हरमनप्रीत कौर : जेव्हा 8 बॉलमध्ये 19 धावा काढल्यावर तिची डोपिंग टेस्ट झाली होती

ु

फोटो स्रोत, Getty Images

2009 ची ही गोष्ट आहे. महिला विश्वचशकात भारत आणि ऑस्ट्रेलियात सामना सुरू होता. बॅटिंग करण्यासाठी सर्व लोक नवीन होते. युवा खेळाडू हरमनप्रीत कौरचा नंबर आठवा किंवा नववा होता. मात्र कर्णधार अंजुम चोप्राने तिला अचानक आधी पाठवण्याचा निर्णय घेतला.

हरमनने आठ बॉलमध्ये 19 धावा केल्या त्यात एका षटकाराचाही समावेश होता. तो षटकार इतका जबरदस्त होता की मॅचनंतर तिला उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी बोलावण्यात आलं. तिच्यासारखी नवोदित खेळाडू असं कसं करू शकते असा प्रश्न तेव्हा पडला.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

तीच हरमनप्रीत आता भारताची कर्णधार आहे. मैदानावरचे चौकार आणि षटकार तिची आता नियमित ओळख झाली आहे.

महिलांचा टी-20 चा वर्ल्ड कप जिंकणं हे तिचं स्वप्न आहे. 21 फेब्रुवारी पासून तो सुरू होत आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाबरोबर आहे. टी-20 मॅच खेळणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

आठ मार्च 1989 ला पंजाबमधील मोगामध्ये तिचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिला क्रिकेटची आवड होती. हरमनचे वडील हरमिंदर सिंह भुल्लरसुद्धा क्रिकेट खेळत असत. तिने तिच्या वडिलांना चौकार षटकार लगावताना पाहिलं होतं. तेव्हाच तिला या खेळाची आवड निर्माण झाली होती.

मोगामध्ये ती मुलींच्या मैदानात कमी आणि मुलांबरोबर क्रिकेट खेळतानाच जास्त दिसायची.

जेव्हा प्रशिक्षक एकदा मोगाच्या मैदानावर पोहोचले तेव्हा त्यांनी हरमनप्रीतला गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना पाहिलं आणि दहावीनंतर त्यांनी हरमनला त्यांच्या शाळेत दाखल करून घेतलं. ती एका नव्या प्रवासाची सुरुवात होती.

इतक्या लहान गावातल्या एका मुलीला क्रिकेट खेळणं तिच्या नातेवाईकांना फारसं रुचलं नाही. मात्र तिने तिच्या कर्तृत्वामुळे सगळ्या नातेवाईकांची तोंडं बंद केली, असं तिच्या वडिलांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

पंजाब आणि रेलवेतर्फे खेळल्यानंतर 19 वर्षांच्या वयात 2009 मध्ये तिने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं.

आज हरमन तिच्या वादळी बॅटिंगसाठी ओळखली जाते. मात्र ती जेव्हा संघात आली तेव्हा हरमनला गोलंदाजीसाठी टीममध्ये जागा मिळाली होती.

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईच्या वेस्टर्न रेल्वेमध्ये काम करता करता तिने गोलंदाजी आणि फिटनेसवर काम केलं. टीममध्ये स्थान पक्कं करण्यासाठी काहीतरी खास करणं गरजेचं आहे हे तिच्या लक्षात आलं.

अल्पकाळातच ती भारतीय फलंदाजीचा कणा म्हणून नावारुपाला आली. अगदी तिच्या आवडत्या खेळाडू वीरेंदर सेहवागसारखी. पाहता पाहता तिला टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली.

कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणं हे कर्णधार म्हणून तिचं वैशिष्ट्य. त्यात अगदी नवीन खेळाडूंना संधी देणं असो की स्वत:ची फलंदाजी असो.

2017 मध्ये वन डे वर्ल्ड कपची सेमीफायनल तुम्हाला आठवत असेल. तेव्हा भारतासमोर ऑस्ट्रेलियासारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचं आव्हान होतं.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

हरमनप्रीतने 115 चेंडूत 171 धावा केल्या. त्यात सहा षटकार आणि 20 चौकारांचा समावेश होता.लोकांनी तिची तुलना कपिलदेव बरोबर केली आणि ती एका रात्रीत स्टार झाली. त्यावेळी ती जायबंदी झाली होती. तिची बोटं, मनगटं आणि खांदे जायबंदी झाले होते. त्या परिस्थितीत तिने ही कामगिरी केली होती.

क्रिकेटच्या मैदानाबाहेरही ती अनेक उत्पादनाची ब्रँड अँबेसेडर झाली. ही कामगिरी अगदीच दुर्मिळ होती. कायम पुरुषांना संधी देणाऱ्या सिएट कंपनीने 2018 मध्ये तिला संधी दिली.

नवनवे विक्रम करणं तिच्या अंगवळणीच पडलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग साठी निवड झालेली ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

2018 मध्ये टी 20 वर्ल्डमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात हरमनने शतक झळकावलं. टी-20 मध्ये शतक झळकावणारी ती पहिली महिला आहे.

हरमन अनेकदा वादात सापडली आहे. मिताली राज बरोबर तिचा वाद झाला होता. तसंच बनावट डिग्री सादर केल्याप्रकरणी तिला पंजाब पोलिसांनी पोलीस उपधीक्षक पदावरून बरखास्त केलं होतं. हरमन या आरोपाचा इन्कार करते.

गेल्या काही महिन्यापासून टी-20 मध्ये हरमनच्या फॉर्मवर चिंता व्यक्त केली जात आहे.

2018 मध्ये तिने टी-20 मॅचमध्ये 103 धावा केल्या होता. मात्र त्यानंतर तिची खेळी फारशी चांगली झाली नाही. गेल्या महिन्यात टी-20 मॅचमध्ये 42 धावांची खेळी केली आणि भारताने इंग्लंडचा पराभव केला.

क्रिकेटशिवाय हरमनप्रीतला कार, मोबाईल, आणि प्ले स्टेशनची आवड आहे.

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत तिची बहीण हेमजीत सांगते, "तिला मोबाईल आणि प्ले स्टेशनची आवड आहे. जेव्हा एखादा नवीन मोबाईल लाँच होतो तेव्हा तिला वाटतं की तो मोबाईल तिच्याकडे असायला हवा. जेव्हा ती घरी येते तेव्हा रात्र रात्र ती क्रिकेटवर गप्पा मारत असते. अनेकदा आम्ही तिच्या गोष्टींना कंटाळून जातो."

गोलंदाजांची झोप उडवणाऱ्या हरमनला तिची झोप अतिशय प्रिय आहे. फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत हरमन म्हणते, "मी कधीही आणि कुठेही झोपू शकते. जर खेळायचा कंटाळा आला तरी मला झोप येते."

आठ मार्चला तिचा 31 वा वाढदिवस आहे.

एक दिवस भारतासाठी वर्ल्डकप आणण्याचं तिचं स्वप्न आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)