शरद पवारांचा सवाल : राम मंदिरासाठी ट्रस्ट, मग मशिदीसाठी का नाही? - #5मोठ्याबातम्या

शरद पवार

फोटो स्रोत, @PawarSpeaks

फोटो कॅप्शन,

शरद पवार

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही? : शरद पवार

"तुम्ही जसं राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करू शकता, मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्ट का निर्माण करू शकत नाही?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. दिल्लीत या ट्रस्टची पहिली बैठक बुधवारी पार पडली.

लखनऊमध्ये बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, "राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही? देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे."

"लोकांमध्ये फूट पाडून राज्य करा, हे भाजपचं धोरण आता जनतेनं ओळखलं आहे. जनता आता तुमच्या थापांना बळी पडणार नाही. CAA आणि NRCमध्ये काही त्रुटी आहेत, यामध्ये मुस्लीम अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे," असंही पवार म्हणाले.

2. हिंगणघाट प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंगणघाट प्रकरणातील आरोपीनं नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फाशी लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये आरोपी विकेश नगराळे याने प्राध्यापक असलेल्या एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणातील पीडितेचं उपचारादरम्यान निधन झालं होतं.

विकेशला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणांवरून त्याला कारागृहातील अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

3. जवानांशी दुर्व्यवहार - महाराष्ट्र सदनातील अधिकारी कार्यमुक्त

दिल्लीतल्या येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आलं आहे.

राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

आदित्य ठाकरे

महाराष्ट्र सदनात बुधवारी (19 फेब्रुवारी) सकाळी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सैन्य दलाच्या गोरखा रेजीमेंटचं बँड पथक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी सहभागी झालं होतं.

कार्यक्रम संपल्यानंतर पथकातील जवान सदनच्या उपहारगृहातील एक्झिक्युटीव्ह डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी गेले. त्यावेळी सदनचे सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना तिथे बसण्यास विरोध केला. जवानांना बाहेरच्या सार्वजनिक डायनिंग हॉलमध्ये बसण्यास सांगितलं आणि त्यांच्याशी हुज्जत घातली. यावर कार्यक्रम आयोजकांनी आक्षेप घेतला होता.

4. इंदुरीकर महाराज मुद्दाम बोलले नाहीत - रोहित पवार

भाजपचे लोक जसं मुद्दाम एखादं वाक्य बोलून वाद वाढवतात, तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. सकाळनं ही बातमी दिलीय.

ते म्हणाले, "इंदुरीकर महाराज समाजप्रबोधनाचं काम करतात. एखादं वाक्य ते चुकून बोलले असतील. मात्र मुद्दाम बोलले नाहीत. जसं भाजपचे लोक मुद्दाम बोलून वाद वाढवतात, तसं ते बोलले नसावेत."

फोटो स्रोत, Facebook

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. टायमिंग हुकलं की क्वालिटी खराब," असं इंदुरीकर महाराज एका किर्तनात म्हणाले होते.

या वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. असं असलं तरी येत्या आठ दिवसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकर महाराजांना काळे फासण्याचा, तसंच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

5. भाजप आमदारावर सामूहिक बलात्कारचा गुन्हा

उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये भाजप आमदारासह 7 जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा बुधवारी दाखल झाला आहे. रविंद्रनाथ त्रिपाठी असं या भाजप आमदाराचं नाव आहे. NDTVनं ही बातमी दिली आहे.

वाराणसीमधील रहिवाशी असलेल्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपल्याविरोधात हे राजकीय षडयंत्र असल्याचं त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मरण्याच्या उद्देशानं रस्त्यावर उतरणाऱ्यांना कुणी वाचवू शकत नाही, असं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केलं आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत CAAविरोधी आंदोलनांत 24 जणांचा मृत्यू झाला, असा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)