तामिळनाडूत कंटेनर-एसटी बसची टक्कर, भीषण अपघातात 19 ठार

तामिळनाडू अपघात Image copyright ANI

तामिळनाडूच्या तिरूपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे.

हा अपघात अविनाशी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर झाला. बंगळुरूहून एर्नाकुलमला जाणाऱ्या केरळ राज्य परिवहनच्या बसला कंटेनरने जोरदार धडक दिल्यामुळे ही घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातावेळी बसमध्ये सुमारे 48 प्रवासी होते त्यापैकी 19 जणांच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी सध्या घटनास्थळी असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.

तिरूपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय कार्तिकेयनसुद्धा घटनास्थळी उपस्थित आहेत.

बातम्यांमधील माहितीनुसार, कोईंबतूर-सेलम महामार्गावर टाईल्स घेऊन जात असलेल्या कंटेनरच्या चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर तो थेट बसवर जाऊन आदळला.

Image copyright Ramesh

जखमींवर अविनाशी, तिरूपूर आणि कोईंबतूरच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह अविनाशी आणि तिरुपूरच्या सरकारी रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत.

बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी इमरान कुरेशी यांनी तिरूपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय कार्तिकेयन यांच्याशी बातचीत केली.

बसमध्ये एकूण 48 प्रवासी होते, त्यापैकी 20 मृतदेह हाती लागले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून काहींची स्थिती गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं.

कंटेनरचा टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, पण पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत, असंही डॉ. कार्तिकेयन यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

Related Topics