उत्तर प्रदेशातल्या सोनभद्रच्या खाणीत हजारो टन सोनं दडल्याचा संशोधकांचा दावा
- समीरात्मज मिश्र
- बीबीसी हिंदीसाठी

फोटो स्रोत, NurPhoto/getty
प्रतिकात्मक छायाचित्र
उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात जमिनीखाली हजारो टन सोनं असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या खणिकर्म विभागाने हा दावा केला आहे आणि लवकरच विभाग हे सोनं काढण्यासाठी उत्खनन सुरू करणार आहे.
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच GSI चं एक पथक गेल्या 15 सोनभद्रमध्ये काम करत आहे. या पथकाने 8 वर्षांपूर्वीच जमिनीखाली सोनं असल्याचं स्पष्ट केलं होतं. हेच सोनं मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने हा डोंगरासाठी ई-निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सोनभद्रचे खणिकर्म अधिकारी के. के. राय सांगतात, "GSI पथक दीर्घकाळापासून इथे काम करत आहे. आता लिलावासाठीचे आदेश निघाले आहेत. याच क्रमात जिओ टॅगिंग सुरू करण्यात आलं आहे आणि लवकरच लिलावाची प्रक्रिया सुरू होईल. जिल्ह्यात युरेनियमचं भांडार असल्याचाही अंदाज आहे. केंद्र सरकारचं पथक त्यादृष्टीनेही कामाला लागलं आहे. लवकरच त्यांनादेखील त्यांच्या मोहिमेत यश मिळेल."

फोटो स्रोत, PRAKASH CHATURVEDI
खणिकर्म अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लिलावापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांच्या जिओ टॅगिंगसाठी स्थापन करण्यात आलेली सात सदस्यीय पथक 22 फेब्रुवारीपर्यंत खणिकर्म संचालकांना आपला अहवाल सादर करतील. त्यानंतर ऑनलाईन निविदा मागवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात येतील. निविदेला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर खोदकामाची परवानगी देण्यात येईल.
GSI च्या म्हणण्यानुसारी सोनभद्रमधल्या सोन डोंगरावर जवळपास 3 हजार टन सोनं आणि हरदी ब्लॉकमध्ये जवळपास 600 किलो सोनं आहे. या ठिकाणांव्यतिरिक्त पुलवार आणि सलइयाडिह ब्लॉकमध्येही लोह अयस्क असल्याचं संशोधनात आढळलं आहे. मात्र, या लोह अयस्कमध्ये किती सोनं मिळेल हे अयस्कच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. जाणकारांच्या मते अयस्कची गुणवत्ता चांगली असेल तर त्यातून अयस्कच्या वजनाच्या निम्मं सोनं मिळू शकतं.
GSI पथकाला इथल्या जमिनीत 90 टन एंडोल्युसाईट, 9 टन पोटॅश, 10 लाख टन सिलेमिनाईट आढळलं आहे. लवकरच या धातूंच्या खोदकामाचा मार्गही मोकळा होणार आहे.

फोटो स्रोत, PRAKASH CHATURVEDI
2005 साली जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पथकाने अभ्यास करून सोनभद्रमध्ये सोनं असल्याचं सांगितलं होतं. 2012 साली त्यावर शिक्कामोर्तबही झालं. मात्र, हे सोनं काढण्याच्या म्हणजे खोदकामाच्या दिशेने कुठलंच ठोस काम झालं नव्हतं. मात्र, आता ब्लॉकच्या लिलावासाठी सरकारने सात सदस्यीय पथकाची टीमची स्थापना केली आहे. ही टीम संपूर्ण परिसरात जिओ टॅगिंग करेल आणि 22 फेब्रुवारी 2020 पर्यंत आपला अहवाल भूतत्त्व आणि खणिकर्म विभाग, लखौनला सादर करेल.

फोटो स्रोत, GYAN PRAKASH CHATURVEDI
या जमिनीत मोठ्या प्रमाणावर खनिज असल्याच्या शक्यतेमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांचं हेलिकॉप्टरने हवाई सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी विद्युतचुंबकीय उपकरणं, स्पेक्ट्रोमीटर उपकरणांचा वापर करण्यात येतोय. या उपकरणांचा काही भाग हेलिकॉप्टरच्या खाली असतो. हे उपकरण जमिनीपासून जवळपास 100 मीटर उंचीवरून माहिती गोळा करतं.

फोटो स्रोत, GYAN PRAKASH CHATURVEDI
सोनभद्रचे जिल्हाधिकारी एन. रामलिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ज्या डोंगरावर सोनं मिळालं आहे त्याचं क्षेत्रफळ जवळपास 108 हेक्टर आहे. सोनाच्या डोंगारांमध्ये वेगवेगळ्या प्रकराच्या खनिजांचा खजिना असल्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून या भागात हेलिकॉप्टरने सर्वेक्षण करण्यात येत आहे. सोनभद्रच्या डीएम यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सोनभद्रव्यतिरिक्त भारत सरकार मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्हा, उत्तर प्रदेशातीलच बलरामपूर आणि झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यात काही ठिकाणी हेलिकॉप्टरमधून सर्वोक्षण करण्यात येत आहे."
स्थानिक पत्रकार ज्ञानप्रकाश चतुर्वेदी सांगतात, "सोनभद्रच्या दुद्धी तालुक्यातील परिसरात असलेल्या सोन पहाडीचा इतिहास प्राचीन आहे. एकेकाळी इथे राजा बरियार शाह यांचा किल्ला होता. त्या किल्ल्याच्या दोन बाजूला शिव पहाडी आणि सोन पहाडी आहेत. या किल्ल्यापासून या दोन्ही डोंगरांपर्यंत प्रचंड प्रमाणात सोनं, चांदी आणि अष्ट धातूंचे भांडार असल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी जवळपास दहा वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला शेत नांगरताना महागड्या धातूंचा खजिना सापडला होता. पुढे सरकारने तो ताब्यात घेतला."

हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)