दलित युवकांना बेदम मारहाण, गुप्तांगात पेट्रोल टाकलं

दलित युवकाला मारहाण

फोटो स्रोत, Sm viral grab

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात दलित युवकांना मारहाण करून त्यांच्या गुप्तांगात पेट्रोल टाकून छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हीडिओ बनवण्यात आला आहे.

त्यांना मारहाण सुरू असताना आरोपी हसत असल्याचं व्हीडिओत दिसत आहे.

चार दिवसांपूर्वी ही घटना झाली. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या भागातील दलितांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागौर या ठिकाणी मोठी निदर्शनं झाली आहेत.

या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे.

पीडित विसाराम आणि त्यांचा चुलतभाऊ पन्ना राम यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

फोटो स्रोत, SM viral video

दोघेही पीडित नायक समाजाचे आहेत. नायक समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश नायक यांनी माध्यमांना सांगितलं, "अशी वागणूक तर प्राण्यांना पण दिली जात नाही. आमचे लोक उपोषणाला बसले आहेत. आम्हाला सर्व समाजाकडून समर्थन मिळत आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा कायम ठेऊ."

पीडित विसाराम यांनी पोलिसांना जबाब दिला की 16 फेब्रुवारी रोजी ते आपल्या चुलतभावासोबत मोटर सायकलच्या सर्व्हिसिंगसाठी गेले होते. थोड्या वेळाने तिथे भीव सिंह आणि त्याचे साथीदार तिथे आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

विसाराम यांनी सांगितलं की आरोपींनी त्यांच्या गुप्तांगात पेट्रोल टाकलं, पान्ह्याने गुप्तांगाला इजा पोहोचवली.

या घटनेतील दुसरे पीडित पन्ना राम यांनी सांगितलं "ते लोक 100-200 रुपये चोरीला गेल्याचं ते म्हणत होते. त्याचाच आळ घेऊन त्यांनी आम्हाला एक दीड तास मारहाण केली. आम्हाला बेशुद्ध पडेपर्यंत त्यांनी मारहाण केली."

दोन्ही पीडित सोनगर भोजावासचे रहिवासी आहेत. मारहाण झाल्यावर आरोपींनी पीडितांच्या कुटुंबीयांना फोन केला आणि यांना येथून घेऊन जा असं म्हटलं.

पोलिसांजवळ गेले नाहीत पीडित

करणू गाव नागौर जिल्ह्यात पाँचोडी ठाण्याच्या अंतर्गत येतं.

पाँचोडी च्या पोलीस ठाण्याचे प्रमुख राजपाल सिंह यांनी बीबीसीशी संवाद केला. ते म्हणाले, "या प्रकरणी सात लोकांना अटक करण्यात आली आहे. रिमांडच्या दरम्यान त्यांची चौकशी केली जाईल. सर्व पीडितांना संपूर्ण संरक्षण दिलं आहे. घटनेनंतर दोघंही लोकांना तीव्र धक्का बसला आहे."

पोलीस ठाण्याने सांगितलं की ते पोलिसांजवळ आले नाहीत. जेव्हा व्हीडिओ शेअर व्हायला लागला तेव्हा पोलीस सक्रिय झाले आणि तक्रार दाखल करण्यात आली.

फोटो स्रोत, Twitter

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की दुसऱ्या पक्षानेही चोरीची तक्रार दाखल केली आहे,

काही दलित संघटना पाँचोडीच्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखांच्या बदलीची मागणी करत आहेत.

दलितांच्या अधिकारांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते भंवर मेघवंशी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "दलितांवर अत्याचाराची प्रकरणं याआधीही झाली आहेत. 2015 मध्ये एका वादातून डांगावास गावात मोठा जमाव गोळा झाला होता. जमावाने पाच दलितांची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 40 लोकांना अटक केली होती."

फोटो स्रोत, Twitter

ते पुढे म्हणाले, "दलित आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांनी डांगावासची लढाई स्वबळावर लढली होती."

पीडितांना न्याय देण्याची मागणी

या घटनेनंतर राहुल गांधींनी ट्विट करत राज्य सरकारकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.

ते लिहितात, "दलित युवकांच्या बरोबर अत्याचाराचा व्हीडिओ भयंकर आहे. मी राज्य सरकाला या गुन्ह्यात सामील असलेल्या लोकांना लवकरात लवकर कोर्टात हजर करावं अशी आम्ही मागणी करत आहोत."

त्याच्या उत्तरादाखल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केलंय. ते म्हणतात, "या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात आली आहे. सात लोकांना अटक करण्यात आली आहे. कायद्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल."

फोटो स्रोत, Twitter

गहलोत म्हणाले की पीडितांना न्याय मिळेल.

नागौरचे खासदार हनुमान बेनीवालने या घटनेवर रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे.

दरम्यान राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या तीन आमदारांनी गुरुवारी विधानसभेत नाराजी व्यक्त केली. त्यावेळी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणं सुरू होतं. या आमदारांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)