्षण, कृषी, अंतराळविज्ञान यांच्यासह 9 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

12. जस्टीन ट्रुडो-कॅनडाचे पंतप्रधान (17 ते 24 फेब्रुवारी)

ट्रुडो या दौऱ्यात दिल्ली, आग्रा, अहमदाबाद, मुंबई आणि अमृसतर याठिकाणी गेले. ट्रुडो यांचं या दौऱ्यात थंड स्वागत झाल्याचा आरोप कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी केला होता.

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

कॅनडाचे जस्टीन ट्रुडे

ट्रुडो आपल्या कुटुंबीयांसह गुजरातला पोहोचले. त्यांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली. त्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली आणि चरखाही चालवला.

पंतप्रधान मोदी ट्रुडो यांच्या बरोबर गुजरातला का गेले नाहीत याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.

13. इमॅन्युअल मॅक्रॉन-फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (9 ते 12 मार्च 2018)

मॅक्रॉन यांनी या दौऱ्यात आग्रा, वाराणसी, मिर्जापूर अशा अनेक शहरांना भेट दिली. वाराणसी दौऱ्यावेळी मॅक्रॉन यांच्या बरोबरीने मोदी उपस्थित होते.

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

इमॅन्युअल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाराणसीत मॅक्रॉन यांचं शंखनादाने स्वागत करण्यात आलं. त्यांनी मोदींसह तलावात नौकानयन केलं. मोदी त्यांना घेऊन दीन दयाल उपाध्याय हस्तकला संकुलातही घेऊन गेले. याप्रसंगी मॅक्रॉन यांनी भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

14. डॉ. फ्रँक वाल्टर स्टाइनमायर-जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (22 ते 25 मार्च 2018)

जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष वाल्टर यांना मोदी वाराणसीत घेऊन गेले. बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित कार्यक्रमात वाल्टर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

डॉ. फ्रँक वाल्टर स्टाइनमायर

वाल्टर अस्सी घाट इथे पोहोचले. तिथे त्यांनी तलावात नौकेतून सैर केली. त्यानंतर ते पंतप्रधान मोदींच्या बरोबरीने दशाश्वमेध घाटावरच्या गंगा आरती कार्यक्रमात सहभागी झाले. अन्य कार्यक्रमांसाठी ते दिल्लीला परतले.

15. डॅनी एंटोइन रोलेन-सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष (22 ते 27 जून 2018)

डॅनी यांच्या दौऱ्याची सुरुवात गुजरात भेटीने झाली मात्र त्यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. गुजरातमध्ये एक दिवस व्यतीत केल्यानंतर डॅनी दिल्लीला आले.

फोटो स्रोत, भारतीय विदेश मंत्रालय

फोटो कॅप्शन,

साबरमती आश्रमात पत्नीसह चरखा चालवताना डॅनी

गुजरात वास्तव्यादरम्यान डॅनी यांनी अहमदाबादमधल्या गांधी आश्रमाला भेट दिली. त्यांनी पत्नीसह चरखा चालवला. त्यानंतर त्यांनी IIM कॅम्पसला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी संस्थेचे संचालक आणि जुने मित्र इरोल डिसुझा यांच्याशी बातचीत केली. त्यानंतर त्यांनी गोवा आणि उत्तराखंडला भेट दिली.

16. प्रविंद कुमार जगन्नाथ- मॉरिशसचे पंतप्रधान (20 ते 28 जानेवारी 2019)

15व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रविंद कुमार दशाश्वमेध घाटावर

मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी इथेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाराणसीत प्रविंद यांनी पत्नीसह काशी विश्वनाथाच्या मंदिरात पूजा केली. त्यानंतर ते दशाश्वमेध घाटावरच्या गंगा आरती कार्यक्रमात सहभागी झाले.

प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमात प्रविंद भोजपुरी भाषेतही बोलले.

17. महिंदा राजपक्षे- श्रीलंकेचे पंतप्रधान (7 ते 11 फेब्रुवारी 2020)

राजपक्षे यांच्या दौऱ्याची सुरुवात दिल्लीहूनच झाली होती. 9 फेब्रुवारीला वाराणसीतल्या काशी विश्वनाथाच्या मंदिरात त्यांनी पुजा केली. त्यानंतर त्यांनी कालभैरवाच्या मंदिरालाही भेट दिली.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन,

बोधगया इथे राजपक्षे

यावेळी राजपक्षे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नमामि गंगे प्रोजेक्टचं कौतुक केलं. वाराणसीहून ते बिहारमधल्या बोधगयेसाठी रवाना झाले. वाराणसीत राजपक्षे यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी नव्हते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)