राकेश मारियाः ...तर कसाब ‘समीर दिनेश चौधरी’ म्हणून मेला असता

राकेश मारिया

फोटो स्रोत, AFP

26/11 ला मुंबईवर झालेला हल्ला हा हिंदुत्त्ववादी संघटनांनी घडवून आणलेला हल्ला म्हणून दाखवण्याचा लष्कर - ए - तोयबाचा प्रयत्न होता, पण तो फसला असं मुंबईचे माजी पोलिस कमिशनर राकेश मारिया यांनी म्हटलंय. 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकाद्वारे मारिया यांनी आपल्या कारकीर्दीतल्या आठवणी मांडलेल्या आहेत.

कसाबविषयी ते काय सांगतात?

2008 साली मुंबईवर हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांपैकी एक अजमल कसाब जिवंत पकडला गेला. पण तो पाकिस्तानी नसून भारतीय आणि हिंदू असल्याचं भासवण्याचा प्रयत्न लष्कर-ए-तोयबाने केला होता, असं राकेश मारियांनी लिहिलं आहे. मनगटावर लाल धागा बांधलेला, बंगळुरुचा रहिवासी असणारा 'समीर दिनेश चौधरी' अशी ओळख कसाबसाठी निर्माण करण्यात आली होती.

मारिया लिहितात, "सगळं काही त्यांच्या योजनेनुसार पार पडलं असतं तर मरताना त्याच्या (कसाब) मनगटाला एखाद्या हिंदू व्यक्तीप्रमाणे लाल दोरा गुंडाळलेला असता. आम्हाला त्याच्याकडे सापडलेल्या आयकार्डवर नाव असतं - समीर दिनेश चौधरी.

बंगळुरुच्या अरुणोदय पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलेजचा विद्यार्थी. निवासाचा पत्ता - 254, टीचर्स कॉलनी, नगाराभावी, बंगळुरु आणि नंतर मग हिंदुत्त्ववादी संघटनांनी मुंबईवर हल्ला केल्याची ओरड वर्तमानपत्रांमधून झाली असती.या माणसाचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी टीव्ही पत्रकारांच्या रांगा लागल्या असत्या. पण तसं घडलं नाही. आणि तो पाकिस्तानमधल्या फरिदकोटचा अजमल आमीर कसाब असल्याचं उघडकीला आलं."

तुकाराम ओंबळेंमुळे कसाब जिवंत पकडला गेला आणि पुढे चौकशीदरम्यान त्याची खरी ओळख समोर आली. त्यामुळेच कसाबला तुरुंगामध्ये जिवंत ठेवणं, हे आपलं प्राथमिक उद्दिष्ट होतं असंही मारियांनी म्हटलंय. पाकिस्तानची आयएसआय (ISI) आणि लष्कर-ए-तोयबा कसाबचा काटा काढण्याच्या प्रयत्नांत होते, कसाबला मारण्याची जबाबदारी दाऊद इब्राहिमच्या गँगकडे देण्यात आली होती असं मारियांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय. शिवाय मुंबई पोलिसांच्या मनातही कसाबविषयी राग होता.

फोटो स्रोत, Westland Publications

अजमल कसाब 81 दिवस क्राईम ब्रँचच्या ताब्यात होता. यादरम्यान आपण स्वतः कसाबचा जवळपास रोज जबाब घेत असल्याचंही मारियांनी म्हटलंय. सुरुवातीला कसाबची चौकशी 'डिटेन्शन रुममध्ये' होत असे. पण पुरेशी खबरदारी घेऊनही चौकशी दरम्यान खुर्चीवर बसलेल्या कसाबचा फोटो बाहेर मीडियापर्यंत आला. यानंतर कसाबची चौकशी त्याला जिथे डांबून ठेवलं होतं, त्या खोलीतच करण्यात येऊ लागली.

फक्त मोजक्याच लोकांना कसाबचा जबाब घेता येत असे आणि अगदी राकेश मारियांसकट कोणालाही या खोलीमध्ये मोबाईल फोन किंवा इतर कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट न्यायची परवानगी नव्हती.

मारिया लिहितात, "रोज कसाबशी बोलल्याने त्याच्यात आणि माझ्यात एक विश्वास निर्माण झाला आणि लवकरच तो मला आदराने 'जनाब' (सर) म्हणू लागला. त्याच्या दृष्टीने मी त्याच्यावर पहारा देणाऱ्यांचा सर्वोच्च नेता होतो. आणि कमांडरने दिलेले आदेश पाळायचे या मानसिकतेने त्याला घडवण्यात आलं होतं. त्याच्यादृष्टीने मी देखील असाच होतो."

"भारत हा पाकिस्तानचा एकमेव शत्रू आहे असं कसाबला लहानपणापासून सांगितलं गेल्याचं माझ्या लक्षात आलं. त्याला भारताची किंवा इतर जगाची माहिती नव्हती. "

"चोऱ्यामाऱ्या करण्यासाठी कसाब लष्कर-ए-तोयबात सामील झाला होता. त्याचा जिहादशी काहीही संबंध नव्हता. पण नंतर त्याच्या मनात काही गोष्टी भरवण्यात आल्या. भारतामध्ये मुस्लिमांना नमाज पढता येत नाही, असा समज त्याच्या मनात भरवण्यात आला होता. तुरुंगात असताना दिवसातून पाच वेळा त्याच्या कानावर पडणारी अजान ही आपल्याला होणारे भास असल्याचं त्याला वाटत होतं. आम्हाला हे समजल्यावर मी महालेंना (तपास अधिकारी रमेश महाले) त्याला गाडीतून मेट्रो सिनेमाजवळच्या मशिदीत न्यायला सांगितलं." मशीदीत नमाज पठण होताना पाहून कसाब चकित झाल्याचं मारिया सांगतात.

दहशतवादी प्रशिक्षणाच्या 3 टप्प्यांनंतर कसाबला एक आठवडा सुटी देण्यात आली. आणि 1,25,000 रुपयेही देण्यात आले. बहिणीच्या लग्नासाठी त्याने हे पैसे कुटुंबाला दिले.

त्यानंतरचा कसाबचा भारतापर्यंतचा प्रवास, हल्ल्या दरम्यानच्या घटना, कसाबला जिवंत पकडण्यात आलेलं यश आणि नंतरच्या घटनांचं वर्णन राकेश मारियांच्या या पुस्तकात आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा वाद

26/11 च्या हल्ल्यामध्ये हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर हे तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी शहीद झाले.

मुंबईतल्या कामा हॉस्पिटलजवळच्या रंगभवनाच्या गल्लीमध्ये एकाच वाहनातून गेलेल्या या तीन अधिकाऱ्यांचा अतिरेक्यांच्या गोळ्यांनी वेध घेतला. यावरून नंतर अनेक चर्चा झाल्या आणि राकेश मारियांवर टीकेची झोड उठली.

मारियांनी आपल्या पुस्तकात याचाही उल्लेख केला आहे. अशी टीका होण्यापेक्षा या हल्ल्यामध्ये आपण मेलो असतो, तर बरं झालं असतं असं वाटल्याचंही मारिया म्हणतात. ते लिहितात, "26/11मुळे मला माझी काहीही चूक नसताना प्रचंड यातना झाल्या. हल्ल्यानंतर लगेचच याला सुरुवात झाली. माझ्या तीन जवळच्या सहकाऱ्यांना रंग भवनाच्या गल्लीमध्ये वेळीच पाळबळ पुरवण्यात मला अपयश आलं आणि मी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलो आणि नंतर मी या सगळ्याविषयी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप माझ्यावर करण्यात आले. असं वाटायचं की त्या रात्री हसन गफूर यांनी मला कंट्रोल रूममध्ये ठेवण्याऐवजी ताज किंवा ओबेरॉयमध्ये घुसण्याचे आदेश द्यायला हवे होते. हे आरोप पुन्हा पुन्हा डोकं वर काढत. ते ही मी आयुष्यात करियरच्या एक महत्त्वाच्या टप्प्यावर असताना.अशावेळी मला मिर्झा गालिबच्या ओळी आठवत - मुझे क्या बुरा था मरना, अगर एक बार होता! (मला मृत्यू का बरं वाईट वाटेल, जर तो फक्त एकदाच येणार असेल!) हे पुन्हा पुन्हा मरण्यासारखं होतं किंवा मग रोज मरण भोगण्यासारखं होतं."

राजकीय प्रतिक्रिया

मारियांच्या पुस्तकातले हे तपशील बाहेर आल्यानंतर त्याविषयी प्रतिक्रिया उमटल्या. 'हिंदू दहशतवादाचं' भांडवल करण्यासाठी काँग्रेस कारस्थान रचत असल्याचा आरोप पियुष गोयल यांनी केलाय.

ते म्हणाले, "मारिया हे आता का बोलत आहेत? पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी हे तेव्हाच बोलायला हवं होतं आणि त्याविषयीची पावलंही उचलायला हवी होती. खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आम्ही काँग्रेस पक्ष आणि पी. चिदंबरम यांचा निषेध करतो. अतिरेक्याला कोणताही धर्म नसतो."

राकेश मारिया यांनी पुस्तकात केलेल्या या हिंदू दहशतवादाविषयीच्या खुलाशाबद्दल बोलताना कसाब विरुद्ध खटला लढणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, " पोलीस तपासानंतर जी कागदपत्रं न्यायालयात दाखल होतात त्यावर सरकारी वकील काम चालवत असतो. अजमल कसाब आणि इतर जे 9 दहशतवादी होते यांच्याकडे हैदराबादच्या कॉलेजची फेक आयडेंटिटी कार्ड्स सापडली होती, ही गोष्ट खरी आहे.

परंतु त्यावरून आयएसआयचा असा काही प्लॅन होता, असं म्हणता येणार नाही. अजमल कसाबने कबुलीजबाबात सांगितलं होतं, ISIचा प्लान होता की जर पोलिसांनी हटकलं तर आम्ही भारतीय विद्यार्थी आहोत, नागरिक आहोत असं सांगायचं त्याने कबुलीजबाबात म्हटलं होतं. पण पोलिस तपासात त्यांना काय आढळून आलं, गोपनीय काय माहिती आहे याची माहिती मला नाही."

26/11 चा हा हल्ला आणि त्यानंतरच्या खटल्याचं कामकाजाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकार प्रीती गुप्ता सांगतात, "26/11 चा हल्ला घडला तेव्हा त्याच सुमारास एटीएस (ATS)ने काही हिंदू दहशतवाद्यांना अटक केलेली होती. कदाचित म्हणूनच 26/11चा हल्लाही मुस्लिम दहशतवादी संघटनेने केला नसून एका हिंदू दहशतवादी संघटनेने केल्याचा भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. शिवाय भारतात एखाद्या व्यक्तीला पाठवताना त्या माणसाला हिंदूच्या वेशात रुपात पाठवणं जास्त सोपं असतं.

म्हणूनच या दहशतवाद्यांच्या हातात लाल धागा होता, आपण भारतीय आणि हिंदू वाटावं अशाप्रकारची हिंदी भाषा ते बोलत होते. हे दहशतवादी हिंदू असल्याचा भास निर्माण करण्याचा हा कट होता. दहशतवाद्यांच्या मनगटावरच्या या लाल दोऱ्यांविषयी त्यावेळीही चर्चा झाली होती. हिंदू नावांविषयी चर्चा झाली होती. आणि 2008च्या सुमारास भारतामध्ये हिंदू दहशतवादी संघटना अतिशय सक्रीय होत्या. आणि त्याचाच फायदा घेण्याचा हा प्रयत्न होता."

हेही वाचलंत का?