प्रशांत किशोर : 'गांधीवादी नेते गोडसे समर्थकांसोबत कसे?'

प्रशांत किशोर, नीतीश कुमार, बिहार

फोटो स्रोत, SANJAY DAS

फोटो कॅप्शन,

प्रशांत किशोर

जनता दल युनायटेडमधून (JDU) काढून टाकण्यात आलेले प्रशांत किशोर यांनी जेडीयू अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, "विकासाच्या निकषांवर बिहार 2005 साली जिथे होता तिथेच आजही आहे. 15 वर्षांत विकास झाला. मात्र तो कसा. तर रस्ते बनले. मात्र, त्या रस्त्यांवर गाड्या घेऊन जाण्यासाठी गाड्या खरेदी करण्याची आर्थिक ताकद लोकांमध्ये अजून आलेली नाही. वीज आहे. मात्र, विजेची विक्री वाढलेली नाही. प्रती व्यक्ती उत्पन्नाबाबतीत बिहार आजही सर्वात गरीब राज्य आहे.

ते म्हणाले, "गेल्या 15 वर्षांत बिहारमध्ये विकास झाला नाही, असं मी म्हणणार नाही. मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत तेवढा वेगवान नाही. बिहार 2005 साली सर्वात गरीब राज्यांपैकी होतं आणि आजही आहे. विकासाच्या क्रमवारीतही बिहार आजही सर्वात तळाशी आहे."

प्रशांत किशोर पुढे म्हणतात, "नितीशजी कायम लालूजींच्या राज्याशी तुलना करत सांगतात की वीज नव्हती. ती आली. पाटणा संध्याकाळी 6 वाजता बंद व्हायचं. आज रात्री 10 वाजता बंद होतं. मात्र, लालूजींच्या राज्याशी किती दिवस तुलना करणार."

बिहार मागास राज्य असण्यासाठीही त्यांनी नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल चढवला. त्यांनी बिहारच्या विकासाच्या मुद्द्यावरुन नितीश कुमार यांना खुल्या चर्चेचं जाहीर आव्हान दिलं आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

नीतीश कुमार

राजकीय रणनीतीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी मंगळवारी पाटण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की ते बिहारमध्ये निवडणूक लढण्यासाठी किंवा लढवण्यासाठी आलेले नाहीत. इतकंच नाही तर कुठल्या पक्षाची घोषणा करण्यासाठी किंवा राजकीय आघाडी तयार करण्यासाठीदेखील आलेले नाहीत.

नितीश कुमार यांना लक्ष्य करत ते म्हणाले की बिहारला कणखर नेत्याची गरज आहे. कुणाच्या मागे लागणाऱ्या नेत्याची नाही.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

असं असलं तरी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना नितीश कुमार आपल्याला पितृतुल्य असल्याचं ते म्हणाले.

प्रशांत किशोर म्हणाले, "नितीश यांच्याशी माझे चांगले संबंध होते. माझ्या मनात त्यांच्याप्रती फार आदर आहे."

मात्र, नितीश कुमार यांच्याशी आपले वैचारिक मतभेद असल्याचंही ते म्हणाले.

"जे गांधी विचारांचं समर्थन करतात ते गोडसेंच्या समर्थकांसोबत जाऊ शकत नाही."

बिहारमध्ये येण्याचा आपला अजेंडा सांगताना प्रशांत किशोर म्हणाले, "येणाऱ्या दहा वर्षांत बिहारला देशाच्या आघाडीवरच्या राज्यांमध्ये कसं आणता येईल, यावर विश्वास ठेवणारी मुलं मला घडवायची आहेत. या विचारधारेशी सहमत असणाऱ्या आणि आपल्या आयुष्यातली दोन-चार वर्षं या उद्देशासाठी देऊ इच्छिणाऱ्या तरुणांना एकत्र करायला आलेलो आहे. बिहारमध्ये खालच्या पातळीवरच्या लोकांमध्ये राजकीय भान जागृत करणं, हे माझं उद्दीष्ट आहे."

प्रशांत किशोर यांना पक्षातून बेदखल करताना नितीश कुमार म्हणाले होते की त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोर यांना पक्षात ठेवलं होतं.

गांधीवादी विचारांचा परिणाम

याविषयावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर किशोर म्हणाले, "त्यांना खोटेपणाचा आधार घ्यावा लागतोय. मात्र, मी तर म्हणतो जे नितीश कुमार म्हणाले, त्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. अमित शहांच्या म्हणण्यावरुनच मला पक्षात ठेवण्यात आलं, असं समजा."

ते पुढे म्हणाले, "कुणी तुम्हाला म्हटलं की तो बिहारला क्रमांक एकचं राज्य बनवेल तर तो खोटं बोलतोय. हे शक्यच नाही. कारण तुम्ही विकास करत असाल तर इतर राज्यही विकास करत असतात. जो बिहारचा नेता बनू इच्छितो त्याने बिहारच्या जनतेला सांगितलं पाहिजे की तो येत्या 10 वर्षांत बिहारला इतर राज्यांच्या तुलनेत कुठे उभं करणार आहे."

सीएए आणि एनसीआरविषयी विचारलेल्या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, "बिहारमध्ये सीएए, एनपीआर आणि एनसीआर लागू होणार नाही. नितीश कुमार यांनीही तसं स्पष्ट केलं आहे. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे."

ते म्हणाले, "सीएएवर न्यायालयाचा निकाल येऊ द्या. ज्या दिवशी एकाही व्यक्तीला या कायद्यातील कलमाअंतर्गत बिहारमध्ये नागरिकता दिली जाईल त्या दिवशी बिहारमध्ये सीएए लागू झाल्याचं मी मानेन. सीएए, एनपीआर, एनआरसी आता आहे त्या स्वरुपात मान्य नाही. एक राजकीय कार्यकर्ता या नात्याने मी त्याचा विरोध करेन."

त्यांच्या विचारधारेविषयी विचारलेल्या प्रश्नावर आपण गांधी विचारांचे समर्थक असल्याचं प्रशांत किशोर सांगतात. ते म्हणाले. "मी गांधी विचारांनी प्रेरित समतावादी मानवतावाद मानतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)