दलित आई-मुलीचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरही काही प्रश्न कायम

  • प्रतिनिधी
  • बीबीसी मराठी
प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

औरंगाबाद जिल्ह्यात एका महिलेचा आणि तिच्या मुलीचा मृतदेह विहिरीत सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे ही घटना घडली.

या दोघींवर बलात्कार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप कुटुंबीयांनी केला होता.

आई आणि मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. त्या दोघींचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. त्यांच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता या रिपोर्टमध्ये फेटाळण्यात आली.

"त्या दोघींवर बलात्कार झाला नसला तरी त्यांच्या मृत्यूचं कारण काय याची चौकशी व्हायला हवी. जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं कारण सापडत नाही तोपर्यंत काही प्रश्न कायम राहतील," असं RPI चे औरंगाबाद जिल्ह्याध्यक्ष जय ठोकळ यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

डोंगरगाव येथील एक महिला तिच्या 7 वर्षांच्या मुलीसह काही दिवसांपासून बेपत्ता होती. कुटुंबानी या दोघींचा शोध घेतला, पण त्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे मग त्यांनी शनिवारी (15 फेब्रुवारी) सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली.

सोमवारी (17 फेब्रुवारी) सकाळी 9 ते 10च्या दरम्यान या माय-लेकीचे मृतदेह एका विहिरीत दिसले. दुपारी 12 वाजता दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले.

मृतदेह नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका वेळेवर आली नाही म्हणून संतप्त नातेवाईकांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली आणि खासगी वाहनाने दोघींचे मृतदेह सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी त्यांचे मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे आणण्यात आले. दोघींना न्याय मिळावा ही मागणी नातेवाईकांनी केली. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मंगळवारी रात्री पोलीस बंदोबस्तात या दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तपास कुठपर्यंत आला?

या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने सिल्लोड पोलिसांशी संपर्क साधला.

"महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं पोस्टमॉर्टमच्या अहवालात समोर आलं आहे," असं सिल्लोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

बलात्कार करून हत्या झाली असा आरोप कुटुंबीय करत आहेत. याबाबत बिडवे म्हणाले, "कुटुंबीयांना तसं वाटलं कारण दोन दिवस त्या दोघींचा मृतदेह पाण्यात होता. त्यामुळे त्यांचे डोळे वर आले होते, शरीर सुजलं होतं. पण, पोस्टमॉर्टमच्या अहवालात त्या दोघींचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं समोर आलं आहे."

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून काही चाचण्यांचे नमुने मुंबईला पाठवण्यात आले आहेत, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

संशय कायम?

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं RPI औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष जय ठोकळ यांनी म्हटलं आहे.

"पोलिसांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कार झालेला नाही, हे सिद्ध झालेलं असलं तरी या घटनेची पार्श्वभूमी हा पोलिसांच्या तपासाचा भाग असायला पाहिजे. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जे आरोप केले त्याप्रमाणे अन्याय झाला असेल, तर कारवाई करायला हवी," असं ठोकळ सांगतात.

"या घटनेतील ज्या बाबी संशयास्पद असतील, त्यांची चौकशी सुरू राहायला हवी, बलात्कार नाही हे सिद्ध झालं असलं तरी हत्या करण्यात आली आहे का, हे पोलिसांनी तपासायला हवं. या मागणीचं निवेदन आज आम्ही आरपीआय तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे," अशी माहिती ठोकळ यांनी दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)