महाशिवरात्री : कर्नाटकातल्या लिंगायत मठाला मिळणार मुस्लीम पुजारी

  • इमरान कुरेशी
  • बीबीसी हिंदीसाठी
बसवेश्वर

फोटो स्रोत, BBC/Sharad Badhe

फोटो कॅप्शन,

बसवेश्वर

उत्तर कर्नाटकात गदग जिल्ह्यातल्या एका लिंगायत मठात लवकरच एक मुस्लीम व्यक्ती पुजारी म्हणून रूजू होणार आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी त्यांची अधिकृतपणे नियुक्ती होणार आहे.

ही घटना कर्नाटकातले थोर संत आणि कवी शिशुनाला शरीफ यांची आठवण करून देणारी आहे. शिशुनाला शरीफ कर्नाटकचे कबीर नावानेही प्रसिद्ध आहेत.

या मठाचे पुजारी होण्याच्या मान ज्या 32 वर्षीय दिवान शरीफ रहिमनसाब मुल्ला यांना मिळणार आहे ते आताआतापर्यंत ऑटोरिक्षा चालवायचे.

दिवान शरीफ यांना 12 व्या शतकातले समाजसुधारक बसवेश्वरांची अगदी लहानपणापासून ओढ होती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून लिंगायत स्वामींकडे ते बसवण्णांची वचनं शिकत आहेत.

बीबीसीशी बोलताना दिवान शरीफ म्हणाले, "इस्लाम सोडण्याचा किंवा लिंगायत धर्म स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला कुराण दिलं आणि बसवण्णांनी वचनं दिली. कुराण आणि वचनांमध्ये काय सांगितलं आहे, हे आपण समजून घेतलं आणि ते आत्मसात केलं तर आपण सर्व शांततेने एकत्र नांदू शकतो. शिवाय मी सर्वच धर्मांना समान मानतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो."

खजुरी मठाचे पुजारी मुरुगराजेंद्र कुराणेश्वर शिवयोगी म्हणतात, "ते इस्लाम आणि लिंगायत धर्माचे प्रतिनिधी आहेत. ते पूर्वी नमाज पठण करायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते पूर्णपणे वचनांचा अभ्यास करत आहेत. लिंगायत धर्माने त्यांचा स्वीकार केला आहे."

कलबुर्गी जिल्ह्यातल्या खजुरी गावातील कुराणेश्वर संस्थान मठ चित्रदुर्गच्या श्री जगदगुरू मुरुगराजेंद्रच्या 351 मठांपैकी एक आहे. त्यांचे अनुयायी संपूर्ण कर्नाटकात तसंच महाराष्ट्र, तेलंगाणा, तामिळनाडूमध्येही आहेत. या मठाचे अनुयायी संत बसवेश्वरांप्रमाणे मूर्तीपूजेत विश्वास ठेवत नाहीत.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

शरीफ सांगतात, "दोन-अडीच वर्षांपूर्वी माझे वडील वारले. तेव्हापासून मी वचनांचा अभ्यास सुरू केला. तोवर मी ऑटोरिक्षा चालवायचो, मद्यपान करायचो आणि इतरांना त्रास द्यायचो. शक्य तेव्हा नमाज पठण करायचो. मात्र, दिवसातून पाच वेळा नाही. मला कायम वाटायचं की मी फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी कमावतोय. मी कधीच समाजाला काहीच दिलेलं नाही."

त्यावेळी त्यांच्या डोक्यात विचार आला की एक अंध व्यक्ती कितीतरी लोकांना अन्न देते. "मी तर अंध नाही. मला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मला ही प्रेरणा डोळ्यांनी अंध असलेले शास्त्रीय वादक पुट्टराज गवई यांनी केलेल्या समाजकार्यातून मिळाली."

दिवान शरीफ यांचे वडील रहिमनसाब मुल्ला तब्बल तीन दशकं शिवयोगी स्वामींचे शिष्य होते.

शिवयोगी स्वामी म्हणाले, "ते रुद्राक्षाच्या माळा बनवायचे. आमच्या मठासाठी त्यांनी बरंच काही केलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर या मुलाला (शरीफ) ऑटोरिक्षा चालवण्यात रस नव्हता. पुढे त्याच्या आईने या कुटुंबाकडे असलेली दोन एकर जागा बसवण्णांनी दिलेल्या शिकवणीचा प्रसार-प्रचार करणारं शांतीधाम उभारण्यासाठी दिली."

मात्र, दिवान शरीफ यांचं लग्न झालं आहे आणि त्यांना सहा, पाच, तीन आणि दोन वर्षांची चार मुलंही आहेत. मात्र, मठाचे पुजारी ब्रह्मचारी असतात का?

या प्रश्नावर शिवयोगी स्वामी म्हणाले, "गरजेचं नाही. बसवण्णा स्वतः विवाहित होते. ही शिशुनाला शरीफ आणि गोविंद भट्ट यांची परंपरा आहे."

दिवाण शरीफ यांच्या वडिलांप्रमाणेच शिशुनाला शरीफ यांचे वडील हजरेशा कादरी यांचे शिष्य होते. हजरेशा कादरी एकोणीसाव्या शतकात 'लिंग दिक्षा' द्यायचे.

शिशुनाला शरीफ यांना वचनं आणि त्यासोबतच रामायण आणि महाभारत मुखोद्गत होतं. त्यांच्यावर गोविंद भट्ट यांचा फार प्रभाव होता. गोविंद भट्ट एक ब्राह्मण होते. त्यांनी शिशुनाला यांना आपला मुलगा मानलं होतं आणि त्यांना लग्न करायला सांगितलं. आज कर्नाटकातल्या शिवमोगा जिल्ह्यातल्या शिशुविन्नल्ला गावात या दोघांच्या मूर्ती आहेत. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजातले लोक त्यांची पूजा करतात.

दिवान शरीफ यांची लिंगायत मठाचे पुजारी म्हणून निवड होणार असल्याच्या बातमीने आश्चर्य वाटलं नाही, असं वचना स्टडिज इन्स्टिट्युटचे माजी संचालक रमझान दर्गा यांनी बीबीसीला सांगितलं.

ते म्हणतात, "उत्तर कर्नाटक भागातले लोक लिंगायत आणि मुस्लीम दोन्ही समाजातले सण-उत्सव सारख्याच उत्साहात साजरे करतात. इतकंच नाही तर लिंगायत समाजाचे लोक नमाझामध्येही सहभागी होतात. हे काही तत्त्वज्ञान नाही तर ते चालत आलेल्या धार्मिक विधीप्रमाणे आहे."

फोटो कॅप्शन,

मध्यभागी भगवी शाल आणि पांढरं धोतर परिधान केलेले दिवान शरिफ.

रमझान दर्गा यांच्या मते, "इस्लाम आणि लिंगायत किंवा बसवण्णाची वचनं ही एकेश्वरवादी आहेत. लिंगायत समाजात स्वर्ग, नरक अशा संकल्पनाही नाहीत. त्यामुळे हिंदू धर्माप्रमाणे एका एकेश्वरवादी धर्मातल्या व्यक्तीने दुसरा एकेश्वरवादी धर्म स्वीकारणं किंवा धर्मांतर करणं अवघड नाही. तुम्ही धर्मांतर केलं तर कोणती जात निवडली, हा प्रश्न कायम असतो. मात्र, लिंगायत धर्मात हा प्रकार नाही."

दिवान शरीफ म्हणतात, "आईच्या गर्भात असेलल्या बाळाचा कुठलाच धर्म नसतो. धर्म जन्मानंतरच मिळतो. त्याचप्रमाणे आमच्या शांतीधाममध्येही कुठलाच धर्म नाही."

पत्नी आणि मुलांचा सांभाळ कोण करतं?

दिवान शरीफांनी सांगितलं, "मी माझी ऑटोरिक्षा माझ्या भावाला दिली आहे. तोच माझ्या पत्नीचा आणि मुलांचा सांभाळ करेल. दोन महिन्यांनंतर त्याचं लग्न होईल. तेव्हा त्याने सांभाळ केला नाही तर माझा मित्र त्यांची जबाबदारी उचलेल."

तुम्हाला लोक स्वीकारतील का?

यावर दिवाण शरीफ म्हणतात, "मला कोण स्वीकारतं किंवा स्वीकारत नाही, हा प्रश्न नाही. जो कुणी त्याच्या कठीण काळात माझ्याकडे येईल, त्याचे अश्रू मला पुसता आले तर मला मनःशांती मिळणार आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)