मासिक पाळीला का अपवित्र मानतो स्वामीनारायण संप्रदाय?

कृष्णस्वरूप स्वामी

फोटो स्रोत, YouTube

फोटो कॅप्शन,

कृष्णस्वरूप स्वामी

स्वामीनारायण पंथातील कृष्णस्वरूप स्वामींचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. "जर मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रियांनी स्वयंपाक केला तर त्यांचा पुढचा जन्म कुत्रीचा असेल आणि पुरुषांनी ते पदार्थ खाल्लं तर त्यांना बैलाचा जन्म घ्यावा लागेल," असं त्यात म्हणालेत.

सध्या ही क्लिप खूपच व्हायरल झाली असून त्याबद्दल वेगवेगळ्या स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मासिक पाळी या विषयावर गुजरातमध्ये वेगवेगळे वाद उफाळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी स्वामीनारायण संप्रदायातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका शाळेत मुलींना पाळी सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी अंडरवेअर काढायला लावण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर हा व्हीडिओ समोर आला आहे.

याच संप्रदायातील कृष्णस्वरुप स्वामींनी या व्हीडिओमध्ये हे वक्तव्य केलं आहे. 1995 पासून ते साधुपदावर आहेत.

ते म्हणतात "तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका हे शास्त्रात लिहिलं आहे. जर मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रियांनी त्यांच्या नवऱ्यासाठी स्वयंपाक केला तर त्यांचा पुढचा जन्म कुत्रीचा असेल. माझ्याबरोबर असलेले संत मला हे बोलू देणार नाहीत. मात्र आता सांगितलं नाही तर ते कुणाला कळणार नाही."

स्वामीनारायण संप्रदायातर्फेच सहजानंद विद्यालय चालवलं जातं. याच महाविद्यालयात मुलींबरोबर वरील प्रकार घडला होता.

कृष्णस्वरुप स्वामींचा हा व्हीडिओ एक वर्ष जुना आहे. सहजानंद विद्यालयात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. आम्ही या प्रकरणी महाविद्यालयाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

11 फेब्रुवारीला झालेल्या या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्यासंदर्भात एका समितीची स्थापना केली होती. या समितीने या संस्थेला भेट दिली आणि पीडितांची बाजू ऐकून घेतली होती. पोलिसांनीही याप्रकरणी SIT ची स्थापना केली होती.

स्वामीनारायण संप्रदायाचं मासिक पाळीबद्दल काय मत आहे?

भूज येथील स्वामीनारायण मंदिराच्या वेबसाईटवर मासिक पाळी संदर्भात स्वामीनारायण संप्रदायाचे विचार प्रकाशित झाले आहेत. मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे, असं त्यांचं मत आहे.

त्यासाठी स्वामीनारायण संप्रदायाचा पवित्र ग्रंथ असलेल्या शिक्षापत्री या ग्रंथांचा संदर्भ देण्यात आला आहे. या दस्तावेजात या संपद्रायाच्या मासिक पाळीबद्दलच्या विचारांबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Swaminarayan.faith

फोटो कॅप्शन,

स्वामीनारायण मंदिरातील एक दृश्य

शिक्षा पत्रीच्या श्लोक क्रमांक 174 नुसार मासिक पाळीचे काही नियम स्त्रियांनी पाळायलाच हवेत. पाळीच्या पहिल्या तीन दिवसांत स्त्रियांनी कशालाही हात लावू नये. चौथ्या दिवशी केस धुवून आपली दिनचर्या सुरू करावी, असं सुचवण्यात आलं आहे.

या वेबसाईटवर अपलोड केलेल्या एका कागदपत्रात ज्या स्त्रियांना पाळी सुरू आहे त्यांनी ती कधीही लपवू नये आणि नवऱ्याशी खोटं बोलू नये अशी सूचना करण्यात आली आहे. त्यांनी तीन दिवस स्वयंपाक करू नये असंही सांगितलं आहे. या दस्तावेजातील काही मुद्दे खालीलप्रमाणे:

 • महिलांना त्या काळात कुणीही स्पर्श करू नयेत, चौथ्या दिवशी त्यांनी शुद्धी स्नान करायला हवं आणि त्यानंतरच दिनचर्या सुरू करावी.
 • शुद्धी स्नानाच्यावेळी त्यांनी केस धुवायलाच हवेत. चौथ्या दिवशी त्यांनी स्वयंपाक करावा, मात्र त्याचा नैवेद्य दाखवू नये.
 • घरात लग्नकार्य असेल तेव्हा तसंच संकटसमयी हे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
 • मासिक पाळी सुरू असलेल्या बायकांनी कोणाला स्पर्श केला तर त्यांनी हिंदू कॅलेंडरनुसार एखाद्या दिवशी उपवास करावा.
 • या पुस्तकानुसार आधुनिक काळातही हे नियम का पाळावे याबद्दल उल्लेख केला आहे.
 • पाळीची प्रकिया नैसर्गिक असली तरी ती अशुद्ध आहे, असं या पुस्तकात सांगितलं आहे.
 • जर स्त्रियांनी हे सर्व नियम पाळले तर पदार्थांचं, कुटुंबाचं पावित्र्य राखता येतं. हे नियम स्त्रियांसाठी किती उपयोगी आहेत याबद्दलही उहापोह करण्यात आला आहे. कारण त्या मेहनत करतात आणि कुटुंबाची काळजी घेतात. त्या थकतात, म्हणूनच त्या वेगळ्या बसल्या तर त्यांना आराम मिळू शकतो.
 • swaminarayan.faith या वेबसाईटवर पाळीसंदर्भात लेख आहे. त्यात या काळात स्त्रियांना प्रचंड त्रास होतो. या काळात होणाऱ्या रक्तस्रावामुळे त्यांना भीती वाटते, असं लिहिलं आहे.
 • या रक्ताचा वास अतिशय वाईट असल्याचं या लेखात म्हटलं आहे. म्हणूनच स्त्रियांनी वेगळं बसावं.
 • या रक्तात बॅक्टेरिया असतात. त्या काळात स्त्रिया भावनिक होतात, त्या प्रचंड काळजी करतात.
 • स्त्रियांबददल सहानुभूती दाखवण्यासाठी त्या काळात स्त्रियांकडून कष्ट करून घेतले जाऊ नये, असं सुचवण्यात आलं आहे.

स्वामीनारायण संप्रदाय काय आहे?

स्वामीनारायण संप्रदायाची सुरुवात 1799 मध्ये झाली. उद्धव संप्रदायातून त्याचा उगम झाला आहे. रामानंद स्वामींनी या संप्रदायाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी नीलकंठ वर्णी यांना साधूपदावर बसवलं आणि त्यांचं नामकरण सहजानंद स्वामी असं केलं. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना उद्धव संप्रदायाचं नेतेपद देण्यात आलं.

रामानंद स्वामी यांच्या मृत्यूनंतर 14 दिवसानंतर नीलकंठ वर्णी यांनी फणेनी या गावात शिष्यांचा दरबार भरवायला सुरुवात केली. त्या दरम्यान त्यांनी स्वत:ला सर्व मंत्रांचा भीष्मपीतामह अशी ओळख करून देण्यास सुरुवात केली आणि त्यांनाच स्वामीनारायण असं संबोधण्यास सुरुवात झाली. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणाचीही नेमणूक केली नाही. तेव्हा स्वामीनारायण यांचा एकछत्री अंमल होता. तिथूनच स्वामीनारायण संप्रदाय अस्तित्वात आला.

फोटो स्रोत, Swaminarayan.faith

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

स्वामीनारायण यांचा जन्म 3 एप्रिल 1781 ला झाला आणि 1 जून 1830 ला त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीपासूनच स्वामीनारायण संप्रदायाने गुजराती समाजाच्या संस्कृतीचं आणि भाषिक वैशिष्ट्यांचं संवर्धन करण्यावर भर दिला. स्वामीनारायण हेच सर्वोच्च असल्याचं ठसवण्यात आलं.

स्वामीनारायण संप्रदायाचं मूळ वेदांमध्ये असल्याचं सांगण्यात येतं. ते वैष्णव परंपरेचे पाईक आहेत. हिंदू धर्माचा ते एक भाग असल्याचं सांगण्यात येतं. भक्ती, धर्म, ज्ञान आणि वैराग्य ही या धर्माची मूळ तत्त्वं आहेत. समर्पणावर त्यांचा विश्वास आहे.

स्वामीनारायण यांनी विश्वदैवत्व नावाची संकल्पना समोर आणली. देव सर्वोच्च शक्ती आहे. तो पवित्र आहे. आत्म्याचं रुपांतर देवात होत नाही. मनुष्यप्राणी देवाचा भाग नाही. ते देवाचे शिष्य आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

स्वामीनारायण संप्रदायाला एक प्रकारचं चारित्र्य निर्माण करायचं आहे. त्यासाठी सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रबोधनाचा आधार घेतला जातो.

या संप्रदायाच्या शिष्यांच्या दिवसाची सुरुवात पूजा आणि ध्यानधारणेने होतो. ते निष्ठापूर्वक अभ्यास करतात किंवा त्यांना नेमून दिलेला अभ्यास करतात. लोकांची सेवा करण्यासाठी विशिष्ट वेळ देतात.

जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी आंत्यातिक कल्याणासाठी एखादी व्यवस्था उभारायची हे त्यांच्या आयुष्याचं आणि संप्रदाय उभारण्यामागचं उद्दिष्ट होतं.

याच संप्रदायाच्या कृष्णस्वरुप स्वामी यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)