वारिस पठाण यांना मनसेची दगड आणि तलवारीने उत्तर देण्याची भूमिका

व

"आम्ही 15 कोटी आहोत पण 120 कोटीला भारी आहोत. हे लक्षात ठेवा," असं वक्तव्य AIMIMचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मनसेनं त्यांना आव्हान दिलं आहे तर शिवसेनेनं मात्र त्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकच्या गुलबर्गमध्ये एका सभेत बोलताना वारिस पठाण म्हणाले, "ईंट का जवाब पत्थर, हे आता आम्ही शिकलोय. पण यासाठी एकत्र वाटचाल करावी लागेल. स्वातंत्र्य दिलं जाणार नसेल, तर ते जबरदस्तीनं मिळवावं लागेल. ते म्हणतात की, आम्ही स्त्रियांना पुढे करतो... आता तर केवळ वाघिणी बाहरे पडल्यात, तर तुम्हाला घाम फुटलाय. मग, आम्ही सगळे एकत्र आलो, तर तुमचं काय होईल, हे समजून जा. 15 कोटी आहेत, पण 100 कोटींना वरचढ आहोत, हे ध्यानात ठेवा."

वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी सारवासारव केली आहे.

"माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. त्यासाठी मी माफी मागणार नाही. लोकांमध्ये भेद निर्माण करण्याचं काम भाजप करत आहे," असं त्यांनी म्हटलंय.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली आहे.

"तुम्ही देशातल्या मुसलमानांची सतत दिशाभूल करत आहात. विष कालवत आहात. तुम्हाला देशातल्या मुसलमानांचा ठेका कुणी दिला आहे. महाराष्ट्रात तुम्हाला कोण विचारतंय. परत अशा प्रकारच्या भाषेचा वापर केला तर आम्हीसुद्धा उत्तर देण्यासाठी तयार आहोत. आमचं सरकार आहे आम्ही संयमानं घेऊ, पण महाराष्ट्रातला मुसलमान पूर्णपणे महाविकास आघाडीबरोबर आहे. जर तुम्हाला हे आवडत नसेल तर ज्या भाषेत तुम्हाला समजतं त्या भाषेत आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत," असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

मनसेनं याबाबत ट्वीट करून म्हटलंय की, "आम्ही... तुम्ही... असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की, जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल."

फोटो स्रोत, Twitter

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मात्र "वारीस पठाण यांना मनसे इशारा देऊ इच्छितो, दगडाच उत्तर दगडांनी आणि तलवारीला उत्तर तलवारीने," असं ट्वीट केलं आहे.

तर देशातील 15 कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कोणी दिला?, असा सवाल जावेद अख्तर यांनी वारिस पठाण यांना केला आहे.

ते म्हणाले, जिनांच्या मानसिकतेचे लोक अजूनही भारतात आहेत. देशात 15 कोटी मुस्लीम एकतेनं राहत असताना त्यांच्या नावाचा ठेका तुम्हाला कुणी दिला आहे?

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूरमध्ये आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, "या देशात ब्रिटिशांनी 150 वर्षं सत्ता केली. पण देशातील ऐक्याला त्यामुळे फरक पडला नाही. मुस्लीम बांधव देशात एकतेच्या भावनेनं सामावले गेले आहेत. असं असताना या 15 कोटी मुस्लिमांचा ठेका घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही पंधरा कोटीच रहाल, कधी सोळा कोटी होणार नाही."

फोटो स्रोत, Waris Pathan/Facebook

फोटो कॅप्शन,

वारिस पठाण

वारीस यांनी भाजपकडून सुपारी घेऊन हे वक्तव्य केल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, "भाजपच्या सांगण्यावरून असं वक्तव्य करायचं आणि इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करायचा हे मुस्लीम समाजालाही मान्य नाहीये. या असल्या लोकांवर कारवाई व्हायलाच हवी. यांना समाजातून हाकलून द्यायला पाहिजे. हे मुस्लिमांचं हित बघत नाहीत, तर मुसलमान कसे डुबतील, याकडेच यांचं जास्त लक्ष आहे."

वारिस पठाण यांचं वक्तव्य निषेधार्ह असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

ते म्हणाले, "वारिस पठाण यांचं वक्तव्य चुकीचं आणि निषेधार्ह आहे. अशाप्रकारची वक्तव्यं कायद्याला धरून नाहीत. यापद्धतीच्या वक्तव्याला महाराष्ट्र आणि देशात कुठेही थारा मिळणार नाही, हे स्पष्ट आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)