कोरोना व्हायरसमुळे TISS च्या विद्यार्थ्यांना काय ऐकावं लागत आहे?

  • जान्हवी मुळे
  • प्रतिनिधी, बीबीसी मराठी
रिचर्ड कामेई Richard Kamei

फोटो स्रोत, RICHARD KAMEI

फोटो कॅप्शन,

रिचर्ड कामेई

"तिघे जण आमच्याजवळ आले आणि आम्हाला 'कोरोना व्हायरस' म्हणाले. मी त्यांना विरोध केला ते तिथून निघून गेले. मात्र, जातानाही ते आम्हाला 'कोरोना व्हायरस' म्हणतच होते."

नागालँडच्या असणाऱ्या एका विद्यार्थ्याला मुंबईत आलेला हा अनुभव. एका संध्याकाळी घरी परतत असताना त्याला अशा वर्णद्वेषाचा सामना करावा लागला.

नाव उघड न करण्याच्या अटीवर तो बीबीसीशी बोलत होता, "माझ्या सोबत माझी मैत्रीण होती. आम्ही चेंबूरमध्ये शिवाजी चौकाजवळ रस्ता ओलांडत होतो. कुठून तरी काही जण आले. मुंबईसारख्या शहरात असं काही घडणं, मन खिन्न करणारं आहे."

अशा परिस्थितीचा सामना करणारा तो एकटा नाही. चीनमध्ये कोरोना विषाणूची साथ आल्यनंतर मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये (TISS) शिकणाऱ्या अनेक ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांना असे अनुभव आले आहेत. आपली 'विशिष्ट ओळख आणि मोंगोलीयन ठेवण' यामुळे वर्णद्वेषाचा सामना करावा लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

हा सगळा प्रकार इतका वाढला की टिसमधल्या नॉर्थ-ईस्ट स्टुडंट फोरमने (NESF) एक निवेदन प्रसिद्ध करत या कृत्याचा निषेध केला आहे. या घटना कॅम्पसबाहेर घडल्या असल्या तरी टिस प्रशासनाने या निवदेनाची दखल घेतली आहे.

बीबीसी मराठीने टिसमधल्या ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांशी बातचीत केली आणि त्यांना सामना कराव्या लागणाऱ्या भेदभावाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

कोरोना विषाणूवरून वर्णद्वेषी टिका

NESF ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांना चिनी समजल्याच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांची 'कोरोना व्हायरस' अशी संभावना केल्याच्या घटना नमूद करण्यात आल्या आहेत. अशीच एक मोठी घटना 10 फेब्रुवारी रोजी टिसमध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी आणि तिला भेटायला आलेल्या तिच्या मैत्रिणीसोबत घडली. दोघंही नागालँडच्या आहेत.

फोटो स्रोत, JEET HAJARIKA

फोटो कॅप्शन,

जित हजारिका

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

विद्यार्थी संघटनेच्या निवेदनात म्हटलं आहे, "ती राहत असलेल्या इमारतीतल्या काही शेजाऱ्यांनी त्या मैत्रिणीला न विचारता तिचा व्हिडियो काढला आणि ही व्यक्ती कोरोना विषाणूची वाहक (potential carrier) असू शकते, असा संदेश लिहित तो व्हीडिओ सोशल मीडियावर पसरवला. अत्यंत चुकीची माहिती टाकल्याबद्दल आणि गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल त्या लोकांना जाब विचारला असता त्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ करण्यात आली. धमकावण्यात आलं."

घडलेल्या घटनेचा त्या विद्यार्थिनीला जबर मानसिक धक्का बसला आहे. ती घाबरलेली असल्याने टिस प्रशासनाने तिची राहण्याची व्यवस्था कॅंपसमध्येच केल्याचं NESFचा सदस्य जित हजारिकाने सांगितलं.

जित हजारिका पुढे म्हणाला, "आम्ही इन्स्टिट्युटच्या संचालकांना भेटलो. आम्हाला असलेल्या काळजीची इन्स्टिट्युटमधल्या सर्व प्रशासनाने दखल घेतली आहे. कॅम्पस सुरक्षित असल्याची आणि भेदभाव करू नये, यासाठी लोकांना जागरुक करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. तसंच हाउसिंग सोसायटीमधल्या लोकांमध्ये जागरुकता कशी निर्माण करता येईल, यावर आम्हीदेखील विचार करत आहोत."

"मुंबईमध्ये असं काही होईल, अशी अपेक्षा नव्हती"

अशा मुद्द्यांवर कॅंपसमधलं वातावरण तुलनेनं चांगलं असल्याचं मणिपूरमधून आलेल्या रिचर्ड कामेई या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. मात्र इतर ठिकाणी सहसा अत्यंत सूक्ष्म पातळीवर भेदभाव होत असल्याचं तो सांगतो.

रिचर्ड म्हणतो, "लोकलमध्ये प्रवास करताना कुणीही काहीही बोलतं. असं काहीतरी बोलतात जणू मी कुणीतरी खालच्या पातळीचा आहे किंवा मी खालच्या पातळीचा आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतात. मी माझ्या आई-वडिलांसोबत माझ्या मातृभाषेत बोलतो तेव्हा काही लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात, हसतात, चिडवतात."

जित हजारिका सांगतो, "तुम्ही कुठून आला आहात, असे प्रश्न लोक विचारतात. काही लोक अगदी उत्सुकतेपोटी विचारतात. त्यांना आमच्याबद्दल खरंच जाणून घ्यायचं असतं. मात्र, कधीकधी काही लोक असंवेदनशीलपणे वागतात. आम्ही दुसऱ्याच देशातले आहोत, असा समज करून घेतात. आम्ही मेनलँडमधल्या लोकांसारखे दिसत नाही. त्यामुळे ते आम्हाला बाहेरचे समजतात आणि आम्हाला आमचं नागरिकत्व पटवून देण्यास सांगतात. कोरोना विषाणूने या अज्ञानात भरच घातली आहे."

आणखी एका विद्यार्थ्याने नाव न उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं, "आम्ही वेगळे दिसतो, हे आम्ही मान्य करतो आणि हेदेखील मान्य करतो की लोकांच्या आमच्याप्रतीच्या प्रतिक्रियासुद्धा वेगळ्याच असतील. मात्र, मुंबईत असं काही घडेल, हे आम्हाला अपेक्षित नव्हतं. ही महानगरी आहे. वेगवेगळ्या भागातून लोक इथे येतात आणि हे कॉस्मोपॉलिटन शहर असल्याचं म्हटलं जातं."

अशा घटना अस्वस्थ करणाऱ्या आणि घाबरवणाऱ्या असल्याचं आणि अशावेळी असहाय्य वाटत असल्याचं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ते सांगतात, "जेव्हा आमच्यापैकी काही जणांनी विरोध केला तेव्हा लोक आक्रमक झाले होते. काही तर हिंसकही झाले होते. त्यामुळे उगाच वाद होऊ नये, म्हणून आम्ही शांत बसलो आणि दुर्लक्ष केलं."

खऱ्या 'विविधतेत एकतेची' गरज

'विविधतेत एकता' ही भारताची ओळख आहे. वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळे आवाज असणारा हा एक वैविध्यपूर्ण देश आहे. मात्र, "जे काही घडतंय ते या विविधतेला एकजिनसी करण्याचा उघड उघड प्रयत्न दिसतोय. वेगळेपणाचा मान राखला जात नाही. अन्न, भाषा, संस्कृती आणि चेहरेपट्टी याचा विषय येतो तेव्हा कुठल्यातरी एका पद्धतीला निकष मानलं जातं आणि तीच सर्वांना लागू केली जाते", असं रिचर्डचं म्हणणं आहे.

वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये चर्चा घडून यावी, यावर जित हजारिका आणि रिचर्ड कामेई भर देतात. भारताची विविधता जपण्याची गरज का आहे, हेदेखील ते समजवून सांगतात. ते म्हणतात, "संस्कृती, भाषा आणि ठेवण यांत विविधता असल्याचं कबूल करा आणि लोकांना हे वेगळेपण मान्य करावंच लागेल. ईशान्येकडच्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी मागणी केली आहे. शालेय पाठ्यक्रमात ईशान्य भारताचा इतिहास नगण्य आहे. ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे आणि याला कुठलंही एक उत्तर नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)