डोनाल्ड ट्रंप येणार म्हणून यमुनेत सोडलं गंगचे पाणी, कारण नदी स्वच्छ दिसावी

  • समीरात्मज मिश्र
  • बीबीसी हिंदीसाठी
ताजमहाल. यमुना

फोटो स्रोत, Getty Images

वास्तुकला आणि संगमरवरात कोरलेल्या नक्षीमुळे ताजमहाल जगभरात प्रसिद्ध आहेच. त्याला यमुनेच्या वाहत्या पाण्याची साथ आणि जोडीला चंद्रप्रकाश असेल तर त्याचं सौंदर्य आणखीच खुलून दिसतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 24 फेब्रुवारीला संध्याकाळी याच सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आग्र्याला जाणार आहेत.

परंतु ताजमहालाच्या मागे वाहाणाऱ्या यमुनेचा प्रवाह मात्र आटलेला आहे. नदीच्या पात्रात पाणी एकदम कमी आहे. आणि सध्या जे पाणी वाहतं त्याच्याजवळ काही क्षणही उभं राहाता येत नाही. कारण त्या पाण्याला दुर्गंधी येते.

ट्रंप यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हे चित्र कमीत कमी वेळेत बदलण्यासाठी उत्तर प्रदेशातलं योगी सरकार आणि स्थानिक प्रशासनानं प्रयत्न सुरु केले आहेत.

दीड फुट पाणी

दुर्गंधी जावी म्हणून यमुनेत अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यमुनेत पाणी सोडल्यावर नदी स्वच्छ दिसेल आणि दुर्गंधी कमी होईल असं त्यांना वाटतं.

"हा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आग्रह धरलेला होता", असं आग्र्याचे महापौर नवीन जैन यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "यमुनेत थोडं आणखी पाणी सोडलं तर नदी साफ होईल आणि त्या पाण्यामुळे नदी चांगली दिसेल असं आम्ही योगी आदित्यनाथ यांना सांगितलं. त्यांनी आमचं म्हणणं लगेच ऐकलं आणि सिंचन विभागाच्या लोकांना आदेश दिले. बुधवारी संध्याकाळी दिड फूट पाणी सोडलं गेलं आहे."

नवीन जैन म्हणाले, "हे पाणी हरिद्वारच्या जवळ गंगा नदी, ग्रेटर नॉएडाजवळ हिंडन नदी आणि काही इतर नद्यांमधून यमुनेत सोडलं जाईल त्यामुळे 22 ते 23 फेब्रुवारीपर्यंत आग्र्याजवळ ते पोहोचेल आणि पुढचे एक-दोन दिवस स्वच्छ पाणी पात्रात राहिल."

नदी साफ राहाण्यासाठी...

डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी मंगळवारी आग्र्याला आले होते.

फोटो स्रोत, PTI

नवीन जैन म्हणाले, "यमुनेची स्थिती त्यांनीही पाहिली आणि आम्ही उपाय सुचवल्यावर त्यांनी तात्काळ आदेश दिले."

उत्तर प्रदेश सिंचन विभागाचे निरीक्षण अभियंता धर्मेंद्र सिंह फोगाट यांनी मांट कालव्यातून 500 क्यूसेक्स गंगाजल मथुरेत सोडल्याचं सांगितलं.

"हे पाणी 24 फेब्रुवारीपर्यंत पात्रात राहावं यासाठी सिंचन विभाग प्रयत्नशील आहे.

यमुनेत आणखीही काही पाणी सोडण्यात सोडलं जाईल", असं ते म्हणाले.

तज्ज्ञांच्या मते पाणी सोडल्यामुळे मथुरेबरोबरच यमुनेतच्या पाण्यातली ऑक्सीजनची पातळी वाढवेल. त्यामुळे यमुनेचं पाणी पिण्यायोग्य होईलंच असे नाही पण दुर्गंधी कमी होईल.

फोटो स्रोत, PTI

म्हणजेच 24 फेब्रुवारी पर्यंत आग्र्यातल्या यमुनेचं पाणी स्वच्छ राहिल असं इच्छा बाळगता येईल.

आग्रा आणि त्याच्या आसपास यमुनेला अनेक नाले मिळतात. या नाल्यांच्या घाण पाण्याला घेऊन यमुना वाहाते. नदीच्या किनाऱ्यांवरही अत्यंत घाण आहे.

फोटो स्रोत, PTI

ट्रंप यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यांचीही सफाई केली जात आहे. आग्र्यात राहाणारे एक सामाजिक कार्यकर्ता विपिन शर्मा म्हणतात, "आता अहमदाबादच्या झोपड्यांप्रमाणे यमुनेच्या किनाऱ्यांवर भिंती तर बांधल्या जाऊ शकत नाहीत आणि ट्रंप यांनी यमुनादर्शनाची इच्छा व्यक्त केली तर सगळं बिंग फुटेल म्हणून..."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)