Empty nest Syndrome : तुमची आई एकटी पडलीय का?

  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
आई

फोटो स्रोत, Getty Images

"आता आम्ही पुन्हा इकडे येऊ शकणार नाही, आम्हाला इकडे करमत नाही. तुम्हीच भारतात या."

हे उद्गार आहेत पुण्यातील एका साठी पार केलेल्या आई-बाबांचे. आपली मुलांना चांगली नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या या कुटुंबातील दोन्ही मुलं आज परदेशात आहेत.

सुरुवातीच्या काळात नवेपणामुळे तिकडे ये-जा करता आली मात्र आता सतत येणं-जाणं शक्य नसल्यामुळे एक नवा ताणही येत आहे. मुलांची सतत असणारी सवय आणि नातवंडांची येणारी आठवण यामुळे एकटेपणाची जाणिवही भारतात आल्यावर होत राहाते.

आज भारतातील अनेक कुटुंबांमध्ये अशी स्थिती दिसून येते. लहान शहरातून मोठ्या शहरात किंवा परदेशात मुलं जातात तेव्हा त्यांच्या मागे राहिलेल्या पालकांमध्ये विशेषतः घरातल्या आईच्या मनात Empty nest Syndrome ही भावना तयार होऊ लागते. घरट्यातली पिलं उडून गेली घरटं रिकामं झालं असं वाटायला लागून एका कौटुंबिक ताणाला सामोरे जावे लागते.

पण मुलं घरापासून दूर गेल्यामुळे एकप्रकारचं रितेपणही येऊ लागतं. एकटेपणाची भावना वाढीस लागते आणि आठवणींनी कासाविस व्हायला होतं. मध्यमवयीन किंवा पन्नाशी-साठी पार केलेल्या महिलांच्या बाबतीत हे बहुतांशवेळा जास्त प्रमाणात होतं. बहुतांशवेळा अशा पालकांची दोन्ही बाजूंनी कोंडी होण्याची शक्यता असते.

परदेशात किंवा मुलांनी मोठ्या शहरात जावं म्हणून तुम्हीच तर खस्ता खाल्ल्या, तुम्हीच तर त्यांनी मोठ्या नोकऱ्या कराव्यात यासाठी प्रयत्न केले. तेव्हा तुमच्या लक्षात आले नव्हते का? आता या एकटेपणाच्या भावनेचे रडगाणे गाण्यात काय अर्थ आहे? असा प्रश्न त्यांना विचारला जातो. त्यामुळे नक्की आपले काय चुकले याचा अर्थ लावण्यात आणखीच नैराश्य दाटून येतं.

अनेकदा परदेशात गेलेल्या मुलांचं सुरुवातीच्या काळात कौतुक असतं. तिकडंच जग एकदा पाहून यावं, नव्या गोष्टी पाहून याव्यात असं वाटतं आणि ते स्वप्नही पूर्ण होतं. सुनेचं, मुलीचं बाळंतपण करण्यासाठीही परदेशवारी होते. परंतु चार-पाच वर्षांनी या फेऱ्या नकोशा वाटू लागतात.

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. हा लेख याच मालिकेचा एक भाग आहे. परदेशात किंवा घरापासून लांब राहाणाऱ्या पालकांच्या मनात एकटेपणाची भावना येऊ शकते. काही वेळेस हा एकटेपणा नैराश्य येण्यापर्यंतही जातो. त्याला Empty nest Syndrome असे म्हटले जाते.

साठीनंतर भारतातल्या आपल्या गावाला-शहराला सोडून जावंसं वाटत नाही. नेहमीचे सकाळी-संध्याकाळी फिरायला येणारे लोक, नेहमीचे मित्र-मैत्रिणी यांच्या भेटी तिकडे होणरा नाहीत, सण-समारंभ तिकडे साजरे करता येणार नाहीत. तिकडच्या हवामानात फार दिवस राहाणं शक्यही होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

सतत नव्या रुटिनची ओळख करुन घेऊन रोजचं आयुष्य विस्कळीत करण्यापेक्षा आपलं गाव- शहर सोडूच नये असं वाटू लागतं. मुलं नोकरी सोडून भारतात येऊ शकत नाहीत आणि भारत सोडून आपल्याला जाता येत नाही.

त्यामुळे मुलांची भेट, नातवंडांची भेट टळत राहाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्काइप, व्हीडिओ कॉलवर आपली मुलं-नातवंडं फोनवर दिसत असली तरी शेवटी ती आपल्या जवळ नाहीत हे सत्य सतत टोचत राहतं. सर्वबाजूंनी होणाऱ्या कोंडीमुळे आपल्या मनातल्या भावना या महिलांना मांडताही येत नाहीत.

Empty nest syndromeची कारणं

मुलांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरु करून त्यात व्यग्र होणं, त्यांचा विवाह होऊन स्वतःचं वेगळं आयुष्य सुरु करणं, मुलांनी दुसऱ्या शहरात राहायला जाणं, मुलांनी परदेशात स्थायिक होणं अशी अनेक कारणं या रितेपणाच्या भावनेसाठी कारणीभूत ठरु शकतात. यालाच Empty nest syndrome असं म्हटलं जातं. सायकॉलॉजी टुडे या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार अशी भावना पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते.

Empty nest syndrome ची लक्षणं

दुःखी भावना दाटून येणं, हरवल्यासारखं वाटणं, नैराश्य येणं, एकटेपणा येणं, जगण्यातला अर्थ निघून गेला अशी भावना मनात येऊ शकते. अशा भावना घरामध्ये एकट्या राहाणाऱ्या पालकांना येत असेल तर त्यांनी डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे.

मुलांना जखडून ठेवण्यात काय अर्थ आहे?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

काही पालकांनी अशा संभाव्य एकटेपणावर आपल्या पद्धतीनं उपाय शोधून काढले आहेत. कोल्हापूरमध्ये राहाणाऱ्या नीलिमा दिवाण यांचा एक मुलगा गेली अनेक वर्षे सिंगापूरमध्ये आणि दुसरा लंडनमध्ये राहातो.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "आपल्या मुलांना पंख फुटल्यावर ते उडून नव्या आव्हानांच्या शोधात जाणार हे आम्ही आधीच लक्षात घेतलं होतं. परंतु आम्ही सुरुवातीपासूनच चांगला मित्र परिवार अवतीभोवती गोळा केला होता. या गोतावळ्य़ामुळे अशी एकटेपणाची भावना जाणवत नाही. ज्यावेळेस मुलांना मदतीची गरज असते तेव्हा आम्ही तिकडे जातो आणि आम्हाला गरज असते तेव्हा ते धावून येतात. सण-समारंभही आम्ही एकत्र साजरे करतो. मुलांना आपल्या इच्छांनी जखडून ठेवण्यात काहीच अर्थ नाही असा विचार आधीपासूनच केल्यामुळे त्रास होत नाही. "

याबाबत माहिती देताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कीर्ती तांडेल यांनी बीबीसी मराठीला सांगितले, "ज्यावेळेस मुलं विवाह, शिक्षण किंवा नोकरीसाठी घर (नेस्ट) सोडून दूरवर जातात तेव्हा पालकांमध्ये येणाऱ्या एकटेपणाच्या भावनेला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असं म्हटलं जातं.

ते म्हणाले, "गेल्या काही वर्षांमध्ये परदेशात शिक्षण आणि नोकरी करण्यासाठी जाण्याचे प्रमाण वाढल्याने ही भावना दिसून येते. मुलांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी पालकांनी कष्ट केलेले असतात, गुंतवणूक केलेली असते आणि जेव्हा मुलं त्यांच्या नव्या मार्गावर वाटचाल करु लागतात आणि घरापासून दूर जातात तेव्हा एकटेपणाची भावना वाढीस लागते."

"तसेच आता मातृत्वाची किंवा आईची भूमिका आता अचानक संपुष्टात आली अशी जाणिव झाल्यामुळे ही एकटेपणाची भावना पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते.

ही स्थिती अधिक त्रासदासक होण्यामध्ये नोकरीतून निवृत्त होणे, रजोनिवृत्ती (मेनोपॉज), पतीचा मृत्यू होणे अशा घटनांचा हातभार लागतो आणि दुःखामध्ये भर पडते", असेही डॉ. तांडेल सांगतात.

या ताणाचा सामना कसा करायचा?

डॉ. तांडेल यांनी हा तणाव कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. ते सांगतात, एकटेपणाचा असा त्रास झाल्यास मित्रमंडळी, घरातील लोकांशी बोलावे. मानसोपचारांची मदत लागली तर तीही घ्यावी. आपल्या कुटुंबात झालेला बदल स्विकारण्यासाठी स्वतःला वेळ द्या. कोणताही बदल तणाव निर्माण करतोच त्यामुळे आपल्या मनातील भावना, विचारांवर कुटुंबीय़ांबरोबर चर्चा करावी, आपल्या जोडीदाराबरोबर यावर बोलावे.

आपल्या मुलांशी सतत संपर्कात राहावे, ताण कमी करण्यासाठी एखादा छंद जोपासावा. आपला रोजचे वेळापत्रक कायम ठेवावे. व्यायाम आणि आहाराकडे दुर्लक्ष करु नये असंही ते सुचवतात.

मनातलं अंतर कमी असलं की झालं…

आपली मुलं किती दूर आहेत यापेक्षा आपलं आणि मुलांमधलं मनातलं अंतर कमी असलं पाहिजे. ते अंतर कमी असलं की त्रास होत नाही असं मत प्रतिभा कुलकर्णी व्यक्त करतात. त्यांचा मुलगा हर्षद आणि मुलगी हिमानी दोघे अमेरिकेत नोकरी करतात.

फोटो स्रोत, FACEBOOK/HIMANI KULKARNI

फोटो कॅप्शन,

प्रतिभा कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "आजवर मुलं परदेशात आहेत म्हणून एकटेपणा असा वाटला नाही. नातेवाईक आणि मित्रमंडळीत आम्ही व्यग्र राहाण्याचा प्रयत्न करतो. आजारपणाच्या काळात मुलं धावून येतात. साधारणपणे सहा महिन्यांतून आमची भेट होते, सणसुद्धा एकत्र साजरे करतो.

फक्त गणपतीच्यावेळेस मुलं घरी असवीत असं वाटतं, ते बहुतांशवेळेस शक्य होत नाही. परंतु इतर कामं, नातेवाईक अशी सपोर्ट सिस्टिम तयार झाल्यामुळे एकटेपणा येत नाही. अमेरिकेत एक-दोन महिने जाऊन राहू शकतो. त्यापुढे थोडासा कंटाळा येऊ लागतो. काही पालक पाच-सहा महिन्यांसाठी परदेशात राहायला जातात त्यांना तिकडे कंटाळा येतो असं ऐकलं आहे. परंतु आम्ही एक-दोन महिन्यांसाठी जात असल्याने कंटाळा येत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)